चौथाईवाले लिखित ‘ मेरी प्रचारक यात्रा’ या पुस्तकाचे इंग्रजी आणि मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन
विशेष प्रतिनिधी
पुणे : पूर्वांचलातील समस्यांच्या जाणिवेबरोबरच जनजाती समाजात विश्वास निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांनी केले. तेथील भीषण समस्यांच्या निराकरणातूनच पूर्वांचलात संघकार्य उभे राहिले, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.Sangh work in Purvanchal only through solving serious problems
पूर्वांचलात ६४ वर्षे प्रचारक असलेले शशिकांत चौथाईवाले लिखित ‘माय जर्नी अॅज प्रचारक’ (इंग्रजी) आणि ‘माझी प्रचारक यात्रा’ (मराठी) या अनुवादित पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. टिळक रस्त्यावरील सर परशुराम महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात ‘माय होम इंडिया’ आणि ‘भारतीय विचार साधना’ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी भैयाजी जोशी यांच्यासह संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचारक सुमंतजी आमशेकर, लेखक शशिकांत चौथाईवाले, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, डॉ. विजय चौथाईवाले, भाविसाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे उपस्थित होते. १४ ऑगस्ट रोजी वयाची ८८ वर्ष पूर्ण करणाऱ्या शशिकांत चौथाईवाले यांचा अभिष्टचिंतन सोहळाही यावेळी झाला.
भैयाजी जोशी म्हणाले, “उपेक्षा, अपमान आणि असुविधांचा सामना करत वेळप्रसंगी जीवाचेही बलिदान देत संघ प्रचारकांनी पूर्वांचलात काम केले. शाळा, सेवाकार्ये आणि जनजातींच्या प्रश्नांना उत्तरे शोधली. आपल्यातील भेद विसरून एक झाले पाहिजे, हा विचार तेथे रुजवला. त्यामुळे आज आसाममधील अनेक प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. झोकून देऊन कार्य करणाऱ्या अशा प्रचारकांच्या पिढीचे प्रतिनिधित्व शशिकांतजी करत आहेत.”
संघ कार्याचे यश एका व्यक्तीचे नसून, सामूहिक कार्यपद्धतीचे आहे, असे उद्गार शशिकांत चौथाईवाले यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. पूर्वांचलातील संघकार्याच्या वाढीबद्दल ते म्हणाले, “उग्रवाद जसा कमी होत गेला, तसे पूर्वांचलात संघाचे काम वाढत गेले. सेवाकार्यांमुळे आज सर्व भाषांचे लोक संघाशी जोडले गेले असून, हे संघ कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे.”
आसाममधील ज्या जिल्ह्यात दहशतवाद्यांनी प्रचारकांची हत्या केली, तेथून कार्यकर्ता उभा करत नवीन प्रचारक तयार करण्याचे कार्य शशिकांतजींनी केले आहे, असे गौरवोद्गार सुमंत आमशेकर यांनी काढले. ‘माझी प्रचारक यात्रा’ हे पूर्वांचलातील संघकार्याचा धांडोळा घेणारे पुस्तक आहे. एकप्रकारे ही पूर्वांचलातील संघयात्राच असल्याचे आमशेकर म्हणाले. पूर्वांचलातील संघकार्याचा खडतर प्रवास आणि शशिकांत चौथाईवाले यांची प्रतिबद्धता, समर्पण आणि धैर्याचा प्रवास सुनील देवधर यांनी उलगडला. अनेक कार्यकर्त्यांमुळे पूर्वांचलात संघ वाढला. त्यांचे जिवंत अनुभव या पुस्तकात असल्याचे डॉ. विजय चौथाईवाले यांनी सांगितले. दिल्लीतील प्रभात प्रकाशनाने पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित केला आहे. पुस्तकाचा अनुवाद प्रा. शिवशंकर मुजुमदार यांनी केला. कार्यक्रमात अनिल वळचनकर यांनी मानपत्राचे वाचन केले, तर अभय थिटे यांनी सूत्रसंचालन केले.
राष्ट्रहितार्थ कार्यरत लोक संघाने घडविले
स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला विसरून केवळ राष्ट्रहितार्थ काम करणारे लोक संघाने घडविल्याचे भैयाजी जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, ”विकसित व्हावे अर्पित होऊन जावे, या काव्यपंक्तीला अर्थ प्राप्त करून देणारे अनेक कार्यकर्ते संघाने घडवले. संघाच्या कामावर विश्वास दाखवत पूर्वांचलातील भीषण परिस्थितीत पाऊल टाकण्याचे कार्य प्रचारकांच्या पहिल्या पिढीने केले. मागचा-पुढचा विचार न करता आहे त्या परिस्थितीला तोंड दिले. अशा कंटकाकीर्ण मार्गावरून चालणाऱ्यांमुळेच संघ विस्तारला. संघाने केवळ विचार दिला नाही, तर आचारही दिला. अनुशासनाबरोबरच सत्त्व, सामर्थ्य आणि तपस्या करण्याचे सामर्थ्य स्वयंसेवकांत निर्माण केले. स्वयंसेवक नावाच्या शक्तीशी प्रचारक नावाचा गट उभा केला.”
Sangh work in Purvanchal only through solving serious problems; A wishful thinking of Shashikant Chauthaiwale, a pracharak for 64 years!!
महत्वाच्या बातम्या
- निवडणूक आयोगावर नुसते Hit and Run करून राहुल गांधींना मोदींची सत्ता घालवता येईल का??
- महादेवपुराचे उदाहरण देणाऱ्या राहुल गांधींना बारामतीचे उदाहरण देऊन अजितदादांचे प्रत्युत्तर!!
- Israeli Attack : इस्रायली हल्ल्यात अल जझीराचे 5 पत्रकार ठार; इस्रायलने त्यांना हमास दहशतवादी म्हटले
- Parinay Phuke : बेताल विधाने करून मनाेज जरांगेंचा मीडियामध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न, परिणय फुके यांची टीका