मोदींना हरवायला राहुल गांधी आणि रश्मी ठाकरे यांच्या यात्रा, पण पक्षातल्या नेत्यांना बांधून ठेवता येईना!!, अशी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांची अवस्था झाली आहे. Rahul Gandhi and Rashmi Thackeray on different political yatras, will give chance to PM Modi to target dynasty politics again!!
राहुल गांधींनी मणिपूर मधून भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली आणि पहिल्याच दिवशी माजी खासदार मिलिंद देवरा काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. राहुल गांधींनी मोदींना हरवण्यासाठी मोठ्या यात्रेवर जाण्याचे प्लॅनिंग केले. त्याचे एक्झिक्युशनही केले, पण प्रत्यक्षात काँग्रेस मधल्या नेत्यांना पक्षातच बांधून ठेवण्यासाठी त्यांच्याकडे कुठलीच रणनीती नसल्याचे स्पष्ट झाले. त्या उलट एक मिलिंद देवरा गेले म्हणून काय झाले??, एक लाख मिलिंद देवरा पक्षात येतील, असे उद्दाम वक्तव्य जयराम रमेश यांनी केले.
राहुल गांधींची यात्रा जसजशी पुढे सरकेल, तस तशी काँग्रेस पक्षात फूट पडत जाईल आणि एकापाठोपाठ एक नेते बाकीच्या पक्षांमध्ये निघून जातील. यामध्ये महाराष्ट्रातल्या किमान 7 काँग्रेस आमदारांचा समावेश आहे, अशा बातम्या माध्यमांनी वेगवेगळ्या पक्षांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दिल्या आहेत. त्या बातम्यांची विश्वासार्हता किती आहे आणि ती सूत्रे नेमकी कुठली आणि कशी आहेत??, हा भाग अलहिदा, पण काँग्रेस पक्षात टप्प्याटप्प्याने फूट पडत जाईल, हा इशारा मात्र काँग्रेस नेतृत्वाने गांभीर्यपूर्वक घेण्याची गरज आहे. कारण त्याची चुणूक मिलिंद देवरांच्या काँग्रेस सोडण्यातून मिळालीच आहे.
आता एक मिलिंद देवरा गेले म्हणून काय झाले??, एक लाख मिलिंद देवरा पक्षात येतील, हे वक्तव्य करणे सोपे आहे. पण शिवसेनेकडून केवळ दक्षिण मुंबई हा एकच लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला लढवण्यासाठी आपल्याकडे खेचून घेता आला नाही म्हणून एका मिलिंद देवरांना पक्षातच रोखून धरता आले नाही, तर बाकीचे एक लाख मिलिंद देवरा पक्षात कसे घेणार आणि त्यांना पक्षात घेतले, तर त्या “एक लाख” मिलिंद देवरांना काँग्रेस पक्ष काय देणार??, हा खरा “लाखमोलाचा” सवाल आहे आणि याचे उत्तर आजतरी काँग्रेस नेतृत्वाकडे नाही.
– रश्मी ठाकरेंची यात्रा
जे काँग्रेसचे, तेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे!! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोदींचा पराभव करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गाडण्याची जिद्द आहे. एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना त्यांच्यात मतदारसंघात कल्याण मध्ये पराभव करण्याची मास्टर प्लॅनिंग तयार असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेल्या अनेक खासदारांचा पराभव करण्याचे मास्टर प्लॅनिंग कदाचित तयारही असेल, पण मूळात एकनाथ शिंदेंबरोबर बहुसंख्य खासदार उद्धव ठाकरेंना का सोडून गेले??, या सवालाचे भाजपवर खापर फोडण्याखेरीज दुसरे कोणतेही नेमके उत्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे नाही.
भाजपने शिवसेना फोडली. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. त्यांच्याबरोबरच्या आमदारांना मंत्री केले, ही उघड्या डोळ्यांनी दिसणारी वस्तुस्थिती आहे, पण एकनाथ शिंदे फुटत असताना, बहुसंख्य आमदार एकनाथ शिंदेंच्या बरोबर निघून जात असताना, उद्धव ठाकरेंनी त्यांना रोखण्यासाठी नेमके काय केले??, ते त्यांना का रोखू शकले नाहीत??, आपल्याच शिवसेनेत बांधून का ठेवू शकले नाहीत??, उद्धव ठाकरेंची क्षमता का कमी पडली??, या सवालांची उत्तरे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष देत नाही.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आता राहुल नार्केवेकरांविरुद्ध सुप्रीम कोर्टात गेली आहे. तो त्यांचा अधिकारही आहे, पण त्याचवेळी स्वतः रश्मी उद्धव ठाकरे या स्त्री शक्ती संवाद यात्रेसाठी बाहेर पडण्याची बातमी आली आहे आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण शिवसेना अखंड होती, तेव्हा आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेतले सर्वांत मोठे शक्तिशाली केंद्र म्हणून रश्मी ठाकरे यांच्याकडेच पाहिले जात होते. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे होते, पण शक्तिशाली केंद्र रश्मी ठाकरे हेच होते, असे शिवसेनेतलेच नेते बोलत असत. त्यामुळे शिवसेनेत रश्मी ठाकरे यांचे अनन्यसाधारण महत्त्व होते आणि आहे, हे शिवसेनेच्याच नेत्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित होते. त्याबद्दल वाद असण्याचे कारण नाही. त्यामुळे स्त्री शक्ती संवाद यात्रेच्या निमित्ताने रश्मी ठाकरे मुंबई आणि महाराष्ट्रात फिरून 23 लोकसभा मतदारसंघांमध्ये संपर्क साधणार असतील, तर शिवसेना या पक्षाच्या दृष्टीने त्याचे संघटनात्मक महत्त्व विशेष असेल, हे उघड आहे.
पण प्रश्न त्या पलीकडचा आहे आणि तो काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांसाठी कॉमन आहे, तो म्हणजे वेगवेगळ्या यात्रांवर निघालेले दोन्ही नेते पंतप्रधान मोदी आरोप करत असलेल्या घराणेशाहीचेच प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत. आपापले पक्ष विस्तारण्यासाठी आणि मोदींना हरवण्यासाठी मोदींनीच बोथट केलेले घराणेशाहीचे हत्यार त्यांच्याविरुद्ध वापरण्यातला हा प्रकार आहे. मग हे घराणेशाहीचे बोथट हत्यार चालणार तरी किती आणि त्यातून मोदींना राजकीय इजा होणार तरी किती??, हा कळीचा सवाल आहे.
मोदी वारंवार घराणेशाही पक्षांवर प्रहार करत आले आहेत. या घराणेशाहीची ते विशिष्ट व्याख्याही करत आहेत. जे संस्थापक, पक्ष स्थापन करतात आणि फक्त आपल्या रक्ताच्याच वारसांकडे ते सोपवतात, बाकीच्या नेत्यांकडे आणि कार्यकर्त्यांकडे ते दुर्लक्ष करतात त्यांना घरगडी म्हणून वागवतात, असे सगळे पक्ष घराणेशाही पक्ष आहेत आणि त्या घराणेशाही मुळेच देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे, असे आरोप मोदी वारंवार करतात. त्या नेत्यांचे पक्षातून बाहेर पडलेले अनुयायी आहे, तेच आरोप रिपीट करत असतात, त्यामुळे मोदींचे घराणेशाही पक्षांवरच्या आरोपांवर शिक्कामोर्तब होत राहते. हे ढळढळीत सत्य उघड दिसत असताना घराणेशाही पक्ष आपल्याच घराणेशाहीच्या प्रतिनिधींना पुढे करून जर यात्रा काढणार असतील आणि त्यातून मोदींना हरविण्याच्या महत्त्वाकांक्षा बाळगणार असतील, तर त्या कितपत फलद्रूप होतील??, हा कळीचा सवाल आहे.
खरे म्हणजे या घराणेशाही पक्षांनी मोदींच्या आरोपांमधले नेमके इंगित नीट लक्षात घेऊन त्यावर तोड काढणारी खरी परिणामकारक रणनीती आखली पाहिजे. आपापल्या पक्षांची मतपेढी घराणेशाही पलीकडे जाऊन विकसित करून ती दृढमूल केली पाहिजे, ही या घराणेशाही पक्षांची खरी आजची राजकीय गरज आहे. त्यातूनच फक्त मोदींचा पराभव करता येणे शक्य आहे, अन्यथा मोदींचे घराणेशाहीचे आरोप केवळ तोंडी बोलून किंवा रोजच्या पत्रकार परिषदा संबोधित करून खोडता येणे अशक्य आहे!! त्यासाठी ठोस राजकीय कृतीच करावी लागेल आणि ती घराणेशाहीचे प्रतिनिधी वगळून करावी लागेल ही आजची राजकीय गरज आहे.
त्यामुळे राहुल गांधी आणि रश्मी ठाकरे यांनी हजारो किलोमीटरच्या लांबीच्या वेगवेगळ्या यात्रा काढल्या, तरी त्याचे परिणाम विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे दिसणारे नाहीत, हीच बाब मोदींच्या विजय अधोरेखित करणारी ठरेल. हे मोदींनी नव्हे, तर घराणेशाही पक्षांनी लक्षात घेतले पाहिजे, तर आणि तरच मोदींना हरविण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याची धूसर शक्यता आहे. अन्यथा नुसत्या यात्रा होतील, राजकीय गदारोळ उठेल, घराणेशाहीचा डंका वाजेल आणि मोदींना पुन्हा तोच आयता मुद्दा हातात मिळून घराणेशाहीला ठोकण्याची संधी मिळेल, त्या पलीकडे या यात्रांना काही अर्थ उरणार नाही!!
Rahul Gandhi and Rashmi Thackeray on different political yatras, will give chance to PM Modi to target dynasty politics again!!
महत्वाच्या बातम्या
- I.N.D.I.A. मधील जागावाटपावरून पेच कायम, बंगाल-पंजाब-यूपीत अडले आघाडीचे घोडे
- मालदीवने म्हटले- भारताने 15 मार्चपर्यंत सैन्य मागे घ्यावे; भारताने म्हटले- दोन्ही बाजूंकडून चर्चा होईल
- श्रीरामांच्या आहाराविषयी बोलणारे शेण खातात, उद्धव ठाकरेंसोबत एक मंथरा; फडणवीसांचा घणाघात
- Milind Deora Profile : कोण आहेत मिलिंद देवरा, 55 वर्षांपासून होता काँग्रेसशी संबंध, पक्षाने गमावला आणखी एक तरुण चेहरा