विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायद्याच्या कसोटीवर अजित पवारांना मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून त्यांच्या पक्षाचे आमदार पात्र ठरवले. त्याचवेळी शरद पवार गटाचे आमदारही पात्र ठरवले. पण शरद पवारांच्या तीन याचिका फेटाळल्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीकेचे वार केले.Raut and sule targets assembly speaker, but sharad pawar failed to his own election and representatives elections legally
कायदे मोडूनच सगळे निकाल देणे सुरू आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकरांकडून दुसरी वेगळी काय अपेक्षा ठेवणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला हा कॉपी-पेस्ट निकाल अध्यक्षांनी दिला आहे शिवसेना ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस एवढेच नाव बदलले आहे. बाकी निकालात काहीही फरक नाही. कारण भाजपला प्रादेशिक पातळीवरचे पक्ष संपवायचे आहेत. प्रादेशिक पक्षांच्या गळचेपीचा हा प्रकार आहे, असे टीकास्त्र सुप्रिया सुळे यांनी सोडले.
राहुल नार्वेकर हे रामशास्त्री नाईक ते दामशास्त्री आहेत, असे शरसंधान संजय राऊत यांनी साधले.
विधानसभा अध्यक्षांवर शरद पवार गटाच्या नेत्यांनी अशी आगपाखड केली असली तरी,पण प्रत्यक्षात विधानसभा अध्यक्षांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक, पक्षाध्यक्षांची निवडणूक, पक्षाची संरचना, पक्षाची घटना आणि पक्षाच्या प्रतिनिधींची निवडणूक या कायदेशीर निकषांबाबत पुरावे सादर करण्यात शरद पवार गट का कमी पडला??, हा सवाल तयार झाला आहे.
कारण विधानसभा अध्यक्षांनी वर उल्लेख केलेल्या तीन निकषांवर शरद पवार गट सुनावणीत कुठलेही पुरावे सादर करू शकला नाही, असा ठपका ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेनुसार पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी सर्वोच्च आहे. पक्षाचा विविध स्तरांवर निवडणुकांद्वारे पदाधिकारी भरले जातात, असे पक्षाच्या घटनेत म्हटले आहे तसेच अध्यक्षांची निवडणूकही पक्षाच्या घटनेनुसार होते, असेही त्यात नमूद आहे.
शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी पक्षाध्यक्ष पदावर दावे केले, पण शरद पवार गट कुठल्याही स्तरावर प्रतिनिधींची निवडणूक घेतल्याचे कोणतेही पुरावे सादर करू शकला नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचनात स्पष्ट केले.
त्यामुळे खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अध्यक्षांवर टीका केली असली, तरी प्रत्यक्षात शरद पवार गट सुनावणीच्या वेळी प्रतिनिधी निवडणुकीचे कायदेशीर पुरावे का सादर करू शकला नाही??, हा सवाल तयार झाला आहे.