विशेष प्रतिनिधी
सोलापूर : Solapur viral video case : सोलापूर जिल्ह्यातील एका गावात मुरूम उत्खननावर कारवाई करणाऱ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून कारवाई रोखण्याच्या सूचना दिल्याचा आरोप करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे अजित पवार यांच्यावर तीव्र टीका होत असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
व्हायरल व्हिडिओमुळे वाद
व्हायरल व्हिडिओमध्ये अजित पवार आणि महिला आयपीएस अधिकाऱ्यांमधील संभाषण ऐकू येते. या संभाषणात महिला अधिकाऱ्याने, “दुसऱ्याच्या फोनवरून नव्हे, माझ्या नंबरवर फोन करा,” असे सांगितल्यावर अजित पवार संतापले आणि “तुमची एवढी हिम्मत वाढली का?” असा सवाल विचारल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमुळे अजित पवार अडचणीत सापडले असून, कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.
विरोधकांचा हल्लाबोल
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले, “अजित पवारांनी केलेली ही कृती त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही याचे द्योतक आहे.” सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही टीका करताना म्हटले, “अवैध कामांना पाठिंबा देणे चुकीचे आहे. अशा प्रकारच्या वागणुकीमुळे प्रशासनावरचा विश्वास कमी होतो.”
राष्ट्रवादीचा खुलासा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी हे आरोप फेटाळले आहेत. पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे म्हणाले, “अजित पवारांनी आयपीएस अधिकाऱ्याला कारवाई रोखण्यास सांगितल्याचा दावा निराधार आहे. एखादा प्रशिक्षणार्थी अधिकारी उपमुख्यमंत्र्यांना ‘तुम्ही कोण?’ असा सवाल विचारत असेल, तर ते चुकीचे आहे.” पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही बचाव करताना सांगितले, “अजित पवार यांची बोलण्याची शैली आणि आवाजाचा टोन हा नैसर्गिक आहे. गेल्या ४० वर्षांपासून ते असेच बोलतात. याचा अर्थ ते रागावले आहेत, असा होत नाही. त्यांनी स्वतः अधिकाऱ्याचा नंबर मागून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, हा त्यांचा मोठेपणा आहे.”
अजित पवारांचे स्पष्टीकरण
अजित पवार यांनी स्वतः ट्विटरवर याबाबत पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसेच धैर्याने आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचे राज्य सर्वात महत्त्वाचे आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
Solapur viral video case: Criticism on Ajit Pawar, NCP’s clarification
- GST सुधारणांना उशीर झाल्याबद्दल काँग्रेसने केली टीका; पंतप्रधान मोदींनी expose केली काँग्रेसच्या राजवटीतील GST भाराची भूमिका!!
- Karnataka : कर्नाटकातील काँग्रेस आमदाराने सट्टेबाजीतून कमावले 2000 कोटी; व्हीआयपी सिरीजच्या 5 मर्सिडीज बेंझ जप्त
- Russia : रशिया भारताला अधिक S-400 संरक्षण प्रणाली देणार; रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले- सहकार्य वाढत आहे
- Manipur : मणिपूर-नागालँड राष्ट्रीय महामार्ग पुन्हा खुला होणार; हिंसाचारानंतर दोन वर्षांपासून बंद होता मार्ग