• Download App
    Prithviraj Chavan claims, Marathi leader will become prime minister म्हणे, मराठी माणूस पंतप्रधान!!, पृथ्वीराज चव्हाणांसारख्या नेत्याला सुद्धा

    म्हणे, मराठी माणूस पंतप्रधान!!, पृथ्वीराज चव्हाणांसारख्या नेत्याला सुद्धा का सोडावीशी वाटली पुडी??

    Prithviraj Chavan

    नाशिक : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका सुरू असताना मध्येच मराठी माणूस पंतप्रधान होण्याच्या बाता सुरू झाल्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या धीरगंभीर नेत्याने ही पुडी महाराष्ट्रातल्या राजकीय हवेत सोडली. त्यासाठी त्यांनी अमेरिकेतल्या Epistine files चा हवाला देऊन डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागू शकतो. त्याचे पडसाद भारतातून उमटून मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो, असा बादरायणी संबंध जोडला.Prithviraj Chavan claims, Marathi leader will become prime minister

    – मराठी माणूस पंतप्रधान संकल्पनेचा धुमाकूळ

    वास्तविक मराठी माणूस पंतप्रधान या संकल्पनेने गेल्या 60 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अकारण धुमाकूळ घातला. मराठी माणूस पंतप्रधान बनायच्या मुद्द्यावर बातम्यांमध्ये पाणी घालून घालून मराठी पत्रकारांच्या अनेक पिढ्या पोसल्या. अनेक “प्रतिष्ठित” पत्रकारांनी दिल्लीत बसून गेल्या 30 वर्षांमध्ये मराठी माणूस पंतप्रधान बनायचा पुड्या सोडून आपापली मोठमोठी करिअरे घडवली. पण मराठी माणूस काही पंतप्रधान झाला नाही. कारण बातम्यांमध्ये पाणी घालून मराठी पंतप्रधानाच्या पुड्या सोडणाऱ्या मराठी पत्रकारांनी ज्या राजकीय घोड्यांवर पैजा लावल्या, ते तेवढे कर्तृत्ववान निघाले नाहीत. म्हणून कुठलाही मराठी माणूस आजपर्यंत पंतप्रधान होऊ शकला नाही.



    – नुसते स्वप्न पाहून उपयोग काय??

    मराठी पत्रकारांनी आत्तापर्यंत यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार त्यांच्या खालोखाल प्रमोद महाजन या मराठी माणसांवर पंतप्रधान होण्यासाठी किंवा करण्यासाठी “पैजा” लावल्या. हे तीनही नेते देशाचे पंतप्रधान होण्याइतपत कर्तृत्ववान आहेत, असे “निवडक” “प्रतिष्ठित” मराठी पत्रकारांनी परस्पर ठरविले. परंतु, प्रत्यक्षात यापैकी कुठल्याच नेत्याला दिल्लीच्या राजकारणावर खऱ्या अर्थाने कधी मांड ठोकता आली नाही. दिल्लीतल्या राजकीय लॉबीवर मात करून पंतप्रधान पदाची खुर्ची स्वकर्तृत्वावर मिळवता आली नाही. हे तीनही नेते दिल्लीवर काही प्रमाणात छाप पाडण्यात यशस्वी झाले, तरी दिल्लीतल्या लॉबीवर मात करण्यात पूर्ण अयशस्वी ठरले. उलट दिल्लीतल्या लॉबी समोर या तिन्ही नेत्यांनी शरणागती पत्करली. ती शरणागती पत्करून हे तीनही नेते आपले राजकारण पुढे ढकलत राहिले. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांना एकूण राजकारण करण्यासाठी जेवढा कालावधी मिळाला, तेवढा कालावधी प्रमोद महाजन यांना मिळू शकला नाही, हे खरे पण म्हणून तेच पहिले मराठी पंतप्रधान झाले असते, असे मानणे सुद्धा राजकीय वास्तवाला धरून झालेला नसते. पण हे राजकीय वास्तव आणि सत्य दिल्लीतल्या आणि मुंबईतल्या “निवडक” “प्रतिष्ठित” मराठी पत्रकारांना स्वीकारता आणि पचवता आले नाही.

    – का सोडली पुडी??

    त्याचाच पुढचा भाग म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या धीरगंभीर नेत्याने आज अचानक मराठी पंतप्रधानाची बनण्याची पुडी महाराष्ट्रातल्या राजकीय हवेत सोडली. वास्तविक आता दिल्लीत कुठल्याही मराठी माणूस पंतप्रधान करण्याची पृथ्वीराज चव्हाण यांच्या पक्षाची कुठल्याच प्रकारची क्षमता उरलेली नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा अंगुली निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, हे सांगायला फार मोठ्या राजकीय तज्ञाची गरज नाही, पण ते सुद्धा राजकीय वास्तव नाही. कारण पृथ्वीराज चव्हाण म्हणतात म्हणून भाजप लगेच कुठली राजकीय खेळी करून देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलून थेट पंतप्रधान पदावर बसविण्याची शक्यता नाही.

    पृथ्वीराज चव्हाणांचा वकूब मोठा, पण…

    वास्तविक पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या धीरगंभीर नेत्याचा अशा राजकीय पुड्या सोडण्याचा स्वभाव नाही. त्यांचा राजकीय वकूब निश्चित मोठा आहे. त्यांना दिल्लीतले राजकारण पुरते माहिती आहे. ते मनमोहन सिंग यांच्या काळात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री राहिले असल्याने दिल्लीतले सगळे ताणेबाणे ते ओळखून आहेत. तरी देखील त्यांना मराठी माणूस पंतप्रधान होईल अशी राजकीय पुडी सोडावीशी वाटली, कारण त्यांना सध्या फारसा कुठला राजकीय उद्योग करणे शिल्लक उरलेले नाही. कराड मतदारसंघातून ते विधानसभेला पराभूत झाल्यानंतर त्यांच्याकडे काँग्रेसने कुठले काम दिलेले नाही. वास्तविक ते केंद्रीय राजकारणात मुरलेले असताना त्यांना काँग्रेस श्रेष्ठींनी राज्याच्या राजकारणात पाठविले तिथे त्यांनी काही काळ कर्तृत्व गाजविले, पण देशात आणि राज्यात काँग्रेसचे राजकारण आकुंचन पावल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना राज्याच्याही राजकारणात काही करण्यासारखे शिल्लक उरले नाही म्हणून मग त्यांना अशी मराठी पंतप्रधान बनायची पुडी सोडावीशी वाटली की काय??, हे समजण्यास मार्ग नाही.

    Prithviraj Chavan claims, Marathi leader will become prime minister

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    निवडणूक स्थगित करण्यावर फडणवीसांचा आक्षेप; रवींद्र चव्हाणांचे निवडणूक आयोगाला पत्र

    फडणवीसांची कुणावरही नाही टीका; युती तुटायची वाट बघणार्‍यांनो, डोळे उघडून बघा!!

    युगेंद्र पवारांच्या लग्नात नाताळच्या घंटांचे डेकोरेशन; सुप्रिया सुळे यांनी केले फोटो शेअर!!