विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात होणाऱ्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या कोट्यातल्या 5 नावांची घोषणा केली आहे. त्यामध्ये पंकजा मुंडेंसह सदाभाऊ खोत आणि परिणय फुकेंच्या नावाचा समावेश आहे. या घोषणेतून भाजपने पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. Political rehabilitation of Pankaja Munde
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागा 27 जुलै रोजी रिक्त होत आहेत. या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार असून सध्याचं संख्याबळ पाहता भाजपच्या 5, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी होऊ शकतात.
भाजपची विधानपरिषदेसाठी संधी
पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांची नावे जाहीर करून भाजपने सेफ गेम खेळला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर आता भाजपचे नेते सावधगिरीने पावले टाकत आहेत. त्याचाच भाग म्हणून विधान परिषदेच्या यादीमध्ये जातीय समतोल राखल्याची चर्चा आहे. बऱ्याच लोकप्रतिनिधित्वाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पंकजा मुंडे यांचे विधान परिषदेत पुनर्वसन केले आहे. मित्रपक्षांना संधी म्हणून रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांनाही भाजपने संधी दिली आहे.
पंकजा मुंडे यांना संधी
बीडमधून पराभवाचा धक्का बसल्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी त्यांच्या समर्थकांकडून मागणी केली जात होती. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देण्याचे भाजपने ठरवून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे. या निर्णयामुळे पंकजा मुंडे अनेक वर्षांनी पुन्हा एकदा सभागृहात दिसणार आहेत. पंकजा मुंडे यांची विधान परिषदेची उमेदवारी अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे.
बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा समर्थक असलेला वंजारी समाज दुखावला गेला होता. गेल्या काही दिवसांत राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा भाजपसह महायुतीला मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना देण्यात आलेली विधान परिषेदची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे.
ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन पुकारणाऱ्या लक्ष्मण हाके यांनीही पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळायला हवी, असे वक्तव्य केले होते. पंकजा मुंडे या कायद्याच्या सभागृहात असल्या पाहिजेत. मात्र त्यासाठी आम्हाला कोणीही दान म्हणून ते करू नका, भूतदया दाखवू नका, तो आमचा हक्क आहे. इथल्या तरुणांच्या त्या भावना आहेत. आमचा ओबीसी जसा-जसा बाहेर येईल, एकत्र येईल, तसा- तसा महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये या सर्व गोष्टींचा प्रभाव पडेल, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले होते.
Political rehabilitation of Pankaja Munde
महत्वाच्या बातम्या
- राधाराणी वादप्रकरणी पं. प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी, दुसऱ्याला म्हटले होते राधाचा पती
- केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहार तुरुंगात राहणार; मद्य धोरणप्रकरणी CBIने केली होती अटक
- T20 world cup 2024 winner : टीम इंडियाने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवले, सूर्याच्या एका कॅचने फिरवली मॅच
- चेहऱ्याचा मुद्दा राऊतांनी घट्ट धरला; पवारांना बाजूला सारून राहुलच्या नावाने गूळ लावला!!