प्रतिनिधी
जालना : मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलन महाराष्ट्रात हिंसक झाले असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे मनोज जरांगे पाटलांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटलांना एक सल्ला दिल्याचे दिसत आहे. निवडून आलेल्या सर्व मराठा आमदार – खासदारांच्या घरांसमोर आंदोलन करा, कारण सत्ता राष्ट्रवादीची असो, काँग्रेसची असो अथवा भाजपची असो, श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांच्या मतांवर स्वतःच्या सत्तेची आणि संपत्तीची वाढ केली, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी या पत्रात केला आहे. Rich nizami maratha community increased their power and wealth by capturing poor maratha votes
मराठा आंदोलन हिंसक झाले असताना प्रकाश आंबेडकरांचे पत्र व्हायरल होणे याला विशेष महत्त्व आहे. बीडच्या माजलगावात अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचे घर आणि गाडी मराठा आंदोलकांनी पेटवली त्यानंतर त्यांनी माजलगाव नगरपरिषदेला देखील आग लावली.
प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना खुले पत्र लिहिलं आहे. मराठा आंदोलकांनी आंदोलनाची दिशा बदलण्याचा सल्ला आंबेडकर यांनी या पत्रातून दिला आहे. तुम्ही आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करा, तरच ते जागे होतील. हलतील आणि संसदेत तुमची मागणी लावून धरतील, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
आंबेडकरांचं पत्र जसंच्या तसं
माननीय, मनोज जरांगे पाटील,
आपणास नमस्कार.
गरीब आणि रयतेच्या मराठ्यांच्या आरक्षणासाठी आपण पुढाकार घेऊन मोठं आंदोलन उभं केलं आणि प्रस्थापित निजामी मराठा नेतृत्वाच्या विरोधात समाजात जागृती निर्माण केली आहे. 2014 नंतर मनुस्मृती मानणाऱ्या व्यवस्थेची गढी दुर्दैवाने देशात आणि राज्यात सत्तेत आली आहे, आणि या सत्तेच्या विरोधात कुणी आवाज बुलंद केला तर त्यांचे मानसिक, सामाजिक, राजकीय खच्चीकरण करून जातीजातीत भांडण लावून देण्यात येते. हे थांबवणे गरजेचे आहे.
आपण प्रामाणिकपणे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी या शोषणा विरुद्ध लढा उभा करीत आहात आणि त्यासाठी तुमचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. समाजात लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करणारेच राहिले नाहीत तर त्यांची बाजू कोण घेणार? गरीब, रयतेच्या मराठ्यांना आपला फार मोठा आधार वाटत आहे, त्यामुळे आपण स्वतःचा जीव सांभाळावा असे मी आपणास आवाहन करतो.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागणी करणारे गरीब मराठे आणि सदरची मागणी पूर्ण करू शकणारे सत्ताधारी निजामी मराठे असे दोन्ही बाजूने मराठे असूनही गरीब मराठ्यांची मागणी पूर्ण होत नाहीये. सत्ता काँग्रेसची असो, भाजपची असो किंवा राष्ट्रवादीची असो यांनी गरीब मराठ्यांच्या प्रश्नाला कधीच महत्त्व दिले नाही. उलट सत्ताधारी श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांच्या मतावर स्वतःच्या संपत्तीत आणि सत्तेत निरंतर वाढच केलेली आपल्याला दिसते. आपण पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
आंदोलन आणि लोक जागृतीद्वारे या विषयावर गांभीर्य निर्माण केले आहे. परंतु दुर्दैवाने सत्ताधारी राज्यकर्ते अतिशय निर्दयी होऊन आपल्या आमरण उपोषणाला दुर्लक्षित करीत आहेत. वर्तमानातील या सत्तेला मानवीय चेहरा नाहीय, असेच म्हणावे लागत आहे. आज अनेक मराठा तरुण या निराशेतून आत्महत्या करीत आहेत. त्यांच्या कडेही सध्याचे 3 पक्षाचे सत्ताधारी राज्यकर्ते दुर्लक्ष करतांना उभा महाराष्ट्र बघत आहे.
मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे येऊन गेले. परंतु त्यांनी देखील मराठा समाजाच्या आरक्षणाचा साधा उल्लेख देखील केला नाही. या पूर्वीच्या राज्यकर्त्यां प्रमाणेच वर्तमानातील केंद्र आणि राज्य सरकार यांची भूमिका देखील ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच आहे. त्यामुळे आता आंदोलन करत रहाणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण आपली तब्येत सांभाळली पाहिजे. आपण पाणी सुध्दा घेत नाही ही चांगली गोष्ट नाही. आपण किमान नारळाचे पाणी तरी घ्यावे.
वंचित बहुजन आघाडी आपल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीतला आहे. त्यामुळे जोपर्यंत निवडून गेलेल्या आमदार आणि खासदारांच्या निवासस्थाना समोर धरणे आंदोलन होत नाही, तोपर्यंत केंद्र आणि राज्यशासन हा प्रश्न गांभीर्याने घेणार नाही, आणि ते जागेवरून हलणार देखील नाही. या संदर्भात आम्ही आपल्याला हे सूचवत आहोत की मराठा आरक्षणाची तीव्रता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून निवडून गेलेले जे खासदार आणि आमदार आहेत, त्यांच्या घरासमोर निदर्शने करावी. तरच ते जागेहून हलतील. त्यामुळे आपण या उपोषणाला त्यादृष्टीने योग्य वळण द्यावे अशी विनंती आम्ही आपल्याला करीत आहोत.
या अकार्यक्षम सरकारच्या विरोधात आपला जीव धोक्यात न घालता येत्या निवडणुकीत याच सरकारमधील किंवा सर्वच पक्षांमधील आमदार, खासदार, मंत्र्यांना सत्तेतून खाली कसे उतरवता येईल, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आवश्यक आहे. गरीब मराठ्यांचे आर्थिक साधने, रोजगार आणि शेतीची दूरवस्था यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, जे सोडवणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी तुमचं असणं अपरिहार्य आहे.
पुन्हा एकवेळ आवाहन करतो की, आपण स्वतःचा जीव सांभाळावा.
ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी
मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलन भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी या तीन पक्षांवर रोष व्यक्त करत आहेत. काँग्रेस अथवा शरद पवारांची राष्ट्रवादी याविषयी मराठा आंदोलकांनी जरंगे पाटील बोलताना दिसत नाहीत.
या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी लिहिलेल्या पत्रानंतर जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात??, मराठा आंदोलक भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या आमदार खासदारांच्या घरांसमोर त्याचबरोबर शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या आमदार – खासदारांच्या घरांसमोर आणि काँग्रेसच्या आमदार – खासदारांच्या घरांसमोर आंदोलन करणार का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Rich nizami maratha community increased their power and wealth by capturing poor maratha votes
महत्वाच्या बातम्या
- आंध्र प्रदेशातील रेल्वे अपघाताचे कारण आले समोर, मृतांची संख्या 13 वर, ड्रायव्हरने सिग्नल ओव्हरशूट केल्याने दुर्घटना
- ‘आप’च्या राजवटीत दिल्ली गुदमरत आहे’ बांसुरी स्वराज यांनी केजरीवाल सरकारवर केली टीका
- आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात, मृतांची संख्या ९ वर पोहचली, ४० पेक्षा अधिकजण जखमी
- ना बंड, ना आदळआपट; मध्य प्रदेश भाजपात सहज सांधा बदल; काँग्रेस आणि “इंडिया” आघाडी यातून काही शिकतील??