• Download App
    विधानसभा अध्यक्षांचा कौल शिंदेंच्या पारड्यात; अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा विरली हवेत!! Political ambition of ajit pawar got another setback after consolidation of CM eknath shinde!!

    विधानसभा अध्यक्षांचा कौल शिंदेंच्या पारड्यात; अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा विरली हवेत!!

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रते संदर्भात दिलेला निकाल शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दीर्घकालीन राजकीय भवितव्यावर जसा परिणामकारक ठरला आहे, तसा एक वेगळाच परिणाम महाविकास आघाडीतल्या तिसऱ्या क्रमांकाच्या घटक पक्षावर देखील झाला आहे. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भवितव्यावर देखील त्याचा परिणाम दिसणार आहे, पण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादात विधानसभा अध्यक्ष विशिष्ट निर्णय देतील आणि त्यामुळे अजित पवार मध्येच मुख्यमंत्री पदाचा “चान्स” मारून घेतील, अशी जी चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात रंगली होती, ती मात्र हवेत पूर्णपणे विरून गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पद नुसते टिकलेच नाही, तर ते अधिक भक्कम झाले आहे. Political ambition of ajit pawar got another setback after consolidation of CM eknath shinde!!

    तशी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात वर्षानुवर्षे होत आहे. दस्तूरखुद्द अजितदादांनी देखील ताकाला जाऊन भांडे लपवलेले नाही. त्यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा अनेकदा बोलून दाखविली आहे. अगदी शरद पवारांमुळे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कधी होऊ शकला नाही. पवारांना कधीच काँग्रेसवर दबाव आणून राष्ट्रवादीच्या नेत्याला मुख्यमंत्री करता आले नाही, असा ठपका देखील अजितदादांनी शरद पवारांवर अनेकदा ठेवला आहे. इतकेच काय पण अजितदादांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स महाराष्ट्रातल्या, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये लागून, ती खाली उतरली देखील, पण अजित पवार अजून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला गवसणी घालू शकलेले नाहीत.

    अजितदादा महायुतीत तिसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री पद स्वीकारून सत्तेत सामील झाले. त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये अजितदादांच्या पक्षाने भाजप खालोखाल यश मिळवले. त्यावेळी अजितदादांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील अजित पवारांना आपल्या हयातीत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसलेले पाहायचे आहे, असे वक्तव्य केले होते. परंतु त्यांची देखील इच्छा अद्याप पूर्ण झालेली नाही



    एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या वादात विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचे निर्णय दिल्यावर एकनाथ शिंदेंना पायउतार व्हावे लागेल आणि राजकीय अपरिहार्यता म्हणून भाजपला अजितदादांनाच मुख्यमंत्री करावे लागेल, असा अजितदादा समर्थकांचा होरा होता, तो त्यांनी अनेकदा उतावळेपणाने पणे कुठे कुठे बोलून दाखवलाही होता.

    पण सध्याचा भाजप म्हणजे वाजपेयी आणि अडवाणींचा राजकीय तडजोडी करून प्रादेशिक पक्षांपुढे झुकावा लागणारा भाजप नव्हे आणि सध्याची राहुल गांधींची काँग्रेस तर मुळीच नव्हे, की जी पवारांच्या राजकारणापुढे झुकून महाराष्ट्रात त्यांना हवे तसे अनुकूल निर्णय घेईल!!

    आजचा भाजप हा मोदी – शाहांचा पूर्ण बहुमतानिशी सत्तेवर असलेला भाजप आहे. मोदी आणि शाहा यांच्यामध्ये स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्स वर इतरांची राजकीय तडजोड करण्याची क्षमता आहे आणि तीच त्यांनी अजित पवारांना महायुतीत तिसऱ्या क्रमांकावर उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला लावून दाखवून दिलेली आहे. अजित पवारांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे ही भाजपची जबाबदारी नाही. ही जबाबदारी खुद्द अजित पवारांची आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. मग ती तडजोड करून मिळवायची की पक्षासाठी जमिनी स्तरावर कष्ट करून महाराष्ट्र विधानसभेत पूर्ण बहुमत आणून मिळवून पूर्ण करायची हा सर्वस्वी राष्ट्रवादी आणि अजितदादांचा प्रश्न आहे, पण अजितदादांना मुख्यमंत्री करणे ही भाजपची बिलकुल जबाबदारी नाही.

    आपल्याला हवे तसे भाजपला वाकून भाजपकडून तडजोडीच्या मार्गाने मुख्यमंत्री पद मिळवणे हे अजित पवारांना आजच्या राजकीय परिस्थिती शक्य नाही. अजित पवारांचे समर्थक अजितदादांच्या “दादागिरीचा” कितीही गवगवा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये करत असले, तरी प्रत्यक्षात अजितदादांना विशिष्ट राजकीय परिस्थितीत भाजपची तडजोड करून सत्तेत सामील व्हावे लागले आहे.

    …अन्यथा कदाचित त्यांची जागा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे, तर एखाद्या कारागृहात निश्चित झाली असती. कारण अजितदादांच्या काही प्रकरणांचे गांभीर्यच राजकीय दृष्टीने, त्याहीपेक्षा कायदेशीर दृष्टीने फार मोठे आहे. त्यामुळे अजित पवार हे स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर भाजपची “तडजोडकर्ते” झालेले नसून भाजपने स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर अजितदादांना आपल्या सत्तेत सामावून घेतले आहे, ही वस्तुस्थिती आहे!!

    विधानसभेची मुदत संपेपर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा स्पष्ट केले होते. अगदी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाचा प्रश्न विचारल्यानंतर देखील फडणवीसांनी आपले उत्तर बदलले नव्हते, यातून खरे तर अजितदादांच्या समर्थकांनी खरा “धडा” शिकायला हवा होता, पण ते तो शिकले नाहीत. त्यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा थांबवली नाही. आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावर विधानसभा अध्यक्षांचे “शिक्कामोर्तब” झाल्यानंतर अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा हवेत विरण्याशिवाय पर्याय नव्हता, ती तशी हवेत विरली आहे!!

    Political ambition of ajit pawar got another setback after consolidation of CM eknath shinde!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस