• Download App
    'राजभवनात पहाटेची लगबग सुरू होईल असे वाटत असेल तर तो एक राजकीय स्वप्नदोषच', भाजपवर शिवसेनेची चौफेर टीका । shiv sena dainik saamana editorial criticized bjp again on political situation

    ‘राजभवनात पहाटेची लगबग सुरू होईल असे वाटत असेल तर तो एक राजकीय स्वप्नदोषच’, भाजपवर शिवसेनेची चौफेर टीका

    Saamana Editorial : राज्यातील महाविकास आघाडी सरकार येत्या काही दिवसात पडेल असे सांगता सांगता हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल, असे भाजप नेते सांगू लागले आहेत. त्यावरून शिवसेना मुखपत्र दैनिक सामना संपादकीयातून खिल्ली उडवण्यात आली आहे. सामनाच्या संपादकीयमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या वेगवेगळ्या झालेल्या भेटीवरून रंगलेल्या चर्चा, भाजपकडून होत असलेले आरोप यांना उत्तर देण्यात आले आहे. shiv sena dainik saamana editorial criticized bjp again on political situation


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार येत्या काही दिवसात पडेल असे सांगता सांगता हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल, असे भाजप नेते सांगू लागले आहेत. त्यावरून शिवसेना मुखपत्र दैनिक सामना संपादकीयातून खिल्ली उडवण्यात आली आहे. सामनाच्या संपादकीयमध्ये मुख्यमंत्री

    द्धव ठाकरे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या वेगवेगळ्या झालेल्या भेटीवरून रंगलेल्या चर्चा, भाजपकडून होत असलेले आरोप यांना उत्तर देण्यात आले आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या भेटीवरून सामनात म्हटले आहे की, ‘उद्धव ठाकरे हे मध्यंतरी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना भेटले. मोदी-ठाकरे भेटीत महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाचीच बातचीत झाली व आता दोन-पाच दिवसांत पुन्हा एकदा राजभवनात पहाटेची लगबग सुरू होईल असे स्वप्न कुणाला पडत असेल तर तो एक राजकीय स्वप्नदोषच म्हणावा लागेल.’

    सामनाचे संपादकीय

    करोना, आर्थिक संकट, बेरोजगारी, निसर्ग संकटाशी महाराष्ट्र सामना करीत आहेच. त्यात आणखी एक ‘ईडी’ किंवा सीबीआयचे संकट सुल्तानी पद्धतीने कोसळले असे मानून मुकाबला करणे हेच आता योग्य आहे. ममता बॅनर्जी यांनी या सुल्तानशाहीशी अशाच पद्धतीने लढून विजय मिळविला. महाराष्ट्रानेही तोच मार्ग स्वीकारणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कानावर मुख्यमंत्र्यांनी हे सर्व नक्कीच घातले असणार. मंगळवारच्या पवार-ठाकरे चर्चेतही लढाईचा आराखडा ठरलाच असेल. श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ कुरुक्षेत्राच्या मधोमध नेऊन उभा केला व दुष्मनाशी चौफेर मुकाबला करून अधर्माचा पराभव केला. महाराष्ट्राचे सरकार कुरुक्षेत्राच्या मध्यभागीच उभे आहे. विरोधकांनी स्वतःचा अभिमन्यू होऊ देऊ नये म्हणजे झाले.

    महाराष्ट्रातील विरोधी पक्षास नक्की काय झाले आहे तेच कळत नाही. महाराष्ट्रातील सरकार ‘पाडू’च असा त्यांचा आत्मविश्वास साफ तुटला आहे. आता सरकार पाडणार नाही, तर आपल्याच ओझ्याने पडेल, असे पसरवायला त्यांनी सुरुवात केली आहे. विरोधकांनी ‘पाडू किंवा पडेल’ असे कितीही ढोल बडवले तरी यापैकी काहीच घडणार नाही. शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना मंगळवारी भेटले. दोघांत चांगले तासभर ‘गुफ्तगू’ झाले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पडताना पवारांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद स्पष्ट दिसत होता. मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वासही गेल्या काही दिवसांत चांगलाच वाढला आहे आणि काँग्रेसविषयी काय सांगावे! त्यांच्या प्रमुख नेत्यांची अवस्था आत्मविश्वासाच्या बाबतीत चारही बोटे शुद्ध तुपात अशीच असल्याने तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार श्रीकृष्णाच्या कुरुक्षेत्रावरील रथाप्रमाणे सगळे बाण व हल्ले पचवत विरोधकांशी लढत आहे.

    उद्धव ठाकरे हे मध्यंतरी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना भेटले. मोदी-ठाकरे भेटीत महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाचीच बातचित झाली व आता दोन-पाच दिवसांत पुन्हा एकदा राजभवनात पहाटेची लगबग सुरू होईल असे स्वप्न कुणाला पडत असेल तर तो एक राजकीय स्वप्नदोषच म्हणावा लागेल. ठाकरे-मोदी भेटीत असे काय घडले, की ज्यामुळे समस्त ‘मीडिया महामंडळा’ने धावाधाव करावी व नव्या सरकारनिर्मितीच्या तारखांचे हवाले देत राहावे? ठाकरे यांनी एक बात तर पंतप्रधानांशी नक्कीच केली असेल, ती म्हणजे सध्या महाराष्ट्रात जी राजकीय व्यवस्था निर्माण झाली आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी भारतीय जनता पक्षाचीच आहे. भाजपाने शिवसेनेस या परिस्थितीत ढकलले नसते तर आजचे सरकार आलेच नसते. ठाकरे-मोदी भेटीत यावर नक्कीच चर्चा झाली असावी. त्यामुळे आजच्या सदाबहार राज्यव्यवस्था निर्मितीस हातभार लावल्याबद्दल भाजपचे आभार मानावे तेवढे थोडेच.

    पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भेटले. त्यांनी व्यक्तिगत चर्चा केली हे काही दीर्घद्वेषी मंडळींना आवडले नाही. त्यांचे म्हणणे असे की, महाराष्ट्राने दिल्लीशी सतत भांडत राहावे. मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्यात सदैव आदळआपट सुरू राहावी किंवा येथील काही लोकांना असेही वाटू शकते की, आम्ही इथे इतके तालेवार लोक असताना मुख्यमंत्री ठाकरे हे आमच्या मध्यस्थीशिवाय मोदींना भेटतातच कसे? त्यांचा हा प्रश्न बरा आहे, पण खरा नाही.

    मोदींनी ठाकरे यांना भेटण्यासाठी इतका वैयक्तिक वेळ का दिला, हा प्रश्न त्यांनी मोदींना विचारला तर त्यावर उत्तर आणि औषध दोन्ही मिळेल. पवारही अधूनमधून मोदी यांना भेटत असतात आणि बोलत असतात. पंतप्रधानांशी संवाद ठेवण्यासाठी मधल्या अडत्यांची गरज नाही व महाराष्ट्राने उगाच दिल्लीशी भांडण करण्याचीही गरज नाही. महाराष्ट्र दिल्लीशी झगडा करतो तेव्हा दिल्लीस शरण यावे लागते हा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्र लढय़ात नेहरूंशी भांडण करूनच मुंबई महाराष्ट्रास मिळाली. महाराष्ट्राचे भांडण हे विचारांचे, तत्त्वांचे व राष्ट्रासाठी असते. शिवसेना त्याच महाराष्ट्र धर्माचे पालन करत आहे.

    महाराष्ट्राला संकटकाळी केंद्राने मदत करायला हवी. मधल्या कोरोना संकट काळात मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांना फोन लावून मदत मागितली तेव्हा पंतप्रधानांचा प्रतिसाद सकारात्मक होता, असे मुख्यमंत्री ठाकरे सांगतात. आता पंतप्रधान महाराष्ट्राला मदत करतात म्हणून राज्य सरकारने वेगळी भूमिका घ्यावी असे येथील विरोधी पक्षाला वाटत असेल तर ते कच्चे आहेत. महाराष्ट्रातील काही मंत्री, आमदार, सरकारविषयी सहानुभूती ठेवणारे उद्योजक यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून राज्यातील विरोधी पक्षाने हलचल माजविण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. या अशा दबावापुढे सरकार पक्षाने न झुकता प्रतिकार करत राहणे हाच योग्य उपाय आहे.

    मागे ‘ईडी’ने भलत्याच प्रकरणी पवार यांना नोटीस बजावली. तेव्हा पवार रस्त्यावर उतरून ‘ईडी’ कार्यालयाकडे जायला निघाले. महाराष्ट्राचे वातावरण तेव्हा ढवळून निघाले होते. ईडी, सीबीआय किंवा आपले महामहीम राज्यपाल महोदय यांचा वापर करून राज्यातील सरकार अस्थिर होईल हा भ्रमाचा भोपळाच आहे.

    shiv sena dainik saamana editorial criticized bjp again on political situation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!