• Download App
    Ramtirth Godavari seva गणेशोत्सवात गोदावरी महाआरतीचा नासिकचा अभिमान; रामतीर्थ गोदावरी सेवा समितीला देशभरातून आमंत्रणाची पर्वणी

    गणेशोत्सवात गोदावरी महाआरतीचा नासिकचा अभिमान; रामतीर्थ गोदावरी सेवा समितीला देशभरातून आमंत्रणाची पर्वणी

    विशेष प्रतिनिधी

    नासिक : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा परमोच्च बिंदू म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव. 10 दिवस चालणारा हा उत्सव भक्तिभाव, आनंद, समाजसेवा आणि एकात्मतेचा महामहोत्सव म्हणून साजरा होतो. महाराष्ट्रातील प्रत्येक गल्लीबोळ, प्रत्येक गाव या दिवसांत गणेशमय होतो. परंतु या उत्सवाच्या सजावटी, भजन, कीर्तन, सामाजिक उपक्रमांच्या सोबतच एक वैशिष्ट्यपूर्ण आयाम म्हणजे गोदावरी महाआरती. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या पुढाकारामुळे गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवातील या महाआरतीने महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा दिली आहे.

    देशभरातून आमंत्रणांची पर्वणी

    दरवर्षीप्रमाणे यंदाही समितीला महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून महाआरती सादर करण्यासाठी आमंत्रणे प्राप्त झाली आहेत. नाशिक जिल्ह्यातील झोडगे, मालेगाव, सटाणा, संभाजीनगर, ईश्वरपूर, तसेच कोल्हापूर, सांगली, पुणे या शहरांसह महाराष्ट्राच्या पलिकडे गुजरातमधील सुरत, ब्यारा, कर्नाटकातील मुधोळ, आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम आणि अगदी काश्मीर मधून ही आमंत्रणे पोहोचली आहेत. समितीकडे याची लेखी नोंद असून, हे नासिककरांसाठी अभिमानास्पद ठरले आहे. गोदामातेचे पावित्र्य आणि नासिकच्या धार्मिक वारशाची पताका देशभर फडकत असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.



    मुंबई, कोल्हापूरमध्ये भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

    गत दोन दिवसांत मुंबई आणि कोल्हापूर येथे झालेल्या महाआरतींना असंख्य भक्तांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. आरतीच्या वेळी हजारोंच्या संख्येने भाविकांनी गोदामातेच्या गजरात सहभाग घेतला. विशेष म्हणजे मुंबईतील काळाचौकी मित्र मंडळातर्फे आयोजित महाआरतीचे थेट प्रक्षेपण केवळ एका तासात दीड लाखांहून अधिक भक्तांनी ऑनलाईन पाहिले. हा एक विक्रम मानला जात असून, गोदावरीवरील भक्तीभाव आणि नासिकच्या संस्कृतीबद्दल असलेल्या जनमानसातील प्रेमाचे हे प्रतीक ठरले आहे.

    नासिकचा अभिमान; गोदामातेचा झगमगता दीप

    समितीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या यशाचे श्रेय नासिककरांच्या श्रद्धा, प्रेम आणि पाठिंब्याला दिले. ही महाआरती केवळ धार्मिक सोहळा नाही; ती गोदामातेच्या पावित्र्याची, नासिकच्या अध्यात्मपर संस्कृतीची आणि राष्ट्रीय एकात्मतेची झगमगती पताका आहे, अशा भावना समितीने व्यक्त केल्या. युवा गोदासेवकांनी दाखविलेला उत्साह, नि:स्वार्थी श्रम आणि समर्पण पाहून समितीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

    भाविकांसाठी प्रेरणास्थान

    गोदावरी महाआरती हा उपक्रम केवळ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा नव्हे, तर समस्त नाशिककरांचा अभिमानाचा ठेवा आहे. नासिककरांचे अलोट प्रेम आणि सहकार्यामुळेच हे उपक्रम यशस्वी होतात. आगामी काळात या महाआरतीचा प्रेरणादायी प्रकाश संपूर्ण देशभर पसरून गोदामातेच्या नामस्मरणाचा जाज्वल्य दीप प्रज्वलित ठेवेल, यात शंका नाही, अशा भावना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सचिव मुकूंद खोचे आणि राजेंद्र फड तसेच समितीच्या अन्य सदस्यांनी व्यक्त केल्या.

    Ramtirth Godavari seva samiti invited to perform Godavari Aarti from all over India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Guardian Minister : आठ महिने झाले ; पालकमंत्रीपदाचा वाद सुटता सुटेना !

    आजी म्हणाली, रोहित उगवता तारा; पण काकाने सांगितले, भावकीने पडता पडता वाचाविला!!

    मानकरांचे राजकीय भवितव्य अधांतरी; निवडणुकीतील कमबॅकबाबत साशंकता