• Download App
    Thackrey brothers fought against BJP; but BJP trounce Ajit Pawar completely ठाकरे बंधू झुंजले; पण पवार फुकटची दमबाजी करून पडले; लोक नाही उरले सांगाती!!

    ठाकरे बंधू झुंजले; पण पवार फुकटची दमबाजी करून पडले; लोक नाही उरले सांगाती!!

    Thackrey brothers

    नाशिक : ठाकरे बंधू मुंबईत झुंजले; ते पराभूत झाले तरी त्यांनी स्वतःची प्रतिष्ठा राखली. मुंबईत ते दोन नंबरची शक्ती ठरले. त्याउलट पवार मात्र फुकटची दमबाजी करून जोरदार आदळले, हेच राजकीय वास्तव महापालिका निवडणुकांमधून समोर आले.Thackrey brothers fought against BJP; but BJP trounce Ajit Pawar completely

    मुंबईत भाजप आणि शिवसेना यांच्या प्रचंड शक्तीशी ठाकरे बंधूंनी जोरदार झुंज दिली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दुप्पट जागा जिंकत मुंबईत तरी आपणच खरी शिवसेना असल्याचे दाखवून दिले. मुंबईत भाजपने एकनाथ शिंदे यांची साथ घेतली. त्याचा फायदा भाजपला झाला. पण त्या तुलनेत भाजपचा फायदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झाला असे दिसले नाही. एकनाथ शिंदे यांच्या साथीने भाजपने मुंबईत ठाकरे बंधूंवर मात करून दाखविली. पण मुंबईतला ठाकरे फॅक्टर मात्र भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊन सुद्धा पूर्णपणे संपवू शकले नाहीत. ठाकरे बंधू मुंबई महापालिकेत एक बळकट विरोधी पक्ष म्हणून उदयाला आले.



    भाजपने जशी एकनाथ शिंदे यांची साथ घेतली तशी ठाकरे बंधूंनी काँग्रेसची साथ घेतली असती किंवा काँग्रेसने ठाकरे बंधूंना साथ दिली असती, तर मुंबईतले राजकीय चित्र काहीसे वेगळे सुद्धा राहू शकले असते. पण ठाकरे बंधू आणि काँग्रेस यांनी एकमेकांपासून फारकत घेतली त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीच्या निकालात दिसला. दोघांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.

    – अजितदादांना दमदाटी भोवली

    त्या उलट अजित पवारांनी कारण नसताना आणि स्वतःची शक्ती नसताना भाजपच्या नेत्यांशी पंगा घेतला. भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांना ते काही बोलू शकले नाहीत. पण अजित पवारांनी अनावश्यक दमदाटी करून महेश लांडगे, चंद्रकांतदादा पाटील, मुरलीधर मोहोळ यांना अंगावर घेतले. अजितदादांनी या नेत्यांना दमदाटी केली. तुमच्याकडे नाही बघितले तर नावाचा अजित पवार नाही, अशी भाषा वापरली. अजित पवारांच्या या दमदाटीला पुणेकरांनी आणि पिंपरी चिंचवडकरांनी चांगलाच दणका दिला. अजित पवारांच्या दादागिरीचा दोन्ही ठिकाणी दणकून पराभव झाला. अजितदादांच्या समर्थकांनी त्यांचे चित्र कायमच भावी मुख्यमंत्री म्हणून रंगविले होते, पण प्रत्यक्षात भाजपच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांनी अजितदादांना पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मातीत लोळविले.

    मुंबईत ठाकरे बंधूंनी भाजपला खऱ्या अर्थाने झुंजविले. त्याउलट अजित पवार भाजपचेच खाऊन भाजपवर उलटले त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी त्यांना दणकून आपटले. या सगळ्या लढाईत शरद पवार नावाचा “फॅक्टर” तर कुठल्या कुठे उडून गेला, हे समजलेच नाही. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे नावाला शरद पवारांचे वारस ठरले पण जनमताचा पाठिंबा कायमचा गमावून बसले.

    – लोक नाही उरले सांगाती

    शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्राचे नाव लोक माझे सांगाती असे ठेवले पण प्रत्यक्षात लोक आता त्यांच्या सांगाती उरले नाहीत, हेच चित्र महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने समोर आले. शरद पवारांनी निवृत्ती जाहीर करून सुद्धा निवृत्ती घेतली नाही. लोकसभेत त्यांनी चांगली कामगिरी करून दाखविली पण विधानसभेत त्यांची मोठी घसरण झाली. महापालिका निवडणुकीत तर त्यांचा पक्ष पूर्णपणे संपुष्टात आल्याचे चित्र दिसून आले. पवारांच्या राजकीय कारकीर्दीच्या अखेरीस हे दारुण चित्र सगळ्या महाराष्ट्राने पाहिले.

    – महेश लांडगेंचा अजितदारांना धोबीपछाड

    शरद पवारांनी स्वाभिमानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस काढली होती. पण पवार कुटुंब फक्त स्वतःचा स्वाभिमान जपत बसले, पण इतरांचा स्वाभिमान त्यांनी दुखावला हाच स्वाभिमानाचा मुद्दा भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड मध्ये उचलला. त्यांना पिंपरी चिंचवडकरांनी चांगली साथ दिली. देवेंद्र फडणवीस यांनी महेश लांडगे यांच्या बाहूंमध्ये चांगले “बळ” भरले. त्यांनी अजित पवारांना धोबीपछाड दिला.

    Thackrey brothers fought against BJP; but BJP trounce Ajit Pawar completely

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे, पवारांसकट सगळ्या विरोधकांना फुकाची बडबड आणि कृतीत आळस या निवडणुकीत नडला!!

    भाजपने अजितदादांना सत्तेच्या वळचणीला घेऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये सुमडीत कोंबडी कापली!!

    मुंबईत ठाकरे बंधूंची कडवी झुंज; पुणे पिंपरी चिंचवड मध्ये पवार काका पुतणे पिछाडीवर!!