विशेष प्रतिनिधी
नागपूर : बीड जिल्ह्यातले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या मास्टर माईंडला सोडणार नसल्याचा सरकारमधल्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी लावला धोषा, पण वाल्मीक कराड कुठे गेला, अजून सापडेना!! अशी स्थिती आली आहे. पण या गंभीर प्रकरणाच्या निमित्ताने दोन राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आल्या पवार काका पुतण्यांनी दोन तासाच्या अंतरांमध्ये मस्साजोगला भेटी दिल्या. Santosh Deskhmukh murder case massajog village visit
संतोष देशमुख यांच्या हत्येची वेगवेगळी कारणे सांगितली जात असली तरी त्या मागचा मास्टर माईंड वाल्मीक कराड असल्याचे समोर आले. त्याला राज्याचे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा आश्रय असल्याचे बोलले गेले. त्यामुळे त्यांच्याभोवतीच्या संशयाचे जाळे वाढले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात मस्साजोगच्या मास्टर माईंडला सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.
शरद पवारांनी आज मास्साजोग मध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. महाराष्ट्रात दहशतीचे वातावरण असल्याचा दावा केला. शरद पवारांच्या भेटीनंतर दोन तासांनी तिथे अजित पवार पोहोचले. त्यांनी देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन करत मास्टर माईंडला सोडणार नसल्याची ग्वाही दिली. मस्साजोग प्रकरणाच्या निमित्ताने काका पुतण्यांच्या दोन राष्ट्रवादी एकमेकांच्या समोर आल्या.
संतोष देशमुख हे आमदार नमिता मुंदडा यांचे पोलिंग एजंट असल्याच्या बातमीही माध्यमांनी दिल्या. त्याचबरोबर वाल्मीक कराड याचे धनंजय मुंडे आणि रोहित पवार यांच्याबरोबरचे वेगवेगळे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे वाल्मीकचे राष्ट्रवादी काँग्रेसशीच संबंध असल्याचे एस्टॅब्लिश झाले आणि हत्या प्रकरणातली गुंतागुंत वाढली.
वाल्मीक कराड याची सगळी क्रिमिनल हिस्टरी माध्यमांमधून समोर आली. परंतु सरकारी यंत्रणांना तो अजून कुठे सापडायला तयार नाही. तो नागपुरात लपून राहिल्याचा आरोप विरोधी आमदारांनी केला. या प्रकरणात दोन राष्ट्रवादींमध्येच राजकारण माजलेले समोर आले. शरद पवारांनी मस्साजोगच्या मास्टर माईंडला सोडणार नाही, अशी घोषणा केली. त्यांचा अंगुली निर्देश धनंजय मुंडे यांच्याकडे असल्याचे बोलले गेले. त्यामुळेच अजित पवार तिथे पवारांच्या दौऱ्यानंतर पोहोचले, असेही सांगितले गेले. मस्साजोग मधील हत्येच्या निमित्ताने काका – पुतण्यांच्या दोन राष्ट्रवादींमध्ये मोठे राजकारण सुरू झाले.