राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांना एक मुलाखत काय दिली आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी लगेच जाहीर भाषणातून प्रतिसाद काय दिला, तर लगेच राजकीय वर्तुळात आणि मराठी माध्यमांमध्ये ठाकरे बंधू एकत्र आणि आखाड ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!, अशी अवस्था झाली. राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून ठाकरे बंधूंना चर्चेच्या केंद्रस्थानी आणून ठेवले. मराठी माध्यमांमधल्या “ठाकरे पवार बुद्धीच्या” विश्लेषकांनी दोन्ही बंधूंच्या ताकदीच्या बेटकुळ्या प्रचंड फुगल्याचे विश्लेषण केले.
आता जणू काही ठाकरे बंधू खरंच एकत्र आले आणि त्यांनी मुंबई सह ठाणे, डोंबिवली वगैरे महापालिकांवर ऐक्याचे झेंडे फडकवले. शिवसेना-भाजप युतीचे घामटे निघाले. महाविकास आघाडीचे जहाज फुटले, अशा बातम्यांनी मराठी माध्यमे भरून गेली.
मात्र प्रत्यक्षात यातले काहीही घडले नाही. तसे घडण्याची सुताराम शक्यता नाही. कारण उद्धव ठाकरेंच्या शेजारी संजय राऊत आहेत आणि राज ठाकरे यांच्या शेजारी संदीप देशपांडे बसलेत. मूळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे हा आता केवळ भावनिक मुद्दा उरलेला नाही. शिवसेना आणि मनसे हे जरी मूळात राजकीय व्यवहारापेक्षा राजकीय भावनांवर चालणारे पक्ष असले तरी ठाकरे बंधूंच्या एकत्रित करण्याच्या राजकारणात केवळ दोन बंधूंचे भांडण किंवा मनोमिलन हा एकच फॅक्टर नाही, तर त्या पलीकडे जाऊन अनेक गुंतागुंतीचे फॅक्टर त्यात अडकले असल्याने ठाकरे बंधूंचे एकत्र येणे किंवा आहे तसेच वायले म्हणजे वेगळे राहणे ठरणार आहे.
– किती अडथळे??
उद्धव ठाकरे यांच्या राजकीय आणि वैयक्तिक अहांकारातून शिवसेना अनेकदा फुटली. त्या प्रत्येक वेळी पॉलिटिकल पॅचअपचे प्रयत्न झालेच होते, पण ते उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक वेळी फेटाळून लावले. ठाकरे बंधू एकत्र येण्याचे वेगवेगळे निकष लावून आज जे बोलले जातेय, ते त्यावेळी देखील बोलले गेले होते. पण उद्धव ठाकरेंनी कुठल्याच आणि कुण्याच्याच जवळच्या नेत्याचे काही ऐकले नव्हते आणि ऐक्य घडवून ताकद – बिकद वाढवण्याच्या फंदात ते पडले नव्हते. संदीप देशपांडे यांनी या अनुभवाचे कथन माध्यमांवर केले. 2017 आणि 2019 मध्ये शिवसेना मनसेची युती व्हायची वेळ आली होती, चर्चा पण झाली होती, पण नंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने राज ठाकरे यांच्या बाजूचे फोन घेणे बंद करून टाकले होते. आता दोनदा अशी जीभ बोलणारे अनुभव आल्यानंतर उद्धव ठाकरेंकडे कोण युती करायला जाणार?? आणि कोण पुन्हा उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवणार??, असे सवाल त्यांनी केले. अर्थातच राज ठाकरे यांच्या ऑफरला संदीप देशपांडे यांनी आपल्या स्टाईलने खोडा घालून ठेवला.
तिकडे संजय राऊत यांनी जरी उद्धव ठाकरेंची शिवसेना राज ठाकरेंची ऑफर नाकारण्याचा करंटेपणा करणार नाही, असे म्हटले असले तरी खुद्द उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघे शिवसेनेचा निर्णय घेण्याइतपत मुखत्यार उरलेले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या आसपास आणि घरात खुट्ट वाजले तरी ते सिल्वर ओक वर आपोआप कळते कारण “सिल्वर ओक”ने संजय राऊत यांच्यामार्फत तशी व्यवस्था करून ठेवलीय. त्यामुळे राज यांच्याबरोबर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने युती करणे यामध्ये “सिल्वर ओक”च्या “पॉलिटिकल इंटरेस्टचे” काय, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या घरांमध्ये फूट पाडणे आणि त्यातून आपले राजकारण साधून घेणे यात “सिल्वर ओक”चे राजकीय आयुष्य अगदी आता उत्तरार्धापर्यंत येऊन ठेपलेय.
खुद्द “सिल्वर ओक”ला महाराष्ट्राच्या राजकारणात आता काही मिळायची शक्यता नाही, म्हणूनच तर त्यांनी पुतण्याला भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पाठवून देऊन ते मोकळे झाले. आता ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर “सिल्वर ओके”चे उरले सुरलेले राजकारण गाळात जाईल, मग सिल्वर ओक संजय राऊत यांच्या मार्फत ठाकरे बंधूंमध्ये नव्या काड्या घातल्याशिवाय राहणार नाहीत.
भले ठाकरे बंधूंचे राजकीय अस्तित्व आज पणाला लागले असेल, म्हणून राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना मुलाखत देऊन उद्धव ठाकरे यांना युतीची हाळी घातली असेल, आणि उद्धव ठाकरेंनी त्या हाळीला लगेच टाळी देण्याची कबुली दिली असेल तरी प्रत्यक्षात ठाकरे बंधू एकत्र येऊन शिवसेना आणि मनसेच्या युतीचे घोडे महाराष्ट्रातल्या कुठल्याही नदीत न्हाहण्यासाठी अजून बऱ्याच मैलांची राजकीय रपेट मारावी लागेल. नुसते ठाकरे बंधू “एकत्र आणून” अफाट ताकदीच्या कल्पनांचे पंख फुटून चालणार नाहीत. कारण कल्पनेच्या पंखांनी प्रत्यक्षात कधी उडता येत नाही!!
Thackeray brothers political alliance nearly impossible
महत्वाच्या बातम्या
- Anurag Thakur ‘भ्रष्टाचाराच्या मॉडेलचा हा एक नवा अध्याय आहे’, भाजपचा टोला!
- ”भ्रष्टाचार अन् काँग्रेस हे समानार्थी शब्द आहेत” नॅशनल हेराल्ड प्रकरणात छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव यांनी टोमणा मारला
- तिकडे पाकिस्तानचा लष्कर प्रमुख देतोय भारताला धमकी; इकडे RAW चे माजी प्रमुख करताहेत भारत – पाकिस्तान चर्चेची वकिली!!
- Terrorist Pasia : अमेरिकेत दहशतवादी पासियाला अटक; पंजाबमधील ग्रेनेड हल्ल्याचा मास्टरमाइंड, पाकिस्तानच्या ISI शी संबंध