प्रतिनिधी
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची संभाजीनगरची 1 मे महाराष्ट्र दिनाची सभा पोलिसांच्या परवानगी अभावी दोलायमान स्थितीत असली तरी राज ठाकरे यांचे पुणे आणि संभाजीनगरचे कार्यक्रम पक्के झाले आहेत.Sambhajinagar May 1 Maharashtra Day meeting in a state of flux due to lack of police permission
राज ठाकरेंची संभाजीनगरमध्ये १ मे रोजी जाहीर सभा घेण्यावर मनसैनिक ठाम आहेत.
मात्र, पोलिसांनी अद्याप या सभेला अधिकृतपणे कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेवर टांगती तलवार आहे. असे असतानाही सभेसाठी तयार व्हा आणि सभेच्या तयारीला लागा, असा आदेश मनसैनिकांना देणारे राज ठाकरेंच २९ तारखेला मुंबई सोडणार आहेत. या सभेपूर्वी राज ठाकरे २९ आणि ३० एप्रिल रोजी पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. यानंतर ते संभाजीनगरच्या सभेसाठी थेट पुण्यातून रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे.
जमावबंदीचे आदेश नाहीत
मनसेच्या पुणे शहर कोअर कमिटीची बैठक आज मंगळवारी पार पडली. या बैठकीत संभाजीनगर सभेच्या नियोजनावर चर्चा झाली. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरही बैठकीत चर्चा झाली आहे. येत्या ३ मे रोजी होणाऱ्या महाआरती संदर्भात देखील नियोजन पूर्ण झाले असून महाआरतीसाठी परवानगी देण्यासाठी शहरातील पोलीस स्टेशन मध्ये पत्र देण्याचे काम सुरु आहे, असे या बैठकीनंतर मनसैनिकांकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसेचे मुंबई, पुण्यातील कार्यकर्ते, नेते देखील राज यांच्यासोबत संभाजीनगरला निघणार आहेत. पोलिसांनी काढलेल्या जमावबंदीच्या आदेशानुसार, 26 एप्रिल ते 9 मे या काळात जमावबंदी लागू असणार आहे, अशा बातम्या माध्यमांनी प्रसारित केल्या, मात्र शहरात कोणतेही जमावबंदीचे आदेश नाहीत, असे स्पष्टीकरण औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिले.
पोलिसांनी केवळ मुंबई पोलीस अॅक्ट अन्वये आदेश जारी केला आहे. असे आदेश वर्षभर काढले जात असतात. ही चुकीची माहिती आहे. कलम १४४ अंतर्गत कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांच्या हालचाली, काठ्या आणि शस्त्र बाळगणे यावर आम्ही लक्ष ठेवत असतो, असे निखिल गुप्ता यांनी स्पष्ट केले.