विशेष प्रतिनिधी
मुंबई : जरांगे यांचा भंपकपणा आम्ही आता उघडा करणार आहोत, असा इशाराच भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिला आहे. तसेच मी मराठा समाजाच्या विचारवंतांना एकत्रित करणार असून गरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी सरकारशी समन्वय साधून नेमकं काय हवेय ते द्यायचेय. कारण जरांगेंना प्रेम दिले, पाठबळ दिले पण त्यांच्या डोक्यात राजकारणाचे भूत बसलेय ते उतरवावे लागेल. ते आम्ही निश्चितपणे करू. त्याचे अभियान सुरू करू, असेही दरेकर यांनी म्हटले आहे. The treachery of the Jarangs will now be exposed, warns BJP group leader MLA Praveen Darekar
दरेकर म्हणाले की, जरांगेंना आता आपली पब्लिसिटी महत्वाची वाटतेय. गोरगरीब महिलांना, भाऊ-बहिणींना फायदा होतोय त्यापेक्षा मी मोठा, मीच रोज प्रसिद्धीच्या झोतात राहिले पाहिजे म्हणून लाडकी बहीण आणि भाऊ योजना गर्दी डायव्हर्ट करण्यासाठी केल्याचा फुटकळ आरोप ते करताहेत. या योजनेतून मराठा समाजातील गरीब महिलांनाही मदत होणार आहे. मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. उपेक्षित, वंचित सर्व गरीब घटकांना न्याय मिळणारी ही योजना आहे. पण आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागलात सर्व खड्ड्यात गेले रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे. मी करतो तेच गरिबांचे कल्याण. यातून जरांगें बाहेर या, असेही दरेकर म्हणाले.
तसेच दरेकर पुढे म्हणाले की, माझ्याबाबतीत, प्रसाद लाड यांच्याबाबत बोललात. जरांगे तुम्हाला मराठा समाजाने गर्दी केली म्हणून पोपटपंची करताहेत. आम्ही गेले १५-२० वर्ष प्रत्यक्ष काम करतोय. पडद्याच्या मागे आम्ही काय करतोय हे सर्व मराठा संघटनांना विचारा. मुलांच्या परीक्षेचा, भर्तीचा प्रश्न, पदोन्नती, अधिसंख्या यासाठी प्रविण दरेकरांनी पुढाकार घेतला आहे. तुम्हाला माहित नाही. जरा माहिती घेऊन बोलत जा. जेव्हा पीएसआय मुलांचा प्रश्न होता तेव्हा ६००-७०० पीएसना देवेंद्र फडणवीसांकडे नेऊन मी जॉईंट करविले आहे.
आपले अज्ञान आहे. जरांगे तुम्हाला कल्पना नसेल मराठा समाजातील मुलांच्या नोकऱ्यांसाठी, स्वयंरोजगारासाठी सतत रचनात्मक काम करणारे आम्ही आहोत. मराठा समाजाला भावनिक करून मलाच नेता बनायचे आहे, तुम्ही तुमची वक्तव्ये तपासा. मुख्य प्रश्नांऐवजी लाडक्या बहिण योजनेवर बोलायला लागला आहात. अतुल बेनके कुणाला भेटले, भविष्यात काय होणार आहे. तुम्ही आता राजकीय झालेत. मुसलमानांचा कळवळा तुम्हाला येतो. पुन्हा वंचितांच्या गोष्टी करणार, ओबीसी-धनगर समाजाच्या गोष्टी करणार. त्यांच्यातून आरक्षण हवेय आणि त्यांच्या हनुवटीला हात लावायचा प्रयत्न करणार.
मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम आता थांबावा
दरेकर म्हणाले की, केवळ भावनिक वातावरण करून मराठा समाजाची जी दिशाभूल करण्याचे काम सूरु आहे ते जरांगे थांबवा. आता गोधडीचे नवे नाटक. त्यात आम्ही टीका केल्यावर सुधारणा केलात. आता महाविकास आघाडीलाही गोधडी टाकण्यात घेतले आहात. अशा प्रकारच्या नौटंकीने काही साध्य होणार नाही. कोणी लाथा मारत नाही. हे मायबाप सरकार दयाळू आहे. उलट ऊबदार पांघरूण गरीब समाजासाठी मग मराठ्यांसह सगळ्या समाजावर सरकार टाकतेय याचाच पोटशूळ तुम्हाला झालाय. तुमची भुमिका आता राजकीय झाल्याचे लोकांना, मराठा समाजाला कळले आहे. यातून तुम्हाला वैफल्य आलेय त्यातून तुम्ही शिवराळ भाषा, टोकाची राजकीय भाषा बोलायला लागलात. तुमच्या आंदोलनाचा विषय भरकटला आहे. हे तमाम मराठा समाजाला दिसलेय.