• Download App
    I Will Not Be NCP President: Praful Patel Rules Out Merger with Sharad Pawar मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही; प्रफुल्ल पटेल म्हणाले- आज आमच्यापुढे विलीनीकरणाचा कोणताही प्रश्न नाही!

    Praful Patel : मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही; प्रफुल्ल पटेल म्हणाले- आज आमच्यापुढे विलीनीकरणाचा कोणताही प्रश्न नाही!

    Praful Patel

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Praful Patel  सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपण पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर कोण? काय? कसे? कुठे हे पाहण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही हे स्पष्ट आहे, असे ते म्हणालेत. आज आमच्यापुढे विलीनीकरणाचा कोणताही प्रश्न नसल्याचेही त्यांनी यावेळी प्रामुख्याने अधोरेखित केले. त्यामुळे अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत सुरू असणारी विलीनीकरणाची कथित चर्चा पुढे सरकणार नसल्याचे हे आता स्पष्ट झाले आहे.Praful Patel

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयात आज अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी नेत्यांशी संवाद साधून आम्ही सुनेत्रा पवार यांच्या घरी गेलो. त्यांची पार्थ व जय पवार ही दोन्ही मुले तिथे होती. आम्ही त्यांचे सांत्वन करत राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या पाठिशी आहे. ही आमची व जनतेचीही भावना आहे की, आपण ही जबाबदारी स्वीकारावी. त्यावर सुनेत्रा पवारांनी आमच्या विनंतीला मान दिला.Praful Patel



    पक्षाच्या अंतर्गत प्रश्नांवर उलटसुलट चर्चा सुरू

    सुनेत्राताई मुंबईला आल्या. त्यांनी पवार कुटुंबात 3 दिवसांचा दुखवटा असल्याचे सांगितले. त्यानंतर चौथ्या दिवशी त्या आल्या. त्यानंतर आम्ही त्यांची निवड केली. त्यानंतर त्यांचा शपथविधी झाला. आमच्या अंतर्गत प्रश्नांवर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आम्ही आमच्या पक्षाचे नेते निवडणार की, दुसरा एखादा व्यक्ती निवडणार? आम्ही एक पक्ष आहोत. त्याचे दोन पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे विधीमंडळ व दुसरा पार्ट आहे राजकीय पक्ष. विधीमंडळाचा पार्ट संपला. आता अनेक लोकांची विधाने येत आहेत, असे ते म्हणाले.

    अजित पवारानंतर सर्व प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी माझी

    प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची सर्व प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, एका केंद्रीय मंत्र्याने चुकून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून माझ्या नावाचा उल्लेख केला. नंतर त्यांनी त्यावर खेदही व्यक्त केला. मी पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतरच्या सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. विधीमंडळ किंवा राष्ट्रीय अध्यक्षाचा विषय मार्गी लावण्याची जबाबदारी व प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. महाराष्ट्रात ही जबाबदारी सुनील तटकरे यांच्यावर आहे.

    आम्हाला सर्वांच्या भावना समजतात. त्यानुसार आम्ही सुनेत्राताईंचा निर्णय घेतला. आता पक्षाचाही निर्णय त्यानुसारच घेतला जाईल. सध्या काही लोक ज्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, ते आमच्याविषयी उलटसुलट चर्चा करत आहेत. माझ्या वडिलांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिले होते. मी स्वतःही महाराष्ट्राच्या जनतेच्या बळावर लोकसभेवर निवडून गेलो. आमच्या बद्दल व आमच्या पार्श्वभूमीविषयी कुणी कमेंट्स करत असेल, तर त्याला लाज वाटली पाहिजे. मी महाराष्ट्राचा एक लोकप्रतिनिधी म्हणून येथे बसलो आहे, असे ते म्हणाले.

    मी पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही

    प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, पक्षाचा निर्णय योग्य पद्धतीनेच होईल. योग्य दिशेनेच होईल. योग्य व्यक्तीचाच होईल व माझ्याशिवायच होईल. आता याहून अधिक काय बोलू. आमच्याकडून एकही विधान आले नसताना उगीच या प्रकरणी वादळ निर्माण करणे व आमच्या पक्षामध्ये संशय निर्माण करणे ही अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे. मला याविषयी अजिबात फार काही बोलायचे नाही. आम्ही या प्रकरणी योग्य तो निर्णय घेऊ, असे ते म्हणालेत. पत्रकारांनी यावेळी त्यांना तुम्ही अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही का? असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी सकारात्मक उत्तर दिले.

    राज ठाकरे वाकरे हे माझ्या पक्षाशी संबंधित आहेत का?

    प्रफुल्ल पटेल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पोस्टवर बोलताना म्हणाले, राज ठाकरे वाकरे हे माझ्या पक्षाशी संबंधित आहेत का? माझ्या पक्षाचा विधीमंडळ नेता कोण व अध्यक्ष कोण हे आम्ही ठरवणार. राज ठाकरे किंवा सकाळी 9 वाजताचे बुलेटिन यांनी आम्ही काय करावे हे सांगू नये. आम्ही योग्य निर्णय घेण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. या लोकांनी आम्ही आमच्या पक्षात काय करावे हे सांगू नये. आम्ही पहिला निर्णय योग्य निर्णय घेतला असून, दुसरा निर्णयही योग्यच घेण्याच्या प्रक्रियेत आहोत.

    विलीनीकरणावर काय म्हणाले?

    पत्रकारांनी यावेळी प्रफुल्ल पटेल यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, हा विषय सध्या आमच्यापुढे नाही. सध्या आमच्यापुढे आमचा पक्ष, आमचे घर, आमचे विधीमंडळ हे प्रश्न आहेत. हे प्रश्न निकाली निघाल्यानंतर बाकीच्या विषयांवर विचार केला जाईल. आज तो विषय आमच्यापुढे नाही. आज आमच्यापुढे आमच्या पक्षाचा निर्णय आहे. पुढील सर्व प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी माझी आहे. मी हे करत असताना लोकं उलटसुलट बातम्या चालवत आहेत. मी कोणत्याही शर्यतीत नाही. मी कधी याविषयी विधानही केले नाही. माझ्या पक्षाच्या एकाही नेत्याने यासंबंधी माझे नाव घेतले नाही, असे ते म्हणाले.

    अर्थखात्याच्या मुद्यावर काय म्हणाले पटेल?

    पत्रकारांनी यावेळी पटेलांना अजित पवारांचे अर्थखाते राष्ट्रवादीलाच मिळणार काय? असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, आमची मुख्यमंत्र्यांसोबत जी चर्चा झाली, त्यामध्ये त्यांनी सांगितले की, सुनेत्रा पवार महाराष्ट्र सरकारचा घटक म्हणून नवीन आहेत. त्यांना बाकीच्या प्रक्रिया समजण्यास थोडा वेळ लागेल. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ते काही दिवसांमध्ये बजेट मांडणार आहेत. कसे असते की, अर्थसंकल्प फक्त बोलण्याचेच काम नसते. त्यावर चर्चा होते. त्याला उत्तर द्यावे लागते. अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रियाही मोठी असते. अजित पवारांना प्रदीर्घ अनुभव होता. त्यामुळे त्यांना काही अडचण नव्हती.

    पण सुनेत्रा वहिनींना थोडा वेळ लागेल. म्हणून ते (मुख्यमंत्री फडणवीस) म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ द्या. मी सांभाळतो. तात्पुरते अर्थ खाते मी सांभाळतो. नंतर सुनेत्रा वहिनींशी बोलून, तुमच्यासोबत बोलून शेवटी अंतिम निर्णय तुम्हाला योग्य वाटेल तसा करु.

    I Will Not Be NCP President: Praful Patel Rules Out Merger with Sharad Pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rohit Pawar : सुप्रीम कोर्टाचे रोहित पवारांना खडेबोल; MCAच्या सदस्य नोंदणीवर आक्षेप; बेकायदा कामे करण्याची हिंमत होतेच कशी?

    जणू पवार एकटेच टाकतात “डाव” आणि बाकीचे खेळतात गोट्या; अजितदादांचे कट्टर विरोधक काळूराम चौधरी काय म्हणाले??, ते तरी वाचा!!

    जिल्हा परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा प्रचाराचा धडाका; मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीचा काढला एक्का!!