• Download App
    Raj Thackeray : स्थगित झालेला अयोध्या दौरा गाजविण्याचे कॉन्ट्रॅक्ट आणि सब कॉन्ट्रॅक्ट!! | The Focus India

    Raj Thackeray : स्थगित झालेला अयोध्या दौरा गाजविण्याचे कॉन्ट्रॅक्ट आणि सब कॉन्ट्रॅक्ट!!

    मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा गाजवण्याचे राजकीय कॉन्ट्रॅक्ट तर भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंह यांनी घेतलेलेच आहे. पण आता राज ठाकरे यांचा स्थगित झालेला दौरा गाजविण्याचे सब कॉन्ट्रॅक्ट राष्ट्रवादीने घेतले असल्याचेही स्पष्ट होत आहे. यात मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यातल्या फक्त ट्विटर वॉरचा संबंध नाही, तर त्यानंतर झालेले वार – प्रहार यांचा आणि आता दिवसभर सुरू राहणारे चर्चेचे गुऱ्हाळ यांचा देखील संबंध आहे!! Raj Thackeray: Postponed Ayodhya Tour Contract and Sub Contract !!

    मनसेच्या नेत्यांनी शरद पवार आणि ब्रजभूषण सिंह यांचे संबंध उघड करणारी ट्विट केल्यानंतर राज ठाकरे यांचा स्थगित दौरा देखील गाजायला सुरुवात झाली आहे. त्यांच्या अयोध्या दौरा झाला असता तर फार तर 12 – 15 रेल्वे गाड्या भरून मनसैनिक अयोध्येत पोचले असते. पण आता राज ठाकरे आणि त्यांचे मनसैनिक अयोध्येत न पोचताच ब्रजभूषण सिन्हा यांनी एवढे फेमस करून ठेवले आहेत की राज ठाकरे यांना सध्याचा अयोध्या दौराच काय पण भविष्यातला दौराही करायची गरज पडू नये!!

    – मूळ वक्तव्य टिचभर, खुलासे हातभर

    त्यातही मूळ वक्तव्य टीचभर आणि त्यावर खुलासे हातभर!! असाच “प्रयोग” इथे रंगला आहे. मनसेने शरद पवार आणि ब्रजभूषण सिंह यांचे एकत्र असलेले फोटो ट्विट केले काय आणि नंतर त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला काय!! यातूनच मनसेला राज ठाकरेंना आणि अयोध्या दौऱ्याला फुकट प्रसिद्धी कोणी मिळवून देत आहे याचे कॉन्ट्रॅक्ट आणि सब कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळाले आहे हे दिसून आले. राष्ट्रवादीने एकदा-दोनदा प्रतिसाद दिला असता तर समजू शकते. पण जो उठतो तो पक्षाची प्रतिक्रिया देतो, यातून नेमके काय दिसते??

    – पवारांचे महत्व वाढत आहेत की…

    राष्ट्रवादीचे “असे” झाले आहे, तर दुसरीकडे ब्रजभूषण छाती ठोकून आपले आणि शरद पवार यांचे संबंध आहेत असे दाखवून दिले आहे. त्याच वेळी कुस्तीगिरांनी ऑलिंपिक पदके मिळवून आणली. त्यात आपला वाटा कसा आहे हेही छाती ठोकून सांगून घेतले. शरद पवार महाराष्ट्राचे कुस्तीचे नेते आहेत आणि आपण देशातले कुस्तीत नेते आहोत हे अधोरेखित करून घेतले. यात पवारांचा गौरव झाला की अन्य काही??, याचा विचार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करायची गरज आहे!!



    – भाजपची वाटचाल का सांगत आहेत??

    राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेवू द्यायचे नाही असा ब्रजभूषण सिंह यांचा पण आहे. राज ठाकरे यांनीच जाळे विणले. भाजप आपल्या स्वागतासाठी उताविळ आहे, असा भास त्यांनी निर्माण केला. पण भाजपच्या विस्तारामध्ये त्यांचे काही योगदान नाही. त्यांचा काही संबंध नाही. भाजप संघ वाजपेयी अडवाणी आणि आता मोदी यांच्या बळावर पुढे वाटचाल करतो आहे, असे ब्रजभूषण सिंह यांनी सांगितले. पण भाजपची वाटचाल कशी आणि भाजपची वाटचाल कुणामुळे झाली हे सांगण्यासाठी ब्रजभूषण सिंह यांना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची गरज का पडावी??

    जसे राष्ट्रवादीचे नेते पवारांचे “राष्ट्रीय” नेतृत्व ठसवण्यासाठी वारंवार ते “राष्ट्रीय नेते” आहेत, राष्ट्रीय राजकारणात त्यांना महत्त्व आहे, ते असे सांगत राहतात, तसे ब्रजभूषण सिंह यांना अटलजी, आडवाणी, मोदी, शहा, योगी आदित्यनाथ, राजनाथसिंह, गडकरी यांची नावे भाजपच्या वाटचालीसाठी घ्यावी लागली आणि त्याला कारणीभूत राज ठाकरे ठरले यातच सगळे आले नाही का??

    – राज ठाकरे यांचे नेमके महत्त्व किती??

    भाजप सध्या देशातल्या नंबर एकचा पक्ष आहे. अटलजी, आडवाणी, मोदी, शहा, योगी आदित्यनाथ, गडकरी, राजनाथसिंह यांचे कष्ट विसरता येणार नाहीत. ते सगळ्यांना माहिती आहे पण हे सगळे आठवायला आणि सांगायला राज ठाकरे यांचे निमित्त ठरावेत?? यातून ब्रजभूषण सिंह राज ठाकरे यांचे महत्त्व वाढवत आहेत की कमी करत आहेत?? आपण नेमके काय बोलतो आहोत?? आणि काय करतो आहोत?? हे ब्रजभूषण सिंह यांना समजते आहे का??

    – ब्रजभूषण सिहांची राजकीय किंमत किती??

    जसे शरद पवार “राष्ट्रीय” नेते आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वारंवार सांगावे लागते तसेच ब्रजभूषण असेल यांना जर मोदी, शहा, योगी आदित्यनाथ, गडकरी, राजनाथसिंह यांची नावे घ्यावी लागत असतील तर खुद्द त्यांची ही “राजकीय किंमत” किती हे देखील स्पष्ट होते ना!!

    पण एकूण राज ठाकरे यांच्या स्थगित झालेल्या अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांच्या प्रसिद्धीचे कॉन्ट्रॅक्ट आणि सब कॉन्ट्रॅक्ट हे कोणी घेतले आहे??, हे या निमित्ताने लक्षात आले हेही नसे थोडके!!

    Raj Thackeray: Postponed Ayodhya Tour Contract and Sub Contract !!

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस