• Download App
    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा!!; असणार महाराष्ट्राचे राज्यगीत!! Shinde-Fadnavis government's approval of Cultural Affairs Department's proposal

    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा!!; असणार महाराष्ट्राचे राज्यगीत!!

    शिंदे – फडणवीस सरकारची सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रस्तावाला मान्यता

    प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणाचे गीत “महाराष्ट्राचे राज्यगीत” म्हणून घोषित करण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. हे गीत शाहीर साबळे यांनी डफावर थाप देत महाराष्ट्रात लोकप्रिय केले. Shinde-Fadnavis government’s approval of Cultural Affairs Department’s proposal

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने या गीतास राज्यगीत म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

    महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर आतापर्यंत अधिकृत राज्यगीत नव्हते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना स्फुर्तिदायक आणि प्रेरणा देणारे तसेच महाराष्ट्राचे शौर्याचे वर्णन करणारे महाराष्ट्र गीत म्हणून स्वीकारण्यात आले आहे. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा याचे गीतकार कविवर्य राजा नीळकंठ बढे, संगीतकार श्रीनिवास खळे असून हे गीत शाहीर कृष्णराव साबळे यांनी गायले आहे.

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र गीत येत्या दि. १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात येणार आहे. हे राज्यगीत सुमारे १ मिनिट ४१ सेकंद गायले किंवा पोलीस बँडवर वाजविले जाईल.

    “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा”
    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा || धृ ||

    भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
    अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
    सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
    दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

    काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
    पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी
    दारिद्रयाच्या उन्हात शिजला
    निढळाच्या घामाने भिजला
    देश गौरवासाठी झिजला
    दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
    जय जय महाराष्ट्र माझा ॥ २ ॥

    महाराष्ट्र राज्यगीत गायन, वादन संदर्भातील काही मार्गदर्शक सूचना असणार आहेत. त्या पुढीलप्रमाणे :-

    १) शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन वादन हे ध्वनिमुद्रित आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे.

    २) १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायले जाईल.

    3) राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, परिपाठ / प्रतिज्ञा / प्रार्थना / राष्ट्रगीत या सोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल.

    4) राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरीकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास / गाण्यास मुभा राहील.

    5) राज्यगीत सुरु असतांना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृध्द व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.

    6) राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत पण बाळगण्यात यावे. हे गीत वाजविताना/ गाताना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.

    7) वाद्यसंगीतावर आधारीत या गीताची वाद्यधून पोलीस बॅडमार्फत वाजविता येईल.

    8) राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा.

    9) या राज्यगीताच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीसाठी सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त आस्थापनांस / कार्यालयांस सूचना द्याव्यात.

    10) माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडून राज्यगीताचा प्रचार / प्रसार करण्यासाठी विशेष मोहिम आखण्यात यावी. त्यासाठी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे तसेच समाज माध्यमांचाही सुयोग्य वापर करण्यात यावा.

    11) या अधिकृत राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध राहील.

    Shinde-Fadnavis government’s approval of Cultural Affairs Department’s proposal

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात, भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य मोठे!!

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!