विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune-Pimpri पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.विषारी दारूकांडात मृतांचा आकडा आणखी वाढला असून आता एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली आहे. उरळी कांचन येथील 32 वर्षीय रिक्षाचालक उमेश अवचर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी त्याने दारू सेवन केल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूपूर्वी उमेश अवचर याला दृष्टी कमी होणे, मळमळ, उच्च रक्तदाबाचा त्रास आणि तोंडातून फेस येणे अशी लक्षणे दिसून आली होती. विशेष म्हणजे आरोपी राधेश्याम प्रजापती ज्या परिसरात अवैध दारू तयार करत होता, त्याच भागातील दारूच्या अड्ड्यावरून उमेशने दारू घेतल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे विषारी दारूचे संकट आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडनंतर उरळी कांचनपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.Pune-Pimpri
या प्रकरणातील तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिक नफा मिळवण्यासाठी आरोपी योगेश वानखेडे याने दारूमध्ये मिथेनॉल हे घातक रसायन मिसळल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. उरळी कांचन परिसरातील राधेश्याम प्रजापती याच्याकडून योगेश वानखेडे 35 लिटरचा एक कॅन सुमारे 1900 रुपयांना खरेदी करत होता. त्यानंतर ही दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध अवैध अड्ड्यांवर सुमारे 2700 रुपये प्रति कॅन दराने विकली जात होती. मात्र अधिक नफा कमावण्यासाठी त्याने ऑनलाईन मागवलेले मिथेनॉल दारूमध्ये मिसळून त्याचे प्रमाण वाढवले. याच घातक मिश्रणामुळे अनेक नागरिकांचा जीव गेल्याचे समोर आले आहे.Pune-Pimpri
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्ग केला आहे. पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत अवैध दारूच्या नेटवर्कचा शोध सुरू केला आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड या भागांमध्ये पसरलेल्या संपूर्ण साखळीचा तपास सुरू असून दारू तयार करणारे, पुरवठा करणारे आणि विक्री करणारे सर्व संबंधित आरोपी तपासाच्या रडारवर आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या दुर्घटनेनंतर पोलिस प्रशासनानेही कठोर भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दापोडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांना निलंबित केले आहे. तपास पथकाच्या प्रमुखांसह आणखी 4 अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. दुसरीकडे पुणे शहरात हडपसर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिकलगर आणि पोलिस उपनिरीक्षक मुलानी यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांशी चर्चा करून संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश दिले आहेत. विषारी दारू कुठे तयार झाली, त्यामागे कोणते लोक आहेत आणि संपूर्ण साखळी कशी कार्यरत होती याचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. आतापर्यंत अनेक आरोपींना अटक झाली असली तरी आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे. गंभीर रुग्णांना वाचवण्यासाठी वैद्यकीय प्रयत्न सुरू असून या मृत्यूकांडातील प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेला एक प्रकारची हत्या, असल्याचे म्हटले आहे.
Pune-Pimpri Hooch Tragedy: Death Toll Rises to 22 as Methanol Mixing Exposed
महत्वाच्या बातम्या
- राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई, तर ३३ जणांना बेड्या!!
- शिक्षा संस्कृति उत्थान न्यासाची राष्ट्रीय प्रांत संयोजक बैठक पुण्यात सुरू; राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, भारतीय ज्ञानपरंपरेवर मंथन
- Florida Test : जेफ बेझोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ला मोठा धक्का; फ्लोरिडात चाचणीदरम्यान ‘न्यू ग्लेन’ रॉकेटचा भीषण स्फोट
- NIA : पाकिस्तानशी जोडलेल्या दहशतवादी जाळ्यावर NIAची मोठी कारवाई; राजस्थानसह ४ राज्यांत धाडसत्र