विशेष प्रतिनिधी
हिंगोली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे रविवारी पहाटे जहांगीर रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना २३ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या पश्चात आई माजी मंत्री रजनी सातव, पत्नी डॉ. प्रज्ञा, मुलगा पुष्कराज, मुलगी युवराज्ञी व मोठा आप्त परिवार आहे.राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज सोमवारी सकाळी १० वाजता कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Rajiv Satav will be cremated at 10 am on Monday at Kalamanuri
सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे. दरम्यान, रविवारी रात्री त्यांचे पार्थिव हिंगोलीत आणण्यात आले. या वेळी आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. सातव हे ९ मे रोजी कोरोनामधून बरे झाले होते. त्यांची प्रकृती सुधारत असतानाच त्यांना ‘सायटोमेगॅलोव्हायरस’ या नव्या विषाणूची लागण झाली होती. औषधांना ते योग्य प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यपाल सिंग यांनी सांगितले होते. ते धोक्याबाहेर असल्याचे बोलले जात होते, असे असताना शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती आणखी खालावली. उपचारादरम्यान रविवारी पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांनी त्यांनी अखरेचा श्वास घेतला.
सातव यांचे निधनाचे वृत्त समजताच आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री विश्वजित कदम, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, तसेच माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे यांनी जहांगीर रुग्णालयाकडे धाव घेतली. सातव यांच्या मातोश्री रजनी सातव या शनिवारी रात्रीच पुण्यात आल्या होत्या.
कोरोनाची लागण झाल्यानंतर, सातव यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईला हलविण्याचा विचार करण्यात आला होता. परंतु, त्यांची प्रकृती लक्षात घेता त्यांना प्रवास झेपणार नाही, असे डॉक्टरांचे मत पडल्यानंतर त्यांच्यावर पुण्यातच उपचार करण्यात आले. याही स्थितीमध्ये त्यांनी संघर्ष सुरू ठेवला होता. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वाटत असतानाच त्यांना ‘सायटोमेगॅलोव्हायरस’ या नव्या विषाणूची लागण झाल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावत गेली.
खासदार सातव हे २० एप्रिल रोजी हिंगोलीत होते. त्यांनी जिल्ह्यात कोरोनाविषयक विविध उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी संवाद साधला होता. ऑक्सिजन प्लांट, औषधी, नवीन कोविड सेंटर आदींबाबत सूचना दिल्या होत्या. त्यावेळी ते आजारी असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते. राजकीय जीवनात पंचायत समिती सदस्य ते खासदार व काँग्रेसचा राष्ट्रीय पातळीवरील चेहरा, असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. कळमनुरीचे आमदार, हिंगोलीचे खासदार व आता राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. मतदारसंघातच नव्हे, तर देशातील विविध भागांत त्यांनी संघटनेचे जाळे निर्माण करून आपला चाहता वर्ग निर्माण केला होता.
Rajiv Satav will be cremated at 10 am on Monday at Kalamanuri
महत्त्वाच्या बातम्या
- पॅलेस्टिनी नागरिकांना ठार करणे थांबवा ; इस्रायलविरोधात मुस्लिम राष्ट्रांची कोल्हेकुई
- WATCH : इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षामध्ये वादाचा कारण असलेलं प्रार्थनास्थळ, जाणून घ्या
- वैद्यकीय उपकरणे बनविणाऱ्या नव्या उद्योगांना उत्तर प्रदेशात २५ टक्के सबसिडी
- योगी आदित्यनाथांनी करून दाखविले, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १६.३३ टक्यांवरून ४.८ टक्के, मुंबई उच्च न्यायालयाने कौतुक करत महाराष्ट्रात यूपी मॉडेल राबविण्याच्या केल्या सूचना