नाशिक : ठाकरे बंधूंच्या एकीच्या गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!, असे म्हणायचे म्हणायची वेळ ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या चर्चेला फुटलेल्या फाट्यांनी आणली.
उद्धव आणि राज ठाकरे यांनी भर उन्हाळ्यात एकमेकांना व्हॅलेंटाईनचे लाल गुलाब देण्यासाठी हात पुढे केले खरे, पण त्या गुलाबांच्या दांड्यांना लांब लांब काटे फुटल्याचे दिसून आले. कारण दोन्ही बाजूच्या सैनिकांनी त्या काट्यांनी एकमेकांना टोचून काढले.
संजय राऊत यांनी सामनात अग्रलेख लिहून उद्धव ठाकरेंच्या “स्वच्छ मनाची” ग्वाही दिली, पण त्याचवेळी राज ठाकरेंना उशिरा शहाणपण सुचले, असे सूचित केले आणि मध्येच महाराष्ट्राच्या लोकभावनेची “तुतारी” फुंकल्याचे लिहून संपूर्ण चर्चेला वेगळेच वळण दिले. राऊतांनी मोदी, शाह आणि फडणवीसांवर आगपाखड जरूर केली, पण लोकभावनेची “तुतारी” लिहून ऐक्यात खरा अडथळा कुणाचा आहे??, याकडे त्यांनी अंगुलीनिर्देश केला.
वास्तविक संजय राऊतांकडे शब्द भांडार कमी नाही. ते कसलेले संपादक आहेत. ते तुतारीच्या ऐवजी बिगुल, ट्रंपेट किंवा शंख फुंकू शकले असते, पण त्यांनी अग्रलेखातून आवर्जून “तुतारी” फुंकली. यातच ठाकरे बंधूंच्या सगळ्या ऐक्याचे “रहस्य” बाहेर आले. दोन्ही ठाकरे बंधूंचे ऐक्य महाराष्ट्रातल्या काही लोकांना नको आहे. त्यामुळे त्यांची पोटदुखी वाढली आहे, अशी मखलाशी संजय राऊत यांनी केली.
पण त्यापूर्वीच मनसेच्या संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या जुन्या आठवणी सांगितल्या. त्या नेमक्या कटू निघाल्या. मनसेच्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर कसे बसवून ठेवले होते, त्यांना भेटच कशी दिली नाही, त्यांचा अपमान कसा केला, हे सगळे संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी उघडपणे सांगितले. असली अभद्र युती व्हायलाच नको असे ट्विट अमेय खोपकर यांनी केले.
ठाकरे बंधूंच्या ऐक्य प्रयत्नांना मनसेमधूनच एवढा विरोध वाढला की, इंडोनेशियातल्या बालीला फिरायला गेलेल्या राज ठाकरे यांना तिथून मनसेच्या नेत्यांना “गप्प राहा” असा संदेश पाठवावा लागला. ठाकरे बंधूंचे ऐक्य हा संवेदनशील विषय आहे. त्याबद्दल 29 एप्रिल पर्यंत काही बोलू नका किंवा बोलायचे असेल तर जपून बोला, असा निरोप राज ठाकरे यांनी बाली मधून पाठविल्याचे प्रकाश महाजन यांना प्रसार माध्यमांना जाहीरपणे सांगावे लागले.
पण दरम्यानच्या काळात ठाकरे बंधूंच्या एकीच्या व्हॅलेंटाईन गुलाबाचे लांब लांब काटेच दोन्ही बाजूच्या सैनिकांनी एकमेकांना येथेच्छ टोचून घेतले.
(व्यंगचित्र : सुमंत बिवलकर)
Thackeray brothers unity rose has more thorns
महत्वाच्या बातम्या