नाशिक : शिक्षकांच्या आंदोलनात शरद पवारांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे पोहोचले; राजकीय श्रेय घेण्यात वाटेकरी झाले!!
मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांच्या मध्ये शरद पवार पोहोचले होते. त्याआधी आमदार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी कालच त्या आंदोलनात भाग घेतला होता. त्यामुळे त्या आंदोलनावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची छाया पडली.
ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या कार्यक्रमात आपल्यावर फोकस राहणार नाही म्हणून शरद पवार तिथे गेले नव्हते, पण पवारांच्या राष्ट्रवादीला दुसरा कार्यक्रम हाती नव्हता. त्यामुळे त्यांनी शिक्षकांच्या आंदोलनाची राजकीय संधी साधली. शिक्षकांचे प्रश्न एका दिवसात सोडवायला सरकारला भाग पाडतो, असे आश्वासन दिले. विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळायला लागले, तर त्याचे श्रेय आपल्याला मिळावे, याची राजकीय बेगमी शरद पवारांनी केली.
पण शरद पवारांचा सगळे श्रेय घेण्याचा राजकीय डाव उद्धव ठाकरेंनी उधळून लावला. शरद पवारांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे शिक्षकांच्या आंदोलनात पोहोचले. तिथे त्यांनी भाषण केले. पलीकडे गिरणी कामगार आहेत, इथे शिक्षक आहेत. आपण सगळे मिळून एकवटून भाजपच्या सरकारला असा करंट देऊ, की सत्तेच्या खुर्चीवरून उडून खाली पडले पाहिजेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यातून उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या राजकीय श्रेयातला आपला अर्धा वाटा काढून घेतला.
शरद पवार शिक्षकांच्या आंदोलनात पोहोचल्याने माध्यमांचा “फोकस” त्यांच्यावर गेला होता, पण त्यानंतर उद्धव ठाकरे देखील तिथे पोहोचल्याने तो “फोकस” विभागला गेला.
– ऐक्य मेळाव्याचा फोकस पवारांवर पडू दिला नाही
ठाकरे बंधूंच्या ऐक्य मेळाव्यात मात्र या दोन्ही बंधूंनी राजकीय चतुराई केली. त्यांनी स्टेजवर दोनच खुर्च्या ठेवल्या. त्या खुर्च्यांवर ते स्वतःच जाऊन बसले. त्यांनी कुठल्याही दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना स्टेजवर स्थानच दिले नाही. आपल्याला स्टेजवर स्थान मिळणार नाही हे लक्षात येत शरद पवार त्या मेळाव्याकडे फिरकले देखील नाहीत. त्यांनी सुप्रिया सुळे यांना त्या मेळाव्याकडे पाठवले. पण ठाकरे बंधूंनी सुप्रिया सुळे यांना स्टेजवर स्थान दिले नाही. त्यांना प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत बसविले. भाषणांचा सगळा इव्हेंट संपल्यानंतर त्यांना स्टेजवर बोलावले. पण ठाकरे बंधूंच्या पेक्षा सुप्रिया सुळे यांचे स्थान दुय्यम राहील, याची “राजकीय काळजी” त्यावेळी पुरेपूर घेतली गेली.
पण शिक्षकांचे आंदोलन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या छायेखाली गेलेले पाहताच उद्धव ठाकरे तिथे पोहोचले आणि शरद पवारांच्या राजकीय श्रेया मध्ये अर्धा वाटा घेऊन मोकळे झाले. महाविकास आघाडीतल्या या स्पर्ध्यात्मक राजकारणात काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष मात्र कुठेही दिसला नाही.
Thackeray follows Pawar in teachers’ protest
महत्वाच्या बातम्या
- PM Modi जी BRICS ट्रम्प मोडायला सांगत होते, त्याच BRICS मधून मोदींनी महासत्तांना सुनावले…
- Sri Lanka : श्रीलंकेने म्हटले- कोणत्याही किंमतीत कच्चाथीवू बेट सोडणार नाही; कायदेशीररीत्या ते आमचे
- पूर आला, पण भक्तीचा ओघ नाही थांबला; भर पावसातही गोदावरी मातेची महाआरती संपन्न
- Waqf Rules : वक्फ कायदा-केंद्राने नव्या नियमांची अधिसूचना जारी केली; सर्व वक्फ मालमत्तांची नोंदणी ऑनलाइन होणार