विशेष प्रतिनिधी
नाशिक : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पावन पर्वदिनी आज नाशिकचा गोदाघाट समता, बंधुता आणि समरसता यांच्या महाआरतीने दुमदुमला. नाशिकच्या गोदावरी तीरावर एक ऐतिहासिक धार्मिक-सामाजिक कार्यक्रम संपन्न झाला. रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि ‘अनुलोम’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड, पी. के. गायकवाड, संपूर्ण गायकवाड कुटुंब आणि अनेक आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले. Ramatirth Godavari Aarti
या ऐतिहासिक सोहळ्याची सुरुवात सायंकाळी 5.00 वाजता काळाराम मंदिर प्रभू श्रीरामांच्या दर्शन, पूजा आणि आरतीने झाली. या वेळी काळाराम मंदिर ट्रस्टच्या वतीने विश्वस्त मंदारजी जनावरकर यांनी सर्व आंबेडकरी अनुयायांचे स्वागत केले. पुजारी घराण्याच्या वतीने महंत सुधीर दास आणि नरेंद्र पुजारी यांनी सर्वांचे काळाराम मंदिरात स्वागत केले.
यानंतर सायं. 6.00 वाजता गोदावरी रामतीर्थावर महाआरती झाली. त्यात बुद्ध वंदना आणि भीम वंदना यांचा समावेश होता. या सोहळ्यात कॅप्टन कुणाल गायकवाड आणि सर्व आंबेडकरी अनुयायांचा रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ. रमेश पांडव (संभाजीनगर) आणि ‘अनुलोम’चे महाराष्ट्र प्रांत प्रमुख श्रीमान स्वानंद ओक (मुंबई) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, उपाध्यक्ष नृसिंह कृपादास, वेदमूर्ती शांताराम भानोसे, सचिव मुकुंद खोचे, प्रफुल्ल संचेती, धनंजय बेळे, शिवाजी बोंदार्डे, आर्किटेक्ट शैलेश देवी, रणजीत सिंग, आनंद आदी मान्यवरांनी आंबेडकरी अनुयायांचे स्वागत केले.
समतेचा लढा देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित वंचितांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी मोठे सामाजिक मंथन आणि अभिसरण झाले होते. कालांतराने दलित आणि वंचितांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला. त्याचे स्मारक काळाराम मंदिराच्या पूर्व द्वारावर आजही बाबासाहेबांची आठवण करून देते.
या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिरातला आणि गोदा घाटावरचा आंबेडकरी अनुयायांचा हा ऐतिहासिक सोहळा समता, बंधुता आणि समरसतेचा संदेश देणारा ठरला. हजारो नाशिककरांनी गोदा घाटावर उपस्थित राहून हा अनुपम्य सोहळा अनुभवला.
Ramatirth Godavari Aarti at the hands of Dr. Ambedkar disciples on auspicious occasion of Ambedkar jayanti
महत्वाच्या बातम्या
- पवार काका – पुतणे एकत्र येण्यात गैर काय? प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चा
- Ukraine : दावा- युक्रेनमधील भारतीय गोदामावर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला; युक्रेनने म्हटले- रशियाने मुद्दाम केले
- Trump : ट्रम्प यांनी स्मार्टफोन, संगणकांना परस्पर शुल्कातून सूट दिली; लॅपटॉप, सेमीकंडक्टर, सोलर सेल्सना सूट नाही
- Sukhbir Badal : सुखबीर बादल पुन्हा अकाली दल प्रमुख बनले; 5 महिन्यांनी वापसी; तनखैया घोषित केले होते