ही तो श्रींची इच्छा ते बाळासाहेबांची इच्छा!! एका वाक्यात महाराष्ट्रातल्या गेल्या 44 वर्षांचा राजकीय इतिहास सांगता येईल. 44 वर्षांपूर्वी 1978 मध्ये एका संपादकांनी महाराष्ट्र टाइम्स वर्तमानपत्रात “ही तो श्रींची इच्छा”, असा अग्रलेख लिहिला होता. आज दुसरे कार्यकारी संपादक अग्रलेखातून नव्हे, तर मुलाखतीतून, “ही तर बाळासाहेबांची इच्छा”, असे म्हटले आहेत!! Sharad Pawar brought down vasantdada patil government as per wish of y b Chavan
पण “ही तो श्रींची इच्छा” ते “बाळासाहेबांची इच्छा” या 44 वर्षांच्या कालावधी महाराष्ट्रातील कृष्णा, कोयना, गोदावरी, बारामतीची कऱ्हा आणि मुंबईची मिठी या नद्यांमधून भरपूर राजकीय पाणी वाहून गेले आहे. या राजकीय इच्छेत एक कॅरेक्टर मात्र समान आहे ते म्हणजे सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे आहे!!
“ही तो श्रींची इच्छा” हा अग्रलेख ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्र टाइम्स संपादक कै. गोविंदराव तळवळकर यांनी लिहिला होता. महाराष्ट्रातले वसंतदादा पाटलांचे सरकार पाडण्याची इच्छा इतर कोणाची नसून दस्तुरखुद्द यशवंतराव चव्हाण यांची आहे, असेच या अग्रलेखातून त्यावेळी गोविंदराव तळवलकर यांनी सूचित केल्याचे तेव्हा मानले गेले होते.
त्या अग्रलेखाचा धागा पकडूनच शरद पवारांनी आपल्या गटाचे आमदार काँग्रेसमधून बाहेर काढून वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले होते. त्यावेळी तो अग्रलेख खूप गाजला होता आणि त्याचवेळी महाराष्ट्राच्या राजकारणात कित्येक वर्ष गाजत राहिलेला आणि गाजत राहणारा “पाठीत खंजीर खुपसणे” हा वाक्प्रचार प्रचारात आला!!
हे सगळे आठवायचे कारण म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये साखर परिषदेनंतर आमदार रोहित पवार यांच्या “कनेक्ट महाराष्ट्र” या कार्यक्रमात सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखतीत काढलेले उद्गार होय!! चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांचे संयुक्त मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत संजय राऊत यांनी अनेक वक्तव्य केले आहेत त्यापैकी एक वक्तव्य बाळासाहेबांच्या इच्छेचे आहे.
आजचे महाविकास आघाडी सरकार आणणे ही दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यांनी आजच्या संकल्पनेला पाठिंबा दिला असता असा खळबळजनक दावा केला आहे. त्यापुढे जाऊन संजय राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकद एकत्र आली तर आपण दिल्लीला वाकवू शकतो, असे बाळासाहेब आपल्याला अनेकदा म्हणायचे असाही दावा केला आहे. भाजपवर शरसंधान साधताना संजय राऊत भाजपचे नेते मातोश्रीची पायरी चढताना दहावेळा विचार करायचे. बाळासाहेबांसमोर भाजपचे नेते चळाचळा कापलेले आम्ही बघितले आहेत, असा दावाही केला आहे.
गोविंदराव तळवळकर आणि संजय राऊत यांच्या लिखित आणि मुलाखतीतल्या दाव्यामधले एक कॅरेक्टर समान आहे, ते शरद पवारांचे आहे. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांची इच्छा “समजून” घेऊन शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडले आणि आज बाळासाहेबांची इच्छा “लक्षात” घेऊन अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेने भाजपबरोबर च्या महायुतीत पूर्ण बहुमत मिळवल्यानंतर शिवसेनेला महायुतीतून फोडून महाविकास आघाडीचे सरकार बनविले आहे!! दोन महनीय व्यक्तींच्या इच्छांचा हा परिणाम आहे हे महाराष्ट्राने समजून समजून घ्यावे हीच एक मात्र इच्छा या जाणत्या राजांची आहे, आणि संजय राऊत यांच्या मुखातून बाहेर आली आहे!! असे म्हणण्यास वाव आहे.