नाशिक : शरद पवारांचे “हे” टेक्निक आत्मसात करायचा (शप) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे Supriya sule यांचा डाव, पण…!!, हे शीर्षक वाचून कोणते टेक्निक आणि ते का आत्मसात करायचा कोणता डाव??, असा सवाल कोणाच्याही मनात येणे स्वाभाविक आहे. कारण पवारांची अशी अनेक टेक्निक्स आहेत, की ज्या टेक्निक्स मुळे पवार तब्बल ६० वर्षे सार्वजनिक जीवनात वावरू शकले आणि मराठी माध्यमांमध्ये चर्चा घडवू शकले. आता त्यातली “यशस्वी” वर्षे किती आणि बाकीची वर्षे किती??, त्याचे मोजमाप प्रत्येकजण अलग करू शकेल, पण पवार विशिष्ट टेक्निक्सने कायम सार्वजनिक चर्चेत राहिले हे मात्र मान्यच करावे लागेल. नेमके पवारांचे “हेच” टेक्निक सुप्रिया सुळे यांनी आत्मसात करायचा प्रयत्न चालविल्याचे समोर आले.
सुप्रिया सुळे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना बरोबर घेऊन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीला राजकीय दृष्ट्या महत्त्व असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या. त्याला बीडच्या घटनांची राजकीय फोडणी दिली, पण सुप्रिया सुळे यांनी वेगळ्याच कारणासाठी अमित शाह यांची भेट घेतली आणि त्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सोशल मीडिया पोस्ट केली. यातून सुप्रिया सुळे यांनी आपली सामाजिक जाणीव किती “प्रगल्भ” आहे हे दाखवायचा प्रयत्न केला.
नेमके पवारांचे “हेच” टेक्निक सुप्रिया सुळे यांनी आत्मसात करायचा डाव आखल्याचे निदर्शक ठरले.
शरद पवार ज्यावेळी सत्तेवर होते, त्यावेळी त्यांनी कोणाच्या भेटीगाठी घेतल्या, तर त्याच्या बातम्या होणे स्वाभाविक होते. पण पवार ज्यावेळी सत्तेवर नसायचे, त्यावेळी मात्र अनेकदा पवार अशा काही भेटीगाठी अशा “पॉलिटिकल टायमिंगला साधून घ्यायचे, की त्यातून पवार चर्चेच्या केंद्रस्थानी यायचे. उदाहरणच द्यायचे झाले, तर नरेंद्र मोदींनी 2007 ची गुजरात निवडणूक जिंकली, त्यादिवशी शरद पवार हे बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर गेले. नरेंद्र मोदींसाठी राजकीय अस्तित्वाची निवडणूक त्यांनी जिंकली होती. सगळ्या भारतभर त्याच्या मोठमोठ्या हेडलाईन्स झाल्या, पण महाराष्ट्रात मात्र मोदींच्या विजयाबरोबरच पवार – ठाकरे भेट या बातमीला देखील तितकेच महत्त्व मिळाले होते. पण हा झाला जरा जुना इतिहास!!
अगदी अलीकडे ज्या वेळी पवारांच्या हातातून 2014 साली कायमची सत्ता निसटली, त्यावेळी पासून आज पर्यंत पवार साधारण काही महिन्यांच्या अंतराने पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीगाठी घेत राहिले. महाराष्ट्रातले साखर कारखानदार, ऊस उत्पादक बिल्डर यांच्या समस्या या दोन बड्या नेत्यांपुढे मांडत राहिले. 2019 ते 2022 या अडीच वर्षांमध्ये पवारांनी महाराष्ट्रातील सत्ता चक्रे फिरवली होती. त्यामुळे त्याचा विशिष्ट गौरव “पवार बुद्धीच्या” माध्यमांनी देशभर चालविला होता, पण पवारांची ती सत्ता अवघ्या अडीच वर्षांमध्ये उधळली गेली आणि पवारांना पुन्हा जुने टेक्निक वापरणे भाग पडायला लागले. पवारांनी पुन्हा पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची वेगवेगळ्या कारणांसाठी भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्या बातम्या मराठी माध्यमांमधून प्रस्तृत होत राहिल्या. पवारांची मोदींशी आणि अमित शाह यांच्याशी कशी जवळीक आहे, मोदी पवारांना आपले राजकीय गुरू कसे मानतात, वगैरे रसभरीत बातम्यांनी मराठी माध्यमे रंगली. अगदी मध्यंतरी पवारांनी डाळिंब उत्पादकांच्या बरोबर मोदींची फक्त पाच मिनिटे भेट घेतली होती, पण तेव्हाही मराठी माध्यमांनी त्या भेटीच्या बातम्या रसभरीत रंगवल्या होत्या.
त्यातच दिल्लीचे साहित्य संमेलन पवारांनी स्वतःभोवती फिरवून घेतले. उद्धव ठाकरेंची गरज संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधण्यासाठी त्यांना महादजी शिंदे पुरस्कार देऊन मोकळे झाले. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या व्यासपीठावर पंतप्रधान मोदींनी पवारांना पाण्याचा ग्लास भरून दिला. त्यावेळी मराठी माध्यमांनी पवारांना पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आणून ठेवले. Supriya sule
पण त्या पलीकडे जाऊन नीट पाहिले, तर पवारांच्या “त्या” टेक्निकचे खरे रहस्य उलगडेल. पवारांच्या या टेक्निकच्या गेमा अशा राहिल्यात, की आपण महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रश्नासाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांशी संपर्क करण्यापेक्षा केंद्रातल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची थेट संपर्क साधू शकतो, हे पवार दाखवून देतात. त्यातून राज्यातल्या भाजपच्या नेत्यांना आपण “मोजत” नाही. आपण जे काही करतो ते “वरूनच” करतो, हे पवार सूचित करतात. शिवाय त्यातून काँग्रेसच्या केंद्रातल्या नेत्यांना चिमटा काढणे देखील साध्य होते. Supriya sule
– शाह + फडणवीस काय हातावर हात धरून बसतील??
पवारांचे नेमके “हेच” टेक्निक सुप्रिया सुळे यांनी आत्मसात करायचा प्रयत्न चालू केलाय. महाराष्ट्रातले प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेण्यापेक्षा ते थेट आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे नेऊन सोडवू, असे दाखविण्याचा सुप्रिया सुळेंचा प्रयत्न आहे. पण मोदींच्या “विशिष्ट सौजन्यामुळे” पवारांचे “ते” टेक्निक काही अंशी यशस्वी ठरले, पण सुप्रिया सुळे यांचे मात्र आपल्या वडिलांचे टेक्निक चालू ठेवण्याचे प्रयत्न यशस्वी ठरतीलच याची कुठलीही गॅरंटी नाही. कदाचित अमित शाह यांनी पहिल्यांदा सुप्रिया सुळे यांना आणि बजरंग सोनवणे यांना भेट दिली देखील असेल, पण त्याचा राजकीय वापर जर महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांना खाली पाहायला लावणारा ठरणार असेल, तर अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस ही जोडगोळी सुप्रिया सुळे यांना “नीट” जागेवर आणल्याशिवाय राहणार नाही. कारण मोदी पवारांना दाखवत असलेले “सौजन्य” अमित शाह किंवा फडणवीस यांनी सुप्रिया सुळेंना दाखविलेच पाहिजे, एवढी सुप्रिया सुळे यांची राजकीय उंची नाही आणि महत्त्व तर बिलकुलच नाही!!
Supriya sule trying to adopt technique of Sharad Pawar to remain in political discussion
महत्वाच्या बातम्या