• Download App
    Shahu Maharaj कोल्हापुरात काँग्रेसमध्ये काल रंगले माघारनाट्य + संतापनाट्य; आज खासदार शाहू महाराजांनी लिहिले सर्वांना पत्र!!

    Shahu Maharaj कोल्हापुरात काँग्रेसमध्ये काल रंगले माघारनाट्य + संतापनाट्य; आज खासदार शाहू महाराजांनी लिहिले सर्वांना पत्र!!

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : कोल्हापुरात उत्तर मतदारसंघाच्या मुद्द्यावरून काल काँग्रेसमध्ये रंगले, माघारनाट्य + नाराजीनाट्य आणि संतापनाट्य. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. त्याचे वेगवेगळे कांगोरे बाहेर आले. भाजप आणि शिवसेनेने काँग्रेसला टोचून घेतले. सतेज पाटील विरुद्ध शाहू महाराज असा इतिहास पुन्हा उगाळला गेला. सतीश पाटलांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेऊन त्या सगळ्या नाट्यावर पडदा टाकला. त्यानंतर शाहू महाराजांनी कोल्हापूरकरांना जाहीर पत्र लिहून विषय मिटवला. पण काँग्रेसच्या इतिहासात आणि कोल्हापूरच्या इतिहासात या वादाची नोंद व्हायची ती झालीच.

    – शाहू महाराजांचे पत्र असे :

    – काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणे मान्य नसल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदार संघातून सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. याशिवाय अन्य कोणतेही कारण उमेदवारी मागे घेण्यामागे नाही.

    – एकाच कुटुंबात दोन पदे नकोत म्हणून मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवायची नाही, असे आमचे आधीच ठरले होते. त्यामुळे त्या काँग्रेसच्या मुलाखतीसाठीही गेल्या नव्हत्या. परंतु राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोध होऊ लागल्यावर एका विशिष्ट परिस्थितीत अनेकांच्या आग्रहास्तव काँग्रेस पक्षाची गरज म्हणून त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती. लाटकर यांनी उमेदवारी मागे घेतली तरच लढायचे असे आमचे ठरले होते आणि लाटकर कुटुंबीयांसोबत झालेल्या चर्चेतही आम्ही त्यांच्याजवळ ही गोष्ट स्पष्ट केली होती. लाटकरांशी झालेल्या भेटीचा वृत्तांत पक्षनेतृत्वाला दिला होता. त्यांनी माघार न घेतल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखावा म्हणून अखेरच्या क्षणी आम्ही माघारीचा निर्णय घेतला.

    – काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसला तरी राजेश लाटकर हे काँग्रेस विचाराचे पर्यायाने काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व ताकदीनिशी प्रयत्न करणार आहोत.

    – श्री. सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आहेत. राज्यपातळीवर नेते म्हणून ते उत्तम काम करीत आहेत. त्यांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमधील राजेश लाटकर यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसच्या अन्य चार जागा तसेच महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकण्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करणार आहोत.

    – माघारीनंतरच्या घटनांमध्ये सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांना उ‌द्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला, असा कांगावा करीत आहेत. प्रत्यक्षात सतेज पाटील यांच्याकडून तसे काही घडलेले नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. माघारीच्या घटनेनंतर आम्ही भुदरगडच्या कार्यक्रमात एकत्र होतो आणि तिथून एकाच गाडीतून परत आलो.

    – विधानसभा निवडणुकीच्या माघारीनंतर काही लोक सोशल मीडियावर मी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत, त्यात अजिबात तथ्य नाही. कोल्हापूरच्या साडेसात लाखांहून अधिक लोकांनी मला विक्रमी मते देऊन निवडून दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेत मी काम करीत आहे आणि काँग्रेसचा व महाविकास आघाडीचा खासदार म्हणून लोकांची सेवा करीत राहणार आहे.

    Shahu Maharaj wrote a letter to everyone

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!