नाशिक : विधानसभेच्या अध्यक्षपदी शिंदे – फडणवीस सरकारने राहुल नार्वेकर यांना बहुमताने निवडून आणले. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात एक आगळा योगायोग राजकीय दृष्ट्या जुळवून आला तो म्हणजे एकाच वेळी सासरे आणि जावई विधिमंडळाच्या सभागृहात सर्वोच्च पदांवर असतील. राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विद्यमान विधान परिषदेचे सभापती आहेत. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडूनही आले आहेत. Rahul Narvekar – Ramraje: Son-in-law became the Speaker of the Assembly
मात्र, आता जावई राहुल नार्वेकर यांची शिंदे – फडणवीस सरकारने विधानसभेच्या अध्यक्षपदावर निवड केल्यानंतर विधान परिषदेच्या सभापती पदी रामराजे निंबाळकर राहतील का??, असा सवाल तयार झाला आहे.
या सवालाला राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभा सभागृहात भाषण करून एक प्रकारे दुजोराच दिला आहे. सासरे आणि जावई विधिमंडळात सर्वोच्च पदावर आहेत, अशी स्थिती किमान वर्षभर तरी ठेवा अशी विनंतीवजा सूचना जयंत पाटलांनी शिंदे – फडणवीस सरकारला केल्याचे त्यांच्या भाषणातून दिसून आले. कारण विधान परिषदेच्या 12 आमदारांची जी यादी शिंदे फडणवीस सरकार नव्याने राज्यपालांकडे सोपवणार आहे त्यानंतर विधान परिषदेत कदाचित शिंदे – फडणवीस सरकारच्या बाजूचे मतदान वरचढ ठरू शकते. अशावेळी जयंत पाटील यांना विधान परिषदेत सभापती वरील राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांना ठेवले जाणार नाही अशी शंका वाटत आहे. म्हणूनच त्यांनी सासरे जावयांना विधिमंडळाच्या सर्वोच्च पदावर निदान वर्षभर तरी ठेवा, अशी विनंतीवजा सूचना केल्याचे दिसून येते. पण शिंदे फडणवीस सरकारच्या नव्या राजकीय कॅल्क्युलेशन्स मध्ये हे घडू शकेल का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
– रामराजे सभापती कसे झाले?
रामराजे निंबाळकर हे विधान परिषदेचे अध्यक्ष केव्हा आणि कसे झाले? याचा इतिहास पाहिला तर 2015 मध्ये विधान परिषदेच्या सभापतीपदी आधी शिवाजीराव देशमुख होते. त्या काळात भाजपची सत्ता आल्यानंतर विधान परिषदेतले बहुमत काँग्रेसने गमावले. परंतु शिवाजीराव देशमुख यांची सभापती पदाची मुदत संपलेली नव्हती. पण राष्ट्रवादी काँग्रेसने देशमुखांविरोधात अविश्वास ठराव आणून भाजपच्या सहाय्याने त्यांना पदावरून हटविले. काँग्रेसने बहुमत गमावल्याची संधी साधत त्यानंतर शरद पवारांनी भाजपच्या मदतीने रामराजे निंबाळकर यांना विधान परिषदेवर निवडून आणले. काँग्रेसला राजकीय फाऊल केला होता.
या राजकीय पार्श्वभूमीवर आता शिंदे – फडणवीस सरकार राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांना उर्वरित काळासाठी विधान परिषदेच्या सभापती पदी ठेवेल का? अशी शंका तयार झाली आहे. ती जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलून दाखवली आहे.