विनायक ढेरे
नाशिक : महाराष्ट्रातील दोन प्रादेशिक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सध्या राजकीय संक्रमणातून चालल्याचे दिसत आहे. विशेषतः महाराष्ट्रातला महाविकास आघाडीचा प्रयोग अवघ्या अडीच वर्षांमध्ये फसल्यानंतर या दोन्ही पक्षांमधील संघर्ष जास्तच उफाळून आला आहे आणि त्या संघर्षाला देखील त्यांच्या त्यांच्या पक्षाची सांस्कृतिक किनार आहे. Shivsena and NCP : inside conflict according to their own political culture
शिवसेनेतला ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यांच्यातला संघर्ष मुंबईतल्या रस्त्यावर दिसला आहे. आमदार सदा सरवणकर विरुद्ध ठाकरे गट यांच्यात जोरदार राडा होऊन तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आहे. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या नेत्यांवर एफ आय आर दाखल केले आहेत.
शिवसेनेच्या रस्त्यावरच्या राडा संस्कृतीनुसार ठाकरे आणि शिंदे गटाचा संघर्ष झाला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतल्या राष्ट्रीय अधिवेशनात पवार कुटुंबामधलाच राजकीय संघर्ष चव्हाट्यावर नव्हे, तर व्यासपीठावर दिसला आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार हे भाषण न करता व्यासपीठावरून दोनदा उतरून निघून गेल्याने राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवारांच्या भाषणापेक्षा अजितदादांच्या नाराजीची चर्चा जास्त रंगली आहे.
तालकटोरा स्टेडियम मधील राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे यांना व्यासपीठावरून बोलण्याची संधी दिली. परंतु कार्यकर्त्यांनी मात्र अजितदादांच्या भाषणाचा आग्रह धरला. हा आग्रह धरल्याचे पाहिल्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजितदादांचे भाषण होईल असे जाहीर देखील केले होते. पण दरम्यानच्या काळात अजितदादा स्वतःच व्यासपीठावरून उठून बाजूला निघून गेले. अजितदादांच्या नाराजीची चर्चा सुरू होताच स्वतः सुप्रिया सुळे व्यासपीठावरून मागे जाऊन अजितदादांना घेऊन येण्याचा प्रयत्न केला. परंतु अजित दादा स्टेजवर परतले तरी त्यांनी भाषण मात्र केले नाही. उलट पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्रातल्या मान्यवरांचे भाषण झाले. बाकीच्या मान्यवरांनाही संधी मिळाली पाहिजे, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.
पण एकूण राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात अजितदादांची नाराजी हा विषय गाजतच राहिला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची सत्ता असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांना राजकीय चंद्रबळ आले होते. पण सत्ता जाताच दोन्ही पक्षांमधला अंतर्गत संघर्ष त्यांच्या – त्यांच्या राजकीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यानुसार बाहेर आल्याचेही दिसत आहे.
Shivsena and NCP : inside conflict according to their own political culture
महत्वाच्या बातम्या
- राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल भारतात आज एक दिवसाचा राजकीय शोक, अर्ध्यावरती येणार तिरंगा
- अदार पूनावालाच्या नावाने सीरम इन्स्टिट्यूटची फसवणूक, 1 कोटी रुपयांचा गंडा
- नोकरीची संधी : SBI बॅंकेत 5000 पदांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज!!
- महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड, राष्ट्रीय हरित लवादाचा मोठा निर्णय