नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार; उपमुख्यमंत्री होणार (“मूळच्या पवार” नव्हे), तर “बाहेरून आलेल्या पवार”!!, हे राजकीय वास्तव आज 31 जानेवारी 2026 रोजीच्या प्रचंड घडामोडीनंतर समोर आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाने सुनेत्रा अजित पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली. त्यांच्या नावाचा प्रस्ताव आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मांडला तर मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. या सगळ्यांनी एकमताने सुनेत्रा पवार यांच्या विधिमंडळ गटनेते पदावर शिक्कामोर्तब केले.
त्यामुळे आता सुनेत्रा अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्या सायंकाळी 5.00 वाजता लोकभवनातल्या साध्या समारंभात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यामुळे शरद पवारांच्या घराण्यातील व्यक्तीच पुन्हा एकदा महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री होईल, पण ती “मूळची पवार” नसेल, तर “बाहेरून आलेली पवार” असेल.
– पवारांनीच चिकटवले होते ते “बिरुद”
सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळेल पण त्यांचे वर्णन “बाहेरून आलेल्या पवार” असे करायचे कारण त्यांना खुद्द शरद पवारांनीच ते “बिरुद” चिकटवले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ज्यावेळी सुनेत्रा अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून उभे राहिल्या त्यावेळी शरद पवारांनी त्या “मूळच्या पवार” नाहीत, तर त्या “बाहेरून आलेल्या पवार” आहेत, असे शरसंधान साधले होते. सुप्रिया सुळे या “मूळच्या पवार” असल्याने त्यांना मतदान करा, असे आवाहन शरद पवारांनी केले होते. त्यावेळी शरद पवारांवर चहूबाजूंनी टीका झाली होती. परंतु, पवारांनी आपले वक्तव्य मागे घेतले नव्हते.
– पवारांची पत्रकार परिषद
आज सुद्धा सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड होण्यापूर्वी शरद पवारांनी वेगळ्या मार्गाने त्यांच्या मार्गात किंवा नेतृत्वात अडथळा आणायचा प्रयत्न केलाच होता. सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्याशी चर्चा केली नाही. त्यांच्या शपथविधी विषयी आपल्याला काही माहिती नाही, असे जाहीर वक्तव्य पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन केले होते. याच पत्रकार परिषदेतून त्यांनी राष्ट्रवादीच्या ऐक्याची पुरी देखील सोडली होती. 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याचे ठरले होते. अजित पवार तशी घोषणा करणार होते. आता ऐक्याची चर्चा थांबलेली दिसते, असे वक्तव्य पवारांनी केले होते.
– 17 जानेवारीच्या व्हिडिओचा दंभस्फोट
त्यानंतर पवारांच्या घरी झालेल्या 17 जानेवारीच्या एका बैठकीचा व्हिडिओ पवारांच्या गोटातून सोशल मीडियावर सोडण्यात आला. हा ऐक्याच्या बैठकीचा पुरावा आहे त्यात अजित पवार शरद पवार जयंत पाटील शशिकांत शिंदे वगैरे नेते दिसत आहेत. असे त्या व्हिडिओच्या माहितीतून सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात ती बैठक जिल्हा परिषद निवडणूक एकत्र काम करण्यासाठी होता. याचा खुलासा अजित पवारांनीच बारामतीतल्या पत्रकार परिषदेत केला होता, अशी माहिती सुनील तटकरे यांनी देऊन शरद पवारांचा दावा खोडला.
– पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला
याच दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून पार्थ पवार यांना शरद पवारांच्या घरी त्यांच्या भेटीला पाठविण्यात आले त्यांना सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले. त्यावेळी पार्थ पवार यांनी शरद पवारांची समजूत काढल्याचे बोलले गेले त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी सुद्धा चर्चा केल्याचे सांगितले गेले. पण हे सगळे पवारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर घडवून आणण्यात आले. पवारांना आधी कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ती माहिती देण्यात आली. ही वस्तुस्थिती दुपारपर्यंत महाराष्ट्रासमोर आली.
– खोडा घालण्याचा पवारांचा प्रयत्न उधळला
आज दुपारपर्यंत घडलेल्या सगळ्या घडामोडीतून शरद पवारांनी “डाव” टाकून सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाच्या निवडीत खोडा घालायचा प्रयत्न केला होता. त्या प्रयत्नांना मराठी माध्यमांनी सुद्धा साथ दिली होती, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले सगळेच नेते आपल्या मूळ निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेते पदी निवड केली.
Sunetra Pawar elected as NCP Legislative Party Leader, to take oath as Deputy CM today
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या ऐक्याचे त्रांगडे, मुख्य नेतृत्वाचा पेच; दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची खेचाखेच; पवारांच्या एकछत्री अंमलाला सुरुंग!!
- India-EU FTA : केंद्राने EUच्या सफरचंदांवर आयात शुल्क कमी केले; 50 ऐवजी 20% केले, हिमाचल सफरचंद उद्योगावर संकट
- Supreme Court : SIR वर सुनावणी- सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला; याचिकाकर्ते म्हणाले- ECI मनमानी करू शकत नाही
- देवेंद्र फडणवीसांशी आज झालेल्या चर्चेत सुनेत्रा पवारांचे नावच नव्हते, पण…; प्रफुल्ल पटेलांची माहिती; Between the Lines काय??