नाशिक : अजितदादांना बरोबर घेऊन भाजपला पश्चाताप; तर वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेऊन काँग्रेसला डोक्याला ताप!!, हेच राजकीय चित्र महापालिका निवडणुकांच्या सुरुवातीलाच समोर आले. कारण अजितदादा आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आपापल्याच मित्र पक्षांना अडचणीत आणले.
– अजितदादांना बरोबर घेऊन भाजपची प्रतिमाहानी
ज्यांच्यावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आणि राज्य सहकारी बँक लुटून खाल्ल्याचे आरोप आहेत, त्या अजित पवारांना पिंपरी – चिंचवड मध्ये भाजपने केलेला भ्रष्टाचार “अचानक” दिसला. त्यामुळे ते भाजपवर तुटून पडले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर द्यावे लागले, पण त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आधीच इशारा दिल्याचे सुद्धा सांगितले. अजित पवारांना आपल्याबरोबर घेऊ नका. घेताना विचार करा. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड मधले भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आहेत, हे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते, असे रवींद्र चव्हाण म्हणाले. त्यांच्या पाठोपाठ चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी सुद्धा अजितदादांना “गंभीर’ इशारा दिला. पण अजितदादांना बरोबर घेण्याचा भाजपला पश्चातापच झाला हे चित्र यामुळे निर्माण झाले. मग भले राजकीय विश्लेषक फडणवीस आणि अजितदादा यांचे “तसेच” ठरले आहे किंवा होते. कारण त्यांना काँग्रेसचे मते कापायची आहेत, असे सांगत असले, तरी अजितदादांच्या भाजप मधल्या महायुतीतल्या हजेरीमुळे भाजपची प्रतिमाहानी झाली ही वस्तुस्थिती लपली नाही.
– प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला झोडपले
एकीकडे अजितदादांनी भाजपला असे अडचणीत आणले असताना दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला अडचणीत आणले. काँग्रेसवाले शरद पवारांच्या नादी लागले म्हणजेच दाऊद इब्राहिमच्या नादी लागले म्हणून त्यांच्या पक्षाचे वाटोळे झाले, असे उद्गार प्रकाश आंबेडकरांनी परभणीत काढले.
पण त्या पलीकडे जाऊन वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला मुंबईत कॉर्नर केले. काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खोपच्यात घातले. त्यांच्या राष्ट्रवादीच्या ऐवजी वंचित बहुजन आघाडीला महत्त्व दिले वंचित साठी काँग्रेसने तब्बल 62 जागा सोडल्या. पण वंचितने मात्र काँग्रेसची गोची केली. त्यांनी फक्त 46 जागांवर उमेदवार उभे केले. 16 जागांवर उमेदवार उभे केले नाहीत. त्यामुळे काँग्रेसवर अपक्षांना पुरस्कृत करायची वेळ आली.
– मुंबईतल्या 16 जागांच्या वादाची गोची
पण वंचितने केलेली काँग्रेसची कोंडी एवढ्या पुरतीच मर्यादित राहिली नाही. ज्या 16 जागांचा वाद मुंबईत घडला त्यासाठी सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसलाच जबाबदार धरले. काँग्रेसने आम्हाला हवे असलेल्या 16 जागा सोडल्या नाहीत म्हणून आम्ही त्या जागांवर उमेदवार उभे केले नाहीत. काँग्रेसवाल्यांना एकाच घरात 6 – 7 उमेदवारी द्यायच्या होत्या म्हणून काँग्रेसवाल्यांनी 16 जागांचा घोळ घातला, असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला.
– काँग्रेसवर पश्चातापाची वेळ
या सगळ्या प्रकारामुळे काँग्रेसच्या नेत्यांना स्वतःच्या डोक्यावर हात मारून घ्यायची पाळी आली. कधी नव्हे ते काँग्रेसच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडी साठी मोठा “राजकीय त्याग” केला. त्यांच्यासाठी मुंबईतल्या 62 जागा सोडल्या. पण वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी मात्र काँग्रेसच्या नेत्यांच्या डोक्याला ताप आणला.
Political repentance for both BJP and Congress
महत्वाच्या बातम्या
- सगळ्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची निवडणूक आयोगाकडून चौकशी आणि तपास; तरी शिंदेंच्या शिवसेनेचे सेलिब्रेशन!!
- Xi Jinping : जिनपिंग म्हणाले- चीन-तैवानचे एकीकरण निश्चित; अमेरिकेचा इशारा- चीन तणाव वाढवत आहे, बळाचा वापर करून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू नये
- पत्रकार परिषदेत अजितदादांकडून स्वतःच्याच माणसांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल; महेश लांडगेंची सोशल मीडियावर पोस्ट!!
- India Economy : 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5.25 पट वाढेल:अहवालात दावा- 21 वर्षांत दरडोई उत्पन्न ₹2.5 लाखांवरून वाढून ₹13.5 लाख होईल