डॉ. शरद कुंटे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तळजाई शिबिराला 40 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने त्या शिबिरात सहभागी झालेल्या संघ स्वयंसेवकांनी दाखविलेल्या या अनमोल आठवणी… RSS taljai shibir @40 : insisted on hindu societial equality and unity
२०२२ ची संक्रांत आली आणि ४० वर्षांपूर्वीचा तो अद्भुत प्रसंग पुनः डोळ्यांसमोर तरळू लागला. पुण्याच्या दक्षिण भागातील तुळजा भवानी मंदिराचा परिसर म्हणजे तळजाईचे पठार गणवेशधारी संघ स्वयंसेवकांनी फुलून गेले होते. तळजाई मातेच्या परिसरातील त्या भव्य व्यासपीठासमोर गणवेशधारी, शिस्तबद्ध रीतीने आखून दिलेल्या गटांतून 35000 स्वयंसेवक बसलेले होते व शिबिर पाहण्यासाठी आलेले सुमारे लाखभर नागरिक यांनी तळजाई पठारावर कुठे उभे राहायला देखील मोकळी जागा शिल्लक ठेवली नव्हती. संघाचे अगदी बालपणापासूनचे स्वयंसेवक आणि स्वरांचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कलाकार सुधीर फडके हे व्यासपीठावरून गीताच्या ओळी सांगत होते, “हिंदू सारा एक मंत्र हा, दाही दिशांना घुमवू या, धरती नभ पाताळही भार, प्राण पणाला लावू या.” या गीताचे स्वर खरोखर आसमान भेदून पलिकडे जात होते. बाबूजी आळवून आळवून “हिंदू सारा एक” या ओळीचा जयघोष करत होते आणि अत्यंत उत्साहाने समोर बसलेले सर्व नागरिक, स्वयंसेवक तो उचलून धरत होते. “हिंदू सारा एक” या भावनेने तो सारा परिसर भारावून गेलेला होता. जमलेल्या साऱ्या नागरिकांच्या मनातून इतर सर्व विकार, भावभावना आपोआप लुप्त होत होत्या. स्वतःला सर्वव्यापी म्हणवणारे राजकारण, त्याला बळ देणारे जातीपातींचे गट तट, खेड्यापाड्यातून जमिनीच्या लहान – मोठ्या तुकड्यांसाठी चाललेली भांडणे आणि त्यातून उद्भवलेले शेकडो समर प्रसंग “हिंदू सारा एक” या जयघोषामध्ये अक्षरशः विरघळून जात होते.
कोणतेही तात्पुरते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच कार्यक्रमांची आखणी करीत नाही. समाज संघटनेचे व्यापक उद्दिष्ट संघाला साध्य करायचे आहे. ज्या स्वरूपात संपूर्ण उभे राहावे असे संघाला वाटते, ती व्यवस्था रोजच्या शाखेवर संघ स्वयंसेवक अमलात आणत असतात. जे तत्त्व ते अंत:करणापासून मानतात, ज्या तत्त्वाचा ते जाहीरपणे उच्चार करतात तोच आचार शाखेवर व्यवहारात आणला जात असतो. हिंदुराष्ट्र आणि राष्ट्रीय एकात्मता ही दोन स्वयंसेवकांच्या अंतकरणात रुजलेली स्वप्रे आहेत. पण त्यासाठी येता जाता छोट्या मोठ्या व्यासपीठांवरून भाषणे करण्याची त्यांची पद्धत नाही. ते आपले विचार केवळ कृतीतून व्यक्त करतात. परंतु या संघ स्वयंसेवकांच्या सदगुणाचा गैरफायदा घेऊन संघाची यथेच्छ बदनामी करण्याचे काम समाजातील कितीतरी संस्था संघटना वर्षानुवर्षे करत आलेल्या आहेत. संघ केवळ ब्राम्हण समाजाचा आहे, संघ चातुर्वर्ण्य पाळतो, संघामध्ये जातीव्यवस्थेला स्थान आहे, डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या ज्येष्ठ समाजसेवकांना संघामध्ये मानाचे स्थान मिळत नाही, कनिष्ठ जातीच्या नागरिकांना संघ शाखेत प्रवेश मिळत नाही, संघ महिलांचा द्वेष करतो, संघामध्ये मुसलमान किंवा ख्रिश्चन समाजाचा द्वेष शिकवला जातो, असे शेकडो खोटेनाटे आरोप संघावर वर्षानुवर्षे केले जात होते. संघ कार्यकर्ते या आरोपांना उत्तर बसले नाहीत. त्याचे कारण ज्यांना खरोखर संघ समजून घ्यायचा आहे ते शाखेवर येऊन समजून घेऊ शकतातच. परंतु ज्यांना खरोखर समजून संघ समजून घ्यायचाच नाही, केवळ संघाची बदनामी करायची आहे, अशा व्यक्तींनी वातावरण गढूळ करून टाकले होते. हे गढूळ वातावरण स्वच्छ करण्याचा राजमार्ग संघ स्वयंसेवकांनी हाताळला, तो म्हणजे तळजाईचे शिबिर.
“सौ सोनारकी, एक लुहार की” अशी आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे. 100 वेळा खोट्यानाट्याचा प्रचार करणाऱ्यांना उत्तरे देत बसण्यापेक्षा संघाने एकच असा मोठा भव्य कार्यक्रम घडवला की त्यामध्ये “हिंदू सारा एक” ची अनुभूती हजारो लाखो नागरिकांना प्रत्यक्ष दर्शनातून आली. संघासंबंधीचे सगळे गैरसमज ते भव्य दृश्य पाहून नष्ट होऊन गेले. संघामध्ये एक छोटे गीत आहे, “उलझे उलझे प्रश्नोंका है उत्तर केवळ एक, हिंदू हम सब एक” या गीताची अनुभूती सुधीर फडके यांच्या “हिंदू सारा एक” या ओळीला जो जबरदस्त प्रतिसाद तळजाईच्या पठारावरील सर्व स्वयंसेवक आणि नागरिकांकडून मिळत होता, त्यातून आपोआप येत होती.
हा तर स्वप्नवत अनुभव
विदर्भ सोडून सर्व महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्वयंसेवक या शिबिरासाठी आले होते. महाराष्ट्रातील किमान 2200 गावांचे शिबिरात प्रतिनिधित्व झाले होते. म्हणजे पुणे – मुंबईसारखी मोठी शहरे, लातूर, सोलापूर पंढरपूर यासारखी छोट्या आकाराची शहरे, सर्व तालुक्यांची गावे, ज्या ठिकाणी बाजार भरतो अशा सर्वच्या सर्व गावांचे प्रतिनिधीत्व तळजाईच्या प्रांतिक शिबिरात झाले होते. त्या व्यतिरिक्त सहसा जगाच्या चर्चेच्या पटलावर नसलेली शेकडो गावे शिबिराच्या निमित्ताने जोडली गेली होती. त्या त्या ठिकाणी असणारे स्वयंसेवक शिबिराला आले होते. हे सर्व जातीपातींचे हिंदू धर्मातील सर्व पंथ संप्रदायांचे होते. अति दरिद्री गटातील व्यक्तींपासून अतिश्रीमंत गटातील व्यक्तीपर्यंत साऱ्या आर्थिक परिस्थितील स्वयंसेवकांचे शिबिरात प्रतिनिधित्व झाले होते. किंबहुना गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचे शिबिरात मोठे प्रतिनिधित्व होते. हे प्रतिनिधित्व केवळ शिविरार्थी स्वयंसेवकांमध्ये होते असे नसून या स्वयंसेवकांचे कार्यक्रम घेणारे गणशिक्षक वाहिनी प्रमुख, निवासाच्या रचना पाहता त्यात्या जिल्हयांचे पेंडॉल प्रमुख, अशा सर्व स्तरांवर हे हिंदू समाजाचे व्यापक चित्र शिबिरामध्ये उमटलेले स्पष्टपणे दिसून येत होते.
आपापल्या ठिकाणी राजकीय पक्षांची लहान मोठी पदे भूषवणारे पुढारी, आमदार, खासदार देखील सर्वसामान्य स्वयंसेवक म्हणून शिबिरात दाखल झाले होते. शिबिरामध्ये लहान – मोठे अनेक लेखक, कवी, कलाकार सहभागी झालेले होते. इतरांपेक्षा असलेले आपले वेगळेपण ठळकपणे दाखवून काही सुविधा मिळवण्याची कल्पना सुद्धा त्यापैकी कोणाच्या मनात नव्हती. त्या त्या ठिकाणी नाणावलेले व्यापारी, उद्योजक हेही शिबिरामध्ये हाफपँट घालून सर्व सहकाऱ्यांच्या संघामध्ये उभे राहून शांतपणे कार्यक्रम करताना दिसत होते.
जी अस्पृश्यता नाहीशी झाली पाहिजे म्हणून देशातील सारे पुढारी कानीकपाळी ओरडत असतात, ती अस्पृश्यता या शिबिरामध्ये औषधाला सुद्धा आढळून येत नव्हती. सर्वजण समान व्यवस्थेत होते, म्हणजे पेंडॉल मध्ये ज्याने त्याने आपापले बेडिंग अंथरले होते. सर्वजण एकत्रित राहत होते. भोजनाची व्यवस्था सामूहिक होती. त्या व्यवस्थेमध्ये रांगेत उभे राहून प्रत्येक जण आपले भोजन घेत होते. जेवण झाल्यावर आपली ताट वाटी विसळून टाकत होते. लहान मोठा सर्वांचा स्तर एक होता. सर्वजण संघस्वयंसेवक होते. “हिंदू सारा एक’ हा एक जीवन मंत्र प्रत्यक्ष अनुभव घेणारे व त्या अनुभवातून जगाला परिचय करून देणारे ते कार्यकर्ते होते.
शिविरार्थी निवास व्यवस्था जिल्हाश: होती म्हणजे 5 – 7 पेंडॉल मध्ये एका जिल्हयातून आलेले सर्व स्वयंसेवक निवासाला होते. परंतु या सर्व निवासी व्यवस्थेच्या व्यतिरिक्त केवळ व्यवस्थेसाठी अनेक तंबू उभारण्यात आले होते. एका तंबूमध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागांतून आलेल्या मान्यवर व्यक्तींचा निवास होता. हे अतिथी कोणी संघस्वयंसेवक नव्हते, परंतु कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, व्यापार, उद्योग, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये ज्यांचे मोठे स्थान आहे अशा अनेक नामवंत व्यक्तींना शिबीर पाहण्यासाठी मुद्दाम पाचारण केले होते. त्यांची स्वतंत्र व्यवस्था एक पेंडॉल मध्ये करण्यात आली होती. या पेंडॉल मधील व्यवस्थांचे प्रमुख होते डॉ. श्रीपती शास्त्री. त्यावेळी हे पुणे महानगराचे कार्यवाह होते. नंतर महाराष्ट्र प्रांत कार्यवाह, क्षेत्र कार्यवाह आणि अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख अशा अनेक जबाबदाऱ्या श्रीपती शास्त्री यांनी स्वीकारल्या. तळजाई प्रांतिक शिबिराचे वेळी ते पुणे विद्यापीठामध्ये इतिहास विषयाचे विभागप्रमुख होते. आलेल्या बहुतेक निमंत्रित सदस्यांचा त्यांचा व्यक्तिगत ग्रेड होता. त्यांच्या संघासंबंधी उपस्थित झालेल्या अनेक शंकांचे निवारण करणे, त्यांना शिबिर आणि शिबिरातील विविध व्यवस्था दाखवण्यासाठी घेऊन जाणे, प्रांत आणि मअखिल भारतीय स्तराच्या पदाधिकाऱ्यांच्या ओळखी करून देणे, अशी सर्व कामे श्रीपती शास्त्री करत होते. ज्यांनी यापूर्वीच्या जीवनात संघाला जातीयवादी ठरवून भरपूर टीका केली होती, असेही अनेक जण त्यांच्या पेंडॉलमध्ये होते. त्यांना श्रीपती शास्त्रींनी खुले आव्हान दिले की आता व्यापक स्वरूपात संघ तुमच्या समोर प्रत्यक्ष उभा आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या कल्पनेतील जातीयता, संकुचितता कुठे दिसते ते स्वतः जाऊन पाहा. तुम्ही पाहायला येणार म्हणून संघाने कोणतीही वेगळी व्यवस्था किंवा रचना केलेली नाही. जे संघाचे मूळ स्वरूप आहे ते तुम्ही स्वतः जाऊन पाहिले तर तुमच्या मनातील शंका दूर होतील. या शिबिरासाठी उपस्थित राहिलेल्या ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत शंकरराव खरात यांना सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे भाषण ऐकून अक्षरशः भरून आले. जो सामाजिक बदल घडविण्यासाठी आम्ही आपले आयुष्य खर्च केले, ते अद्भुत काम संघाने कसे करून दाखवले?, असा प्रश्न शंकरराव वारंवार उपस्थित करत होते आणि त्यांचे समाधान करताना श्रीपती शास्त्री एकच उत्तर वारंवार देत होते, हे घडवण्याचा संघाचा महामंत्र आहे “हिंदू सारा एक”!!
नामवंत कलाकार दादा कोंडके हे देखील या विशेष निमंत्रित पेंडॉलमध्ये होते. आपण थोडी ओळख लपवून आलेल्या नागरिकांमध्ये मिसळावे, अशा कल्पनेने त्यांनी थोडी वेशभूषा बदलून शिबिर पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये प्रवेश केला. परंतु तिथे त्यांना सामाजिक ऐक्या व्यतिरिक्त कोणत्याही विषयाची चर्चा ऐकायला मिळाली नाही. अल्पावधीतच दादा कोंडके यांना प्रेक्षकांमध्ये अनेकांनी ओळखले. त्यांनी काही आपले सिनेमा अथवा नाटकातील संवाद म्हणून दाखवावेत म्हणून काही प्रेक्षक त्यांच्या मागे लागले. सर्वच कलाकार प्रसिद्धीची मिळालेली संधी कधी सोडत नाहीत. परंतु आपण किती गंभीर स्वरूपाच्या कार्यक्रमात उपस्थित आहोत याचे दादा कोंडके यांना पूर्ण भान होते. त्यामुळे त्यांनी या प्रेक्षकांना नमस्कार करून त्यांची क्षमा मागितली आणि अशा प्रकारची कला कुसर दाखवण्याचा हा प्रसंग नाही, असे सांगून दादा तिथून निघून गेले. आलेल्या संघाबाहेरच्या अशा व्यक्तींना देखील संघाने सर्व परिसरात निर्माण केलेले ” हिंदू सारा एक” हे वातावरण इतर काही क्लृप्त्या करून बिघडविण्याची इच्छा देखील झाली नाही, एवढा त्या वातावरणाचा प्रभाव होता.
महापालिका सेवकांमध्ये घडला कायापालट
शिबिरातील बहुतेक सर्व व्यवस्था स्वयंसेवक स्वतः सांभाळत होते. परंतु त्यातील अनेक व्यवस्थांसाठी महापालिका आणि शासकीय सेवांवर अवलंबून राहणे भाग होते. त्यातील एक सेवा होती, स्वच्छता विभाग. या विभागात काम करण्यासाठी महापालिकेने आपल्या ठेकेदारांकरवी अनेक कर्मचारी बोलवले होते. हे सगळे पुणे शहराच्या पूर्व भागातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे होते. सुदैवाने संघाच्या कामानिमित्त माझा त्या भागात चांगला संपर्क होता. त्या त्या वस्तीमध्ये राहणाऱ्या व महापालिकेत सेवकांची कामे करणाऱ्या अनेकांशी मिलिंद एकबोटे आणि इतर सहकाऱ्यांचा चांगला जवळचा संपर्क होता. प्रत्येक झोपडपट्टीमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे गट, त्यांच्या संघटना असतातच. अशा काही संघटना आणि राजकीय पक्षांचे गट हे संघ द्वेषासाठीच वर्षानुवर्ष प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांनी आपापल्या वस्तीतील युवकांना जाती संघर्षाशी संबंधित बरेच काही खोटेनाटे सांगून भडकावून दिले होते. संघ जातीयवादी आहे, तो मागासवर्गीयांना जवळ करत नाही, कामानिमित्त फक्त संपर्क ठेवतो आणि ते जवळ आले तर त्यांचा द्वेष करतो, त्यांना हिडीसफिडीस करतो. संघाचे अखिल भारतीय पदाधिकारी हे चातुर्वर्ण्य व्यवस्था मानणारे आहेत, असे त्यांनी भरवून दिले होते. ज्यावेळी श्रीगुरुजींच्या कल्याण मासिकातील एका लेखासंबंधी देशभर वेडीवाकडी चर्चा चालू होती, त्यावेळी या गरीब वस्त्यांमधील अनेक सेवकांना भरीस घालून काही राजकीय पक्षाचे लोकांनी पुण्याच्या पूर्व भागातील झोपडपट्ट्यांमध्ये श्रीगुरुजींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा देखील काढलेली होती. हे सर्व त्या सेवकांकडून मला नंतर समजले. प्रत्यक्ष संघाच्या संपर्कात येऊन संघाची काही प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी या युवकांना पहिल्यांदाच तळजाई शिबिरामध्ये मिळाली होती.
महापालिकेने स्वच्छता विभागासाठी आपल्या कॉन्ट्रक्टर्सना काम दिले. त्या कॉन्ट्रक्टर्सनी या विविध झोपडपट्टीतील शेकडो युवकांना तळजाई शिबिरातील स्वच्छतेचे काम दिले. त्या कामानिमित्त हे सेवक शिबिरामध्ये मुक्तपणे वावरत होते. परंतु तीन दिवसाचा शिबिरातील त्यांचा अनुभव असा होता की त्यांना कधीच कुणी हिडीसफिडीस केली नाही. त्यांना आपल्यापासून दूर ढकलले नाही. उलट पेंडॉल मध्ये चहा नाश्त्याची वेळ असेल आणि आजूबाजूला हे सेवक दिसले तर त्यांना आवर्जून आपल्याबरोबर नाश्ता घेण्यासाठी बोलवण्यात येत असे. जेवणाची वेळ असेल तर आवर्जून या सेवकांना इतर सर्व स्वयंसेवकांच्या बरोबर जेवायला बोलवत असत. आपण आजवर संघाबद्दल काय ऐकले आणि प्रत्यक्ष काय पाहतो आहोत यासंबंधी या युवकांच्या मनामध्ये गोंधळ उडणे स्वाभाविक होते. परंतु जेव्हा वेगवेगळ्या पेंडॉल मध्ये अधिकाऱ्यांची चाललेली भाषणे त्यांनी ऐकली, तेव्हा संघ केवळ हिंदू एकतेचीच भाषा बोलतो, तो कधीच जातीपातींचे बोलत नाही हे त्यांना प्रत्यक्ष दिसून आले. शेवटच्या दिवशी पू. पू. बाळासाहेब देवरस यांच्या भाषणामध्ये “हिंदू सारा एक” हा विषय एवढ्या तीव्रतेने आणि तळमळीने मांडला गेला की इतर अनेक नागरिकांबरोबरच आपापल्या नोकरीसाठी या ठिकाणी आलेल्या या सेवक वर्गावर देखील त्या भाषणाचा खूप चांगला प्रभाव पडला. शिबिर संपल्यावर ज्या वेळी हे युवक मला भवानी पेठेतील त्यांच्या वस्त्यांमध्ये भेटले, त्यावेळी त्यांनी प्रथम माझी क्षमा मागितली. आम्ही संघासंबंधि चुकीची कल्पना बाळगून होतो, परंतु जो संघ आम्हाला सांगण्यात आला त्यापेक्षा प्रत्यक्षात असलेला संघ खूप वेगळा आहे. हे आम्ही जवळून पाहिले. त्यामुळे अशा खोट्या प्रचारावर यापुढे आम्ही विश्वास ठेवणार नाही, असे या युवकांनी आत्मविश्वासाने आम्हाला सांगितले. कोणतेही औपचारिक शिक्षण न झालेले, समाजात कोणतेही मानाचे स्थान नसलेले, समाजाच्या दृष्टीने अत्यंत कमीपणाची कामे नाईलाज म्हणून करणारे हे युवक जेव्हा प्रत्यक्ष संपर्कात आले, त्यावेळी त्यांना जो संघ दिसला तो त्यांच्या पूर्वीच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळा होता. “हिंदू सारा एक” या मंत्राची अनुभूती त्यांनी शिबिरात येऊन प्रत्यक्षात घेतली. त्यापुढे आयुष्यभरात कधीही ते संघापासून दूर राहिले नाहीत. शिबिराच्या वातावरणाचा हा असा प्रभाव पुणे शहरावर पडला होता.
समाजाकडून मदतीचा महापूर
संघाला कधीही लोकांच्या कडून वर्गणी अथवा मदत गोळा करावी लागत नाही. कारण वर्षभरातील संघाचे सर्व खर्च हे स्वयंसेवक त्यांच्याकडून झालेल्या गुरुदक्षिणेच्या आधारावरच भागवले जातात. परंतु तळजाईचे प्रांतिक शिबिर हा इतका मोठा उपक्रम होता की त्यासाठी येणारा खर्च हा कितीतरी मोठा होता. संघाच्या दैनदिन गुरुदक्षिणे मधून हा खर्च भागविणे शक्य नव्हते. त्यामुळे संघ पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी बैठका घेऊन शिबिराच्या संचलनासाठी नेमक्या कोण कोणत्या वस्तू लागणार आहेत, काय काय खर्च येणार आहेत याची यादी सर्व स्वयंसेवकांकडे दिली. या वस्तू विविध संस्थांकडून मदतीच्या स्वरुपात मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. संघाचा समाजामध्ये असलेला प्रचंड जनाधार या निमित्ताने लोकांच्या नजरेत आला. कार्यकर्त्यांनी अनेक मोठया मंदिरांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून अत्र बनविण्याची भांडी आणि इतर साधन सामग्री मिळविली. अनेक व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून शिबिरातील लोकांच्या भोजनासाठी लागणारे धान्य एकतर मोफत किंवा अत्यंत कमी किमतीमध्ये मिळवले. फिनोलेक्स सारख्या मोठ्या कंपनीशी संपर्क साधून त्यांनी पाणी वाहतूकीसाठी पाईप लाईन मोफत उपलब्ध करवून घेतल्या. काही कंपन्यांनी आपल्या जवळची जीप सारखी वेगाने हालचाल करणारी वाहतुकीस मदत करणारी वाहने देखील वापरायला दिली. अनेक उद्योजकांनी शिबिराच्या इतर खर्चासाठी स्वतःहून रोख रक्कम दिली. या सर्व सहकार्यामुळे संधाला प्रत्यक्षात शिबिरासाठी करावा लागणारा खर्च हा खूपच मर्यादित झाला. इतर बरेचसे काम स्वयंसेवकांनी श्रमदानाने पूर्ण केले. जर संघ समाजात विद्वेष निर्माण करणारे असे काही कार्य करत असता, तर समाजाकडून संघाला असा व्यापक स्वरूपात पाठिंबा मिळू शकला असता का? संघाला सर्व समाजाकडून भरपूर मदत उपलब्ध झाली याचे कारण संघाने समाजाचा कोणताच घटक अस्पर्शित ठेवला नव्हता. “हिंदू सारा एक” या तत्त्वाला अनुसरून हिंदू समाजातील सर्व घटकांशी आत्मीयतेचे संपर्क स्थापन करण्याचे काम स्वयं सेवकांनी वर्षानुवर्षे केले होते, त्याचीच ही फलनिष्पत्ती होती.
गुळाच्या पोळ्यांचा पाऊस
15 जानेवारी रोजी संक्रांतीचा उत्सव आला होता. आणि त्यामुळे शिबिरातील दोन दिवस हे संक्रांतीशी संबंधित असे होते. सणाच्या दिवशी महाराष्ट्र प्रांताच्या गावागावातून शिबिरासाठी आलेल्या हजारो स्वयंसेवकांना गुळाच्या पोळ्या देऊन सणाच्या आनंदात सहभागी करुन घ्यावे, अशी कल्पना अनेक पुणेकर नागरिकांनी मांडली. ही पर्वणी साधून संघाच्या स्वयंसेवकांनी पुणेकर नागरिकांना असे आवाहन केले की शिबिरातील सर्व स्वयंसेवकांसाठी नागरिकांनी गुळाच्या पोळ्या गोळा करून द्याव्यात. हा संदेश सर्व नागरिकांमध्ये अगदी खोलपर्यंत पोहोचला. मोठ्या बंगलेवजा वस्त्या तर सोडाच, शहरातील विविध चाळी, वाडे, झोपडपट्ट्यांमधून देखील स्वयंसेवकांच्यासाठी गुळाच्या पोळ्या स्वतंत्रपणे तयार करण्यात आल्या. नागरिकांनी टेम्पो आणि ट्रक भरभरून गुळाच्या पोळ्या शिबिरस्थानी पाठविल्या. शिबिरासाठी आलेल्यांना गुळाची पोळी मिळावी म्हणून संघ कार्यकर्त्यांना एकही रुपया खर्च करावा लागला नाही. संघ जर महिलांच्या संबंधात द्वेष बाळगणारा असता, हिंदू संघटनेत जर महिलांना कोणतेही स्थान नाही असा विचार संघाने मांडला असता, तर घराघरातील महिलांनी शिबिरासाठी गुळाच्या पोळ्या तयार करून पॅकिंग करून पाठवण्याचे कष्ट घेतले असते का? वास्तवात संघ सर्व नागरिकांना आपला वाटत होता. पुरुषांना तसेच स्त्रियांनाही तो आपला वाटत होता. “हिंदू सारा एक” या मंत्रामध्ये स्त्री – पुरुष भेद कुठेही व्यक्त केलेलाच नाही. संघ स्वयंसेवक ज्यावेळी घराघरांमध्ये संबंध ठेवतात, त्यावेळी ते घरातील महिलांशीही चांगली चर्चा करतात. संघाचे तत्त्वज्ञान तसेच इतर विषय घरापर्यंत पोहोचवण्याचे कामही ते करतात. या घराघरापर्यंत असलेल्या संपर्काचा परिणाम शिबिरामध्ये पहायला मिळाला व शिविरातील स्वयंसेवकांच्या वर पुणेकर नागरिकांनी अक्षरश: गुळाच्या पोळ्यांचा वर्षाव केला.
संचलनातून घडले अभूतपूर्व शक्तीचे दर्शन
तसा तळजाई शिबिरातील प्रत्येक कार्यक्रम हा वैशिष्ट्यपूर्ण असाच होता. परंतु सर्व समाजाचे डोळे विस्फारले ते स्वयंसेवकांच्या अत्यंत शिस्तबद्ध संचलनामुळे. मूळातच पुणे शहरापासून 10 किलोमीटर दूर असलेल्या स्थानापासून शहरात येऊन संचलन काढता येईल का?, यासंबंधी पुष्कळ आधीपासून चर्चा चालू होती. त्यातून शिबिरामध्ये असलेली स्वयंसेवकांची संख्या 35000 एवढी प्रचंड होती. परंतु या संचलनाचे अतिशय उत्कृष्ट नियोजन हे शिबिर स्थानी असलेल्या कार्यकर्त्यांनी केले. दोन वेगवेगळ्या मार्गांनी संचलने निघाली. प्रत्येक संचलनाची लांबी जवळजवळ 10 किलोमीटर एवढी होती. एक संचलन उंबऱ्या गणपती चौकातून लक्ष्मी रोडला वळून बाजीराव रोडच्या चौकापर्यंत आणि दुसरे संचलन शिवाजी रस्त्याने लक्ष्मी रोडला वळून बाजीराव रोड चौकात आले. ही संचलने ठराविक वेगाने प्रवास करत जिथे एकमेकांना मिळणार होती ती वेळ अतिशय नियोजनपूर्वक साधण्यात आली. एकाच वेळी दोनही संचलनांचे घोष समोरासमोर आले आणि घोषदंड उंच उडवून त्यांनी परस्परांचे स्वागत केले. त्यानंतर ४ च्या गटात गेलेले संचलन हे ८ ओळींमध्ये एकत्र होऊन परत आले. हा ही एक आश्चर्यकारक प्रयोग म्हणावा लागेल. त्या दिवशी संपूर्ण पुणे शहरातील वाहतूक केवळ संचलन पाहण्यासाठी खोळंबली होती. हजारो गणवेशधारी स्वयंसेवक अत्यंत शिस्तीने पुण्यातील रस्त्यावरून संचलन करत चालले आहेत. ते पाहण्यासाठी लाखो पुणेकर नागरिक आजूबाजूच्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी करून उभे आहेत असे अभुतपुर्व दृश्य पुणे शहराने पाहिले. शिबिरामध्ये उपस्थित झालेला लहान अथवा थोर, गरीब अथवा श्रीमंत, उच्च अथवा कनिष्ठ जातीचा स्वपसेवक हे सर्व या संचलनात सहभागी झाले. सर्वजण 20 किलोमीटर चालले. अशा प्रकारे रोजच्या चालण्याची सवय नसताना देखील या कार्यक्रमाच्या वेळी कोणत्याही बेशिस्तीचे दर्शन स्वयंसेवकांनी केले नाही. या सर्व गोष्टींची समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रशंसा झाली. शिबिराचे संचलन हा इतर सर्व कार्यक्रमांमध्ये असलेला सर्वोच्च यशाचा बिंदू ठरला. या संचलनाचे पुणेकर नागरिकांनी ज्या प्रचंड उत्साहाने स्वागत केले, त्यामुळे पुन्हा एकदा पुणेकर जनतेशी घरोघर संपर्क ठेवण्याच्या बाबतीत संघ स्वयंसेवकांचे अभूतपूर्व कौशल्य जनतेसमोर स्पष्ट झाले. जर संघ समाजातील कोणत्याही घटकांमध्ये काही द्वेषमूलक अशा प्रकारचे विचार प्रस्तुत करत असता तर संपूर्ण समाजातून अशा संचलनाला प्रतिसाद मिळाला नसता. किंबहूना अशा प्रदर्शनातून शहरात दंगली घडल्या असत्या. यापैकी काहीही घडले नाही याचे कारण संघाचे विचार, उच्चार व कृती एकाच आहेत.
“हिंदू सारा एक” हा सर्व स्वयंसेवकांचा महामंत्र होता. त्याच महामंत्राचे दर्शन या संचलनाच्या निमित्त घडले.
हिंदू ऐक्याचा विचार हा संघ स्वयंसेवकांच्या विचार व कृतीमध्ये असतोच. त्यासाठी शिविरासारख्या वेगळ्या कार्यक्रमाचे निमित्त असावे लागत नाही. पण जेव्हा असा एखादा मोठा
कार्यक्रम येतो, त्यावेळी आपल्या विचारांनुसार आपण केलेली कृती ही खरोखरच योग्य प्रकारे झाली आहे की नाही, याची समाजाकडून पावती मिळते. अशी पावती संपूर्ण पुणेकर जनतेकडून तळजाई शिबिराच्या वेळी मिळाली. “हिंदू सारा एक” या महामंत्रावर संपूर्ण समाजाचे शिक्कामोर्तब झाले. ते दिवस होते 13, 14, 15 जानेवारी 1983. आज 40 वर्षानंतर ही शिबिराचा तो भव्य सोहळा आणि सुधीर फडके तसेच बाळासाहेब देवरस पांनी घुमवलेला “हिंदू सारा एक” असा नारा जसाच्या तसा आठवतो आहे. त्याला पुणेकरांनी दिलेली पावती हेच त्याचे कारण आहे.
– डॉ. शरद कुंटे
(ज्येष्ठ संघ कार्यकर्ता, अध्यक्ष डेक्कन एज्युकेशन सोसायटी)
RSS taljai shibir @40 : insisted on hindu societial equality and unity
महत्वाच्या बातम्या
- कौशल्य विकासच्या रोजगार मेळाव्यात 14 हजार 90 जागांसाठी मुलाखती, लवकरच नोकरीची संधी
- शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची; १७ जानेवारीला सुनावणी, पण फैसला कधी आणि कशाच्या आधारावर??; वाचा तपशील
- 21 पक्षांना पत्र पाठवून काँग्रेस विरोधकांची एकी साधतेय की बेकी??
- जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख चौधरींचे निधन; भारत जोडो यात्रेत राहुलजींसोबत चालताना हार्ट अटॅक