विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिली “अनोखी भेट”; पवारांनी तलवारीने कापला 85 व्या वाढदिवसाचा केक!!
शरद पवारांचा 85 वा वाढदिवस आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजधानी नवी दिल्लीत साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांना एक अनोखी भेट दिली. त्या भेटीच्या आधारेच पवारांनी आपल्या वाढदिवसाच्या केक कापला. राष्ट्रवादीच्या उत्साही कार्यकर्त्यांनी केक कापण्यासाठी तलवार आणली होती, ती त्यांनी पवारांना दिली आणि पवारांनी त्या तलवारीने वाढदिवसाचा केक कापला.
शरद पवारांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार छगन भुजबळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते पोहोचले. या सगळ्यांनी पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. खुद्द पवारांच्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्रात विधानसभेत पराभूत झालेले उमेदवार दिल्लीतच असल्याने ते पवारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त अनायसे हजर होते. या सगळ्या उमेदवारांनी अजित पवारांचे पवारांच्या निवासस्थानी स्वागत केले. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एक अनोखे संमेलन तिथे भरले होते.
शरद पवारांचा यंदा 85 वा वाढदिवस आहे. त्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे 85 आमदार निवडून आणून त्यांना भेट दिली पाहिजे, असे पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितले होते. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी तसा मोठा प्रचार देखील केला होता. परंतु, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर 85 आमदार निवडून आले नाहीत. त्यांचे फक्त 10 आमदार निवडून येऊ शकले.
पण पवारांच्या आजच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर हे सगळे राजकारणातले संदर्भ विसरले गेले आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांचे छोटेखानी संमेलन पवारांच्या “6 जनपथ” या निवासस्थानी थोडा वेळ रंगले, पण यात रोहित पवार कुठे दिसले नाहीत.