प्रतिनिधी
नाशिक – शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत हे आपल्या वेगळ्या ट्विटसाठी नेहमीच चर्चेत राहतात. परवाच त्यांनी वाघाच्या तोंडात कोंबडी असा फोटो ट्विट करून नारायण राणे यांच्या अटकेवर कमेंट केली होती.
आज त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सिगार ओढतानाचा ऐटदार फोटो वापरून जिनके वजूद होते है… वो बिना पद के भी मजबूत होते है… अशा ट्विटव्दारे राजकीय चिमटे काढले आहेत. हा चिमटा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काढल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपदाची आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी कुबडी लागली, अशी सूचक टीका संजय राऊतांनी या ट्विटमधून केल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे.
पण त्याचवेळी काही नेटिझन्सनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या आयुष्यात कोणतेही सरकारी पद स्वीकारले नाही. आतापर्यंत ठाकरे परिवाराने हा पण पाळला. पण उध्दव ठाकरे यांनी हा पण बाजूला सारून मुख्यमंत्रीपद स्वीकारले एवढेच नाही, तर आदित्य ठाकरे यांना आपल्याच मंत्रिमंडळात मंत्री केले.
यावरून तर संजय राऊतांनी जिनके वजूद होते है… वो बिना पद के भी मजबूत होते है, असे ट्विट केले नाही ना… अशी शंका काही नेटिझन्सनी व्यक्त केली आहे.
याचा अर्थ असा झाला की संजय राऊतांनी ट्विट करून बाण मारला नारायण राणे यांना पण तो गेला उध्दव आणि आदित्य ठाकरे यांच्या दिशेने… असा टोला काही नेटिझन्सनी लगावला आहे.
sanjay raut targets narayan rane again on twitter