महाराष्ट्राचा अभिमान आणि अस्मिता असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकास.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे तुळापूर येथील स्मृतीस्थळ, शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील स्मारक तसंच तूळापूर आणि वढु बुद्रुक परिसराचा विकास करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई यांचे राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळ परिसरचाही विकास करण्यात येईल.
छत्रपती संभाजी महाराज अखंड महाराष्ट्राचे, संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान
महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वये निवेदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक हौतात्म्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन वंदन केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “महाराष्ट्राचं आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज हे, महाराष्ट्राची अस्मिता, अखंड महाराष्ट्राचे, संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमानाचं रक्षण करण्याचं ऐतिहासिक कार्य, छत्रपती संभाजी महाराजांनी केलं.
महाराष्ट्र धर्माचं, स्वराज्याचं रक्षण करताना छत्रपती संभाजी महाराजांना, एकावेळी अनेक शत्रूंचा, अनेक आघाड्यांवर सामना करावा लागला. ज्ञान, गुण आणि चारित्र्यानं संपन्न असलेल्या संभाजी महाराजांनी हा सामना मोठ्या धैर्यानं केला.
छत्रपती संभाजी महाराज इतके शूर, पराक्रमी होते की, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्वराज्यातला एकही किल्ला, स्वराज्याची एक इंच जमीन शत्रूकडे जाऊ दिली नाही. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यासाठी जगले आणि स्वराज्यासाठी त्यांनी आपला देह ठेवला. संभाजी महाराज स्वराज्यासाठी हुतात्मा झाले. या ऐतिहासिक हौतात्म्याचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचं, जागतिक दर्जाचं, भव्य, प्रेरणादायी स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.”
वढु बुद्रुक गावाचा आणि परिसराचा विकास
पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातल्या ऐतिहासिक तुळापूर गावात, छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा देह ठेवला, अखेरचा श्वास घेतला.
तुळापूरपासून जवळ, शिरुर तालुक्यातल्या, वढु बुद्रुक गावी, छत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वढू बुद्रुकमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराजांनी ज्याठिकाणी आपला देह ठेवला, जिथं महाराजांनी अखेरचा श्वास घेतला, त्या ऐतिहासिक तुळापूर गावाचा, तसंच, जिथं छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे, त्या वढु बुद्रुक गावाचा आणि परिसराचा विकास राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात येत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग, पराक्रमाचा, ज्ञान, गुण, चारित्र्यसंपन्नतेचा, स्वराज्यभक्तीचा इतिहास सांगणारं, जागतिक दर्जाचं, भव्य स्मारक, वढू बुद्रुक इथं, महाराजांच्या समाधीस्थळी राज्य शासनाच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे.