वैष्णवी ढेरे
नाशिक : जनसंख्या विधेयक सदनात मांडले गेले… मात्र एवढ्या वादग्रस्त विषयावर सदनात अजिबात गदारोळ झाला नाही… कोणत्याही सदस्याने अन्य कोणत्याही सदस्यावर व्यक्तिगत टीकाटिपण्णी केली नाही… सदनातील नियमांचा भंग झाला नाही की खासदारांनी कोणताही औचित्यभंग केला नाही… तरीही जनसंख्या विधेयकासारख्या महत्त्वाच्या विधेयकाच्या बाजूने आणि विरोधात सदस्यांनी परखड मते मांडून जोरदार वादविवाद केला… किंबहुना कुठलाही आक्रमताळेपणा न करता आपला मुद्दा ठामपणे मांडता येऊ शकतो, याचा धडाच घालून दिला!! Political science students of Nashik’s HPT College sang Abhirup Parliament
निमित्त होते, नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातल्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या अभिरूप संसदेचे. एचपीटी आर्ट्स आणि आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या शतकपूर्ती महोत्सवात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभिरूप संसदेत सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या भूमिका उत्तमरीत्या निभावल्या. सरकारी पक्षातल्या पंतप्रधानापासून ते विरोधी पक्षनेते पदापर्यंत विविध विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी आपापली मते ठामपणे मांडली आणि अखेर तब्बल अडीच तासांच्या चर्चेनंतर जनसंख्या विधेयक अभिरुप संसदेने मंजूर केले, ते देखील उत्तम चर्चेअंती आणि कोणताही गदारोळ न करता!!
अभिरुप संसदेच्या या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सर डॉ. मो. स. गोसावी, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी, उपप्राचार्य डॉ. मृणालनी देशपांडे, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. आनंद खलाणे, प्रा. महेश गिरी तसेच एचपीटी महाविद्यालयाचे विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करून नाव कमावलेले माजी विद्यार्थी उपस्थित होते.
जनसंख्या विधेयक मांडताना त्याच्या बाजूने भारतातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा विद्यार्थी असलेल्याच गृहमंत्र्यांनी घेतला. गेल्या 70 वर्षांमध्ये जनसंख्येसारख्या विषयावर गांभीर्याने काम झाले असते, तर आत्ताचे विधेयक मांडावे लागले नसते, असे गृहमंत्री म्हणाले. त्यावर विरोधकांनी देशातल्या प्रत्येक समस्येला गेली 70 वर्षे जबाबदार धरण्याची सत्ताधारी पक्षाची वाईट खोड असल्याचा आरोप सदनात केला. या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तिखट वार – प्रहार केले. पण कोठेही नियमभंग केला नाही.
सुवर्ण अक्षरांनी नोंद
अभिरूप संसदेच्या या उत्तम कामकाजाचे कौतुक डॉ. भारती पवार, सर मो. स. गोसावी यांनी केले. संस्थेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद करावी, असा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी आयोजित केल्याचे गोसावी सरांनी नमूद केले. सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांची उत्तम तयारी करून घेतली आणि विद्यार्थ्यांनी त्यांना चांगली मेहनत घेऊन प्रतिसाद दिला, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
मंत्र्यांनाही तयारीनिशीच बोलावे लागते
एरवी संसदेचे कामकाज पाहताना तिथला गदारोळ जास्त दाखवला जातो. परंतु संसदेत किती तयारी करून बोलावे लागते?? किती अभ्यास करून चर्चा करावी लागते याची कल्पना आता विद्यार्थ्यांना आणि उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना आली असेल. मोदी सरकारच्या काळात सर्व मंत्र्यांना देखील नव्या कार्यप्रणालीनुसार आपापल्या मंत्रालयाची आणि विषयाची तयारी करूनच संसदेत बोलावे लागते, याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे, असा दाखला डॉ. भारती पवार यांनी दिला.