विशेष प्रतिनिधी
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती उरली नाही. पण आंबेडकरांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा दिला आहे. Support to Shahu Maharaj in Kolhapur prakash ambedkar
उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी मोठी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आता महाविकास आघाडीसोबत जमले तरच युती. नाही तर युती नाही, अशी घोषणाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकर ठाकरेंसोबतच्या युतीतून आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यास पुन्हा एकदा राज्यातील राजकीय समीकरणांची फेरमांडणी होणार आहे. आंबेडकरांच्या या निर्णयाने महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीचं भिजत घोंगडं आहे. त्यांच्या जागा वाटपाचा तिढा असूनही सुटलेला नाही. त्यामुळे आम्ही येत्या 26 मार्च रोजी आमची भूमिका जाहीर करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रकारे महाविकास आघाडीला तीन दिवसांचा अल्टिमेटमच दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा या तीन दिवसात सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचे कोल्हापुरातील उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.
शाहू महाराजांना पाठिंबा
कोल्हापूरमध्ये आमची चांगली ताकद आहे. पश्चिम महाराष्ट्रातही आमची ताकद आहे. काँग्रेसने कोल्हापुरातून शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत. शाहू महाराजांची विचारसरणी आणि आमची विचारसरणी जवळची आहे. त्यामुळे आम्ही शाहू महाराज यांना पाठिंबा देत आहोत. शाहू महाराज यांना निवडून आणण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत. मागे जे घडलं ते पुन्हा घडू नये याची आम्ही खबरदारी घेणार आहोत, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले.
आमचेच घोंगडं भिजत
प्रकाश शेंडगे यांनी घेतलेल्या भेटीवरही त्यांनी भाष्य केले. शेंडगे यांनी नवीन पक्ष सुरू केला आहे. आमचेच घोंगडे भिजत पडले आहे. ते अंतिम झाल्याशिवाय तुमच्याशी चर्चा करू शकत नाही, असे आम्ही त्यांना सांगितले आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
कोडी टाकण्याचे काम सुरू
महाविकास आघाडीचे झाकलेले कोंबडे आता कुठे बांग देऊ लागले आहे. त्यांचेच भांडण संपत नाही. त्यांचाच तिढा सुटत नाही. मग आमची एन्ट्री करून काय करायचे?? आम्ही 26 तारखेपर्यंत थांबणार आहोत. आम्ही त्यांना 7 जागा सांगितल्या आहेत. आम्ही पूर्ण थांबलोय असे नाही. आम्ही एक पत्र काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दिले आहे. नाना पटोले यांनाही दिले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचं सात जागांवर एकमत झालं तर बरं होईल. आम्ही नंतर निर्णय घेऊ. आम्हाला जे कळवायचे ते आम्ही मतदारांना कळवले आहे. महाविकास आघाडीचं काय होतं ते आम्ही पाहू. त्यानंतर 26 तारखेला आमची भूमिका स्पष्ट करू, असे आंबेडकर यांनी जाहीर केले.