विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नियोजित कार्यक्रमानुसार व्हायला अजून वर्ष ते दीड वर्ष एवढा वेळ आहे. पण याची तयारी मात्र वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनांनी आत्तापासूनच करायला सुरुवात केली आहे. विशेषतः कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर विरोधी पक्षांच्या निवडणूक तयारीला अधिक वेग आला आहे.Small organisations of raju shetti, bacchu kadu and sambhji raje will contest elections
त्यात आता महाराष्ट्रात राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजी राजे छत्रपती यांच्या वेगवेगळ्या संघटना निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना बच्चू कडू यांची प्रहार संघटना आणि संभाजी राजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या रणमैदानात उतरणार आहेत. सध्या तरी या तिन्ही संघटना स्वतंत्रपणे निवडणुकीचे मैदान मारण्याचे मनसूबे राखून आहेत. पण त्यांचा प्रामुख्याने भर मात्र स्वतःच लोकसभा आणि विधानसभेत निवडून येण्यावर असणार आहे.
राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजी राजे यांच्यात एक कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे राज्याच्या राजकारणात सध्या दबदबा राखून असलेल्या कोणत्याही प्रस्थापित पक्षांची त्यांचे राजकीय दृष्ट्या जमत नाही. राजू शेट्टी आणि संभाजी राजे भाजपच्या बळावर एकएकदा लोकसभा आणि राज्यसभेत पोहोचले. पण त्यानंतर मात्र त्यांनी भाजपची फटकून वागून आपले स्वतंत्र मार्ग चोखाळले. राजू शेट्टी आता हातकणंगले मतदारसंघातून स्वतंत्रपणे आपले नशीब आजमावणार आहेत, तर संभाजी राजे नाशिक लोकसभा मतदारसंघात उभे राहण्याची तयारी करत आहेत. बच्चू कडू यांनी अमरावतीतून तयारी सुरू केली असून त्यांची प्रहार संघटना किमान 11 जागी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
संभाजी राजे यांनी तर आज पुण्याच्या बालगंधर्व रंग मंदिरात स्वराज्य संघटनेचे पहिले अधिवेशन घेऊन 2024 च्या निवडणुका लढविण्याचे जाहीर केले आहे. अर्थात या निवडणुका ते कोणाशी युती अथवा आघाडी करून लढवणार याचे तपशील त्यांनी जाहीर केलेले नाहीत. पण स्वराज्य संघटना त्यांनी निवडणुकीच्या रणमैदानात उतरणार असे मात्र स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्याबरोबरच संभाजी राजेंची देखील महाराष्ट्राच्या निवडणुकीतली एन्ट्री इंटरेस्टिंग ठरणार आहे.
या तीनही नेत्यांचे दुसरे वैशिष्ट्य असे की, त्यांची स्वतःची वैयक्तिक आणि संघटनात्मक राजकीय ताकद मर्यादित आहे. पण त्यांच्या महत्त्वाकांक्षा मात्र मोठ्या आहेत. प्रस्थापित पक्षांना विरोध करण्यासाठीच ते निवडणुकीच्या रणमैदानात उतरणार आहेत. याचा सरळ राजकीय अर्थ असा की प्रस्थापित पक्षांची मते कापून ते स्वतःचे राजकीय भवितव्य घडवू पाहत आहेत. यात हे तिन्ही नेते आपले विशिष्ट मर्यादित ताकद राखून किती यशस्वी होतात आणि प्रस्थापित कोणत्या राजकीय पक्षांना ते विशिष्ट शहरांमध्ये धक्का देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पण या सगळ्यांमध्ये एक बाब निश्चित ती म्हणजे, या तीनही नेत्यांची स्वतःच्या निवडून येण्याच्या क्षमतेपेक्षा “पॉलिटिकल न्यूसन्स व्हॅल्यू” इतर प्रस्थापित पक्षांना शॉक देणार आहे. आता हा शॉक प्रस्थापित पक्ष कसे ऍबसॉर्ब करतात हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
Small organisations of raju shetti, bacchu kadu and sambhji raje will contest elections
महत्वाच्या बातम्या
- नवीन संसद भवनात ‘एक भारत, सर्वोत्तम भारत’ची झलक; महाराष्ट्रातून सागवान, राजस्थानचे संगमरवर तर उत्तर प्रदेशातून कार्पेट!
- समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर दुसऱ्या टप्प्याचे शिंदे – फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण
- मोदी सरकारची 9 वर्षे : काँग्रेसचे 9 प्रश्न; सरकारचे 9 निर्णय!!
- सावरकर जयंती निमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वस्तीगृहातली खोली सामान्यांसाठी खुली..