विशेष प्रतिनिधी
पुणे : बारामतीत रंगलेल्या काका विरुद्ध पुतण्या आणि नणंद विरुद्ध भावजय या लढाईला खासदार सुप्रिया सुळे यांनी वैचारिक लढाईची डूब देण्याचा प्रयत्न चालवला असताना प्रत्यक्षात त्या देखील नात्यागोत्यांच्याच कर्दमात अडकल्याचे दिसत आहे. अजितदादांनी तुम्ही पवारांच्या बाकी सगळ्यांना निवडून दिले. आता पवारांच्या सुनेला निवडून द्या, असे म्हटल्याबरोबर शरद पवारांनी पवारांच्या सुनेला “बाहेरून आलेली पवार” असे संबोधले. त्यामुळे बारामतीत प्रचंड वाद उसळला. अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, त्यावर आपली लढाई वैयक्तिक नाही, तर वैचारिक आहे, असा दावा करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी मात्र पवारांच्या घरातली कुठली सासू निवडणुकीच्या रिंगणात उतरली??, असा सवाल केला आहे. याचा अर्थ पवारांच्या मुलीने निवडणूक रिंगणात उतरले तर चालते, पण पवारांच्या घरात असलेल्या सासूने मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे नाही, असेच सुप्रिया सुळेंना म्हणायचे असल्याचे स्पष्ट झाले. Supriya sule targets ajit pawar over his remarks on daughter and daughter in law
अजित पवार यांनी बुधवार चार दिवस सासूचे संपले, आता चार दिवस सुनेचे येऊ द्या, असे वक्तव्य केले होते. बारामतीमध्ये येऊन सुनेत्रा पवार यांना 40 वर्ष झाली तरी बाहेरचे म्हणत आहेत, असाही जोरदार टोला अजित पवार यांनी शरद पवार यांना लगावला होता. त्याला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. पवार यांच्या घराण्यातील कोणती सासू निवडणूक लढवली??, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या :
पवारांच्या कुटुंबातील कोणत्या सासूने निवडणूक लढविली?? माझ्या आईला फोटो काढलेले ही आवडत नाही. माझी कोणती ही काकी अथवा आई (सासू) कधी राजकारणात आलेली नाही. आशा काकी, सुमिती काकी, भारती काकी आणि माझी आई अशी कोणतीही सासू राजकारणात आल्या नाहीत. या सर्व आपले खासगी जीवन जगल्या आहेत, असे उत्तर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर दिले.
बारामतीच्या समस्यांना जबाबदार कोण?
बारामतीमधील अनेक प्रश्न कायम आहे. मतदार संघात अनेक समस्या आहेत, असे अजित पवार म्हणाले होते. त्याला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, गेली ३५ वर्षे आमदार कोण आहेत, १८ वर्षे पालकमंत्री कोण आहेत. तेव्हा आम्ही एकाच पक्षात होतो. ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यांनी विकास केला नाही. अजित पवार मतदान देण्याबाबत जे बोलले त्याबद्दल माझं एकच मत आहे. राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी.
निवडणुकीनंतर पवार कुटुंबातील नाती पूर्ववत होतील, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले होते. त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी कोणासोबतच नाती बिघडत नाहीत. माझी सर्वांशी नाती चांगली आहेत. राजकारणामुळं माझ्या नात्यासंबंधात परिणाम होत नाही.
सुप्रिया सुळे यांनी पवारांच्या घरातली कुठली सासू निवडणुकीत उतरली??, असा सवाल केला असला, तरी प्रत्यक्षात शरद पवारांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळे यांच्या आई प्रतिभा पवार या प्रचारात उतरल्याचे दिसून आले त्यावर अजितदादांनी मी प्रतिभा काकींना प्रचारात पाहिल्याने डोक्यावर हात मारला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.