नाशिक : महिला आणि मराठा राजकारण करून थकले; ओबीसी राजकारणाच्या आश्रयाला पोहोचले!!, हेच आजपासून सुरू झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडल यात्रेचे वर्णन करावे लागेल. कारण शरद पवारांनी आत्तापर्यंत स्वतःचे राजकारण तरंगत ठेवण्यासाठी जेवढे म्हणून प्रयोग केले, त्यातला ओबीसी राजकारणाचा आणखी एक प्रयोग या पलीकडे त्याचे फारसे महत्त्व असण्याची शक्यता नाही.
शरद पवारांनी 1990 च्या दशकापर्यंत काँग्रेसी वळणाचे सर्वसमावेशक राजकारण करायचा प्रयत्न केला पण संघटनात्मक पातळीवर त्यांना काँग्रेसमध्ये स्वतःचे वर्चस्व निर्माण करता आले नाही त्यामुळे त्यांनी 1990 च्या दशकानंतर मराठा राजकारणाचा आश्रय घेतला. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लेबल खाली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली पण प्रत्यक्षात काँग्रेसच्या संघटनेला कुरतडून आणि पोखरूनच राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना वाढवली. काँग्रेस मधले मराठा राजकारणाचे सगळे प्रतिनिधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचे मराठा राजकारण दोन दशके धकून गेले. कारण काँग्रेसच्याच सत्तेच्या वळचणीला ते कायम राहिले. सत्तेच्या लोहचुंबकामुळे पवारांचे मराठा राजकारण देखील तरंगत राहिले.
सुप्रिया सुळे यांच्यासाठी महिला राजकारण
याच दरम्यान शरद पवारांनी महिला राजकारणाचा प्रयोग करून पाहिला. तो प्रामुख्याने सुप्रिया सुळेंचे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापनेसाठी होता. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला आरक्षण वगैरे उपाययोजना करून झाल्या परंतु पवारांना अपेक्षित अशी सुप्रिया सुळेंची महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापना होऊच शकली नाही. ती अगदी आत्तापर्यंत देखील झालेली दिसत नाही. सुप्रिया सुळे यांच्या वयाचे आणि त्यांच्या पिढीतले अनेक राजकारणी सुप्रियांच्या पेक्षा खूप पुढे निघून गेले अगदी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांनी महाराष्ट्राचे सलग दोनदा मुख्यमंत्री पद देखील मिळवले, पण सुप्रिया सुळेंना खासदारकी पलीकडे काही मिळवता आले नाही. किंवा खुद्द पवारही त्यांना कुठले पद मिळण्याची “व्यवस्था” करू शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला संघटन आणि राजकारण सुप्रिया सुळे यांच्या भोवती केंद्रित झाले पण त्याचा लाभ मात्र फारसा झालेला दिसला नाही.
मराठा मुद्द्याला हवा, पण राजकीय तोटा झाला
देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ता काळात पवारांनी मराठा राजकारणाला मोठी हवा दिली. त्यात आरक्षणाचा मुद्दा मिसळून त्याला महाराष्ट्रातल्या सामाजिक अस्वस्थतेचा रंग दिला. मनोज जरांगे नावाचे नेतृत्व उभारायचा प्रयत्न झाला बाकीच्या मराठा संघटनांना चकाकी आणण्याचा प्रयत्न झाला. पण या सगळ्यात पवारांना निवडणुकीआधी मोठे यश मिळाल्याचे भासले पण प्रत्यक्षात निवडणुकीत पवारांचे सगळे मनोरथ कोसळले. मराठा सामाजिक अस्वस्थता निर्माण करून पवारांना राजकीय लाभ मिळवता आला नाही.
नवे ओबीसी नेतृत्व निर्मितीचा प्रयत्न
त्याच्या पुढचा टप्पा म्हणून पवारांनी मंडल यात्रेचा प्रयोग करून पाहिला आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे गाव नागपूर निवडले. पण त्यात राजकीय योगायोगा पलीकडे काही नाही. कारण मुळातच पवारांच्या मंडल यात्रेचा प्रयोग हा नवा नाही. विश्वनाथ प्रतापसिंह यांनी करून पाहिला आणि त्या मर्यादित यश मिळवून पाहिले पण विश्वनाथ प्रताप सिंह यांचे राजकारण पुढे सरकू शकले नाही. ते ओबीसी – बिगर ओबीसी यांच्या भांडणात संपून गेले. आता मंडल यात्रा सुरू करताना पवारांच्या समर्थकांनी पवारांनी ओबीसी समाजासाठी कोणत्या कल्याणकारी योजना आणल्या त्या कशा राबवल्या याची बहारदार वर्णने करणारी भाषणे केली महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर आणि मनोज हाके यांना पर्याय देणारे नेतृत्व उभे राहत असल्याच्या बाता मारल्या पण मंडल यात्रा सुरू करताना त्यामध्ये भाषणे मात्र अनिल देशमुख आणि रोहित पवारांची गाजवली गेली. त्यातही जयंत पाटलांनी मंडल यात्रेच्या सुरुवातीलाच दांडी मारली. त्यामुळे त्याची बातमी सगळीकडे पसरली.
राजकीय वातावरण टिकवण्याचे आव्हान
पवारांच्या राष्ट्रवादीची ही मंडल यात्रा 52 दिवस चालणार आहे. म्हणजे किमान दीड महिना ती वातावरण निर्मिती ठेवावी लागणार आहे. जे पवारांच्या राष्ट्रवादीसाठी फार मोठे आव्हान ठरू शकते. कारण या दीड महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात ज्या उलथापालथी होतील, बाकीचे पक्ष पवारांच्या मंडल यात्रेवर ज्या प्रकारे तुटून पडतील, ते पाहता पवारांची मंडल यात्रा नागपूर पासून निघून साताऱ्या पर्यंत येईपर्यंत तिचा प्रवाह कितपत टिकेल आणि कसा पातळ होत जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Sharad Pawar’s NCP mandal Yatra, to appease OBC community
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला