• Download App
    सुप्रिया सुळे म्हणतात, हेडगेवारांच्या नावाने मते मिळत नाहीत म्हणून यशवंतरावांचे फोटो लावतात!!; पण ते फोटो लावून तरी किती मते मिळतात?? Supriya sule unnecessarily compared dr. Hedgewar and y b chavan in electoral politics

    सुप्रिया सुळे म्हणतात, हेडगेवारांच्या नावाने मते मिळत नाहीत म्हणून यशवंतरावांचे फोटो लावतात!!; पण ते फोटो लावून तरी किती मते मिळतात??

    शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यात केलेल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव घेतले. हेडगेवार यांचे नाव वापरून मते मिळत नाहीत म्हणून त्यांना यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावावा लागतो आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे, असे खोचक उद्गार त्यांनी त्या मेळाव्यात काढले. अर्थातच त्यांच्या या वक्तव्याला यशवंतराव चव्हाण मधल्या सेंटर मधल्या महिला कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. Supriya sule unnecessarily compared dr. Hedgewar and y b chavan in electoral politics

    राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आयोजित केलेला तो पहिला कार्यक्रम होता. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचे जोरदार भाषण झाले. पण त्या भाषणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचे नाव निवडणुकीच्या राजकारणात अनावश्यक ओढले.

    वास्तविक पाहता डॉ. हेडगेवार हे कधीच निवडणुकीच्या राजकारणातले व्यक्तिमत्व नव्हते. एक तर सुप्रिया सुळे आणि त्यांचा पक्ष किंवा त्यांचे राजकीय गुरु आणि पूर्वसूरी जेव्हापासून निवडणूक लढवतात आणि ज्या निवडणुका लढवत आहेत, ते निवडणुकीचे राजकारण भारतात सुरू होण्यापूर्वीच डॉ. हेडगेवार यांचे निधन झाले होते. त्यामुळे डॉ. हेडगेवार यांचे नाव घेऊन कुणाला मते मिळतात का नाही??, हा खरं म्हणजे अप्रस्तुत मुद्दा होता, पण तो सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर डॉ. हेडगेवार यांचा फोटो लावून कोणत्या पक्षाने केव्हा मते मागितली??, याचा संदर्भ सुप्रिया सुळे यांनी चतुराईने दिला नाही.

    वास्तविक डॉ. हेडगेवार यांचा फोटो लावून कोणत्याही राजकीय पक्षाने कधीही स्वतःसाठी मते मागितल्याचा मूळात इतिहासच नाही. कारण डॉ. हेडगेवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यापूर्वीपासून काँग्रेसचे सदस्य होते. लोकमान्य टिळकांचे राजकीय अनुयायी होते, हे जरी खरे असले तरी त्यांनी निवडणुकीच्या राजकारणामध्ये सध्याच्या राजकीय अर्थाने कधीही सहभाग घेतला नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वरूप देखील त्यांनी सुरुवातीला राजकीय ठेवलेच नव्हते. डॉक्टरांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात काम करताना जंगल सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवास भोगला, पण त्यावेळी त्यांनी सरसंघचालक पद सोडले होते. तो त्यांच्या तत्त्वनिष्ठेचा भाग होता. त्याविषयी मतभिन्नता होऊ शकते, पण त्या मतभेदांचा आणि सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या डॉ. हेडगेवार यांचे फोटो लावून मते मिळत नाहीत या मुद्द्याचा कोणत्याच अर्थाने एकमेकांशी संबंध लावता येत नाही.

    पण ही झाली विशिष्ट बौद्धिक उंचीची मांडणी. फक्त निवडणुकीचे राजकारण करणाऱ्या नेत्याच्या ही मांडणी लक्षात येणे तसे कठीणच आहे. कारण प्रत्येक राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ फक्त निवडणुकीच्या चष्म्यातून बघायची एखाद्याची राजकीय संस्कृती असेल, तर त्याला इलाज नसतो.

    पण त्या पलीकडे जाऊन सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावावा लागतो, हे जे उद्गार काढलेत, त्याविषयी देखील काही मुद्दे निश्चित मांडता येतील. डॉ. हेडगेवार यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि जे अनुयायी आहेत, ते आज भाजप सह अन्य काही पक्षांमध्ये राजकीय कार्यकर्ते आणि नेते म्हणून काम करतात. त्यांनी कधी आपल्या निवडणूक प्रचारात यशवंतरावांचे फोटो लावून मते मागितल्याची उदाहरणे आहेत काय?? असलीच तर ती तुरळक आणि क्वचितच सापडतील, पण त्याही पलीकडे जाऊन संघ परिवारातील आधीचा जनसंघ आणि सध्याचा भाजप यांनी कधीच यशवंतराव चव्हाण यांचा फोटो व्यासपीठावर लावून जनतेकडे मते मागण्याचा कधी प्रश्नच उद्भवला नव्हता, ही वस्तुस्थिती आहे.

    मग यशवंतराव चव्हाण यांचे फोटो कोण लावतो??, तर ते पक्ष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट… त्या पलीकडे शिवसेनेचे दोन गट किंवा बाकीचे कोणतेही पक्ष कधीच यशवंतरावांचे फोटो लावून मते मागत नाहीत. महाराष्ट्र सोडून देशात इतर राज्यांमध्ये यशवंतरावांचे फोटो लावून मते मागण्याचा आणि ती मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

    शिवाय सध्याच्या काँग्रेस पक्षात आणि 1980 मध्ये ज्या इंदिरा काँग्रेस पक्षात यशवंतरावांनी पुनर्प्रवेश केला, त्या पक्षाने यशवंतरावांचे फोटो लावून मते मागितल्याचा फारसा इतिहास आणि वर्तमान नाही. कारण मूळात ज्या पक्षाचे ब्रॅण्डिंगच इंदिरा गांधींच्या, राजीव गांधींच्या आणि त्यानंतर सोनिया गांधींच्या नावाने झाले, तो पक्ष यशवंतरावांचे फोटो लावून मते मागील हे संभवत नाही.

    पण एक बाब निश्चित, की काँग्रेस पक्षात जे अनेक नेत्यांचे फोटो लावले जातात, त्यामध्ये यशवंतरावांचा फोटो ठळक स्थानी असतो हे खरे… पण यशवंतराव चव्हाण यांचा एकमेव फोटो लावून त्या फोटोवर आधारित मते मागितली जातात ही मात्र बिलकूल वस्तुस्थिती नाही.

    त्यापलीकडे खुद्द यशवंतरावांनी ज्यावेळी इंदिरा गांधी यांच्यापासून राजकीय फारकत घेऊन महाराष्ट्रात चव्हाण – रेड्डी काँग्रेस काढली होती, त्या दोन वर्षांमध्ये म्हणजे 1978 आणि 1980 या दोन निवडणुकांमध्ये जेव्हा स्वतःचे ठळक फोटो लावून स्वतःच्या चव्हाण – रेड्डी काँग्रेससाठी मते मागितली होती, त्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना किती मते दिली होती??, त्याची आकडेवारी आज उपलब्ध आहे.

    1978 च्या विधानसभा निवडणुकीत चव्हाण – रेड्डी काँग्रेसला 24 % मते मिळून विधानसभेच्या 288 पैकी 69 जागा मिळाल्या होत्या, तर लोकसभेत फक्त स्वतः यशवंतराव चव्हाण हे एकमेव उमेदवार निवडून आले होते.

    1980 च्या निवडणुकीत याच चव्हाण – रेड्डी काँग्रेसला 16 % मते मिळून त्यांचे 47 आमदार निवडून आणता आले होते. यशवंतराव चव्हाणांचे फोटो लावून मागितलेल्या मतांची ही आकडेवारी आहे.

    बाकी राष्ट्रवादी काँग्रेसने यशवंतराव चव्हाण यांचे फोटो आपापल्या पोस्टर्सवर लावले यात कुठलीही शंका नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसचा 1999 ते 2023 यातला राजकीय परफॉर्मन्स विधानसभेत डबल डिजिटच्या पलीकडे आणि लोकसभेत सिंगल डिजिटच्या पलीकडे गेला नाही हे सांगण्यासाठी वेगळ्या संशोधनाची गरज नाही!!

    त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यात डॉ. हेडगेवार आणि यशवंतराव चव्हाण या दोन महान नेत्यांची केलेली तुलना अतिशय अप्रस्तुत किंबहुना पूर्णपणे गैरलागू ठरते हे मात्र निश्चित!!

    Supriya sule unnecessarily compared dr. Hedgewar and y b chavan in electoral politics

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस