विनायक ढेरे
नाशिक : महापालिकाच काय, पण राज्य ताब्यात घेण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र; त्याच दिवशी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतले अजितदादा मात्र झाले माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष!!, असा विलक्षण राजकीय योगायोग आज घडला.
मराठीचे प्रेम आणि हिंदी सक्तीला विरोध या मुद्द्यांवरून 5 जुलै 2025 रोजी एकत्र येत ठाकरे बंधूंनी ऐक्य मेळावा घेतला. या मेळाव्याला शिवसैनिक आणि मनसैनिकांनी तुफान प्रतिसाद दिला. देशभरातल्या राजकीय वर्तुळात या मेळाव्याचे मोठे पडसाद उमटले. महापालिका ताब्यात घेण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी महापालिकाच काय, पण राज्यही ताब्यात घेऊ. तुम्हाला राज्यावरून हाकलून देऊ, अशी गर्जना केली. ठाकरे बंधूंच्या भाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हिंदी सक्तीचा निर्णय शासनाने मागे घेतला असला तरी आपण एकत्र येऊन त्या निर्णयाला विरोध केला, तर आपल्याला निवडणुकीत काही फायदा होईल, असे त्यांना वाटत असेल, असा टोला अजित पवारांनी ठाकरे बंधूंना हाणला.
पण ऐक्य मेळाव्यातली ठाकरे बंधूंची भाषणे ऐकायला तर सुप्रिया सुळे हजर राहिल्या. ठाकरे बंधूंनी त्यांना खाली प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेमध्ये जागा दिली. नंतर बाकीच्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांबरोबर सुप्रिया सुळेंना स्टेजवर बोलावले.
मात्र, आजच्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदावर निवड झाली. वर्षानुवर्षे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत असलेले, पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री पद न मिळालेले अजितदादा माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादांच्या पॅनलने शरद पवारांनी उभ्या केलेल्या युगेंद्र पवारच्या पॅनलचा पराभव केला. पवारांचे पॅनल तिसऱ्या क्रमांकावर ढकलले गेले. ज्या पोपटराव तावरे यांना पवार काका पुतण्यांनी जोरदार विरोध केला होता, ते तावरे मात्र या निवडणुकीत निवडून आले. त्यांनी अजित पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतला. पण कायदेशीर दृष्ट्या आक्षेप घेण्याची वेळ संपली असे कारण देऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी अजित पवारांची अध्यक्षपदावरची निवड कायम ठेवली. याचा अर्थ तांत्रिक मुद्द्यावर अजित पवारांना अध्यक्षपदी निवडून यावे लागले.
जे सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत कायम राहिले, त्यांनी मुख्यमंत्री होणे सोडून साखर कारखान्याचे अध्यक्ष व्हायला निघालेत, अशी टीका पोपटराव तावरे यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होतीच. ती अजित पवारांनी अध्यक्षपदावर विराजमान होऊन खरी करून दाखविली.
Thackeray Brothers Unity Melava but Ajit pawar malegaon factory president
महत्वाच्या बातम्या
- Sonu Sood : हम बैल भेजते है… लातूरच्या वृद्ध शेतकऱ्याला अभिनेता सोनू सूदने दिली मदतीची ग्वाही
- Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेचा पहिला जथ्था रवाना; जम्मूमध्ये LG मनोज सिन्हा यांनी यात्रेला दाखवला हिरवा झेंडा
- चिनी शस्त्रे बोथट ठरली, पाकिस्तानी सेना हात पसरून अमेरिकेच्या दारात पोहचली!!
- Gujarat High Court : व्हर्च्युअल सुनावणीत वरिष्ठ वकिलांनी बिअर प्यायली; गुजरात हायकोर्टातील घटना