विशेष प्रतिनिधी
पुणे : Suresh Dhas संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीड आणि परभणीनंतर रविवारी पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत मोठा दावा केला आहे. पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर बैठक झाली होती. नंतर निवडणुकीसाठी या कंपनीकडून 50 लाख रुपये घेण्यात आले, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला. तसेच ही माहिती खोटी निघाली, तर मी राजकारण सोडेन, असे आव्हानही धस यांनी दिले.Suresh Dhas
मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आणि आरोपींना कठोर शिक्षेच्या मागणीसाठी राज्यात मोर्चे काढले जात आहे. आज पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावेळी केलेल्या भाषणात बोलताना सुरेश धस यांनी उपरोक्त दावा केला. हा दावा करताना सुरेश धस यांनी तारखांचा देखील उल्लेख केला. तसेच धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढावे, अशी मागणी देखील सुरेश धस यांनी यावेळी केली.
काय म्हणाले सुरेश धस?
14 जून रोजी अवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मीक कराड, नितीन बिक्कड यांची मुंडेंच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर थेट धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी अवादा कंपनीच्या शुक्ला नावाचा अधिकारी मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्याकडे प्रयत्न करत होते. मला डावलून थेट धनंजय मुंडेंची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याने ही बाब वाल्मीक कराडला खटकली. त्यामुळे वाल्मीकने जोशीला खडसावले. Suresh Dhas
त्यानंतर 19 जून रोजी आवादा कंपनी आणि आय एनर्जी या कंपनीच्या अधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना ही बाब फोनवर सांगितली. वरिष्ठांनी 3 कोटींऐवजी 2 कोटी रुपये देण्याची सहमती दाखवली. त्यानंतर निवडणुकीसाठी आता लगेच 50 लाख रुपये द्या, अशी मागणी कंपनीकडे करण्यात आली आणि कंपनीने यांना 50 लाख रुपये दिले. हे पैसे तेव्हा धनंजय मुंडेंनी घेतले की वाल्मीक कराड याने हे मला माहीत नाही. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी बैठका झाल्या, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
अजितदादा तुमचे यांच्याकडे काय अडकलंय?
सुरेश धस यांनी यावेळी अजित पवारांचे कौतुक करत त्यांच्याकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. अजित दादा तुमचं यांच्याकडे काय अडकले आहे. यांना बाहेर जाऊ दे, अरे बाबा सातपुडा सरकारी बंगल्यावर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, तर मी चॅलेंज देतो. राजकारण सोडून देईल, असे आव्हान धस यांनी दिले. मी राजकारणात राहणार नाही, पण अजित पवार, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही सर्वांनी मिळून या गोष्टीचा छडा लावा, अशी मागणी धस यांनी केली. या गोष्टी जर खऱ्या असतील तर काही दिवस जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही, तोपर्यंत त्याला बाहेर काढा. आमची मागणी आहे. सरकारच्या बाहेर त्यांना ठेवा. त्यांच्याकडून राजीनामा घ्यायचा नसेल तर त्यांना बिन खात्याचा मंत्री करा. सगळ्यात सोपं राजीनामा द्यायला सांगा, असेही सुरेश धस म्हणाले.