नाशिक : धनंजय मुंडे यांचा राजीनामा “नैतिक” की वैद्यकीय कारणासाठी??; शाब्दिक खेळात अडकल्या “पवार संस्कारित” दोन राष्ट्रवादी!!
त्याचे झाले असे :
संतोष देशमुख प्रकरणात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे “पवार संस्कारित” मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिल्याचे अजित पवार म्हणाले, पण धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये “नैतिक” हा शब्दच नव्हता, तर त्या ऐवजी “व्यथित”, “सद्सद्विवेक बुद्धी”आणि “वैद्यकीय कारण” हे तीन शब्द होते. त्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांना घेरले. धनंजय मुंडे यांनी नेमका कोणत्या कारणासाठी राजीनामा दिला??, हे स्पष्ट झाले पाहिजे. कारण त्यांनी तर आपल्या ट्विटमध्ये वैद्यकीय कारण दिले आहे. याचा अर्थ संतोष देशमुख प्रकरणाचे त्यांना काहीच वाटले नाही का??, यात त्यांची नैतिकता कुठे दिसली??, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर चार वाक्यांखेरीज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील काहीच बोलले नाहीत. धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला, तो मी स्वीकारून राज्यपालांकडे पुढच्या प्रक्रियेसाठी पाठवून दिला, एवढेच देवेंद्र फडणवीस बोलले. त्यांच्या वक्तव्यात देखील “नैतिक” हा शब्द नव्हता.
पण काहीच दिवसांपूर्वी स्वतःचे उदाहरण देऊन अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना “नैतिकता” शिकवली होती. अजित पवारांनी राज्य सहकारी बँक घोटाळ्यात नाव आल्यानंतर नैतिकतेच्या आधारावर काही दिवसांसाठी राजीनामा दिला होता. याची आठवण त्यांनी धनंजय मुंडे यांना करून दिली होती, पण त्यानंतर संधी मिळताच पुन्हा उपमुख्यमंत्री झाले होते, याबद्दल अजित पवार काही बोलले नव्हते.
या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळा खुलासा करावा लागला. पण तो खुलासा करतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने शाब्दिक खेळ केला. धनंजय मुंडेंच्या राजीनामा प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या सहीने एक पत्रक प्रसिद्ध केले. त्यामध्ये “नैतिक” शब्द वापरला. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याचे उदाहरण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी यापूर्वीच घालून दिले होते, त्यानुसारच धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे, असे या पत्रकात राष्ट्रवादी काँग्रेसने नमूद केले.
बाकी संतोष देशमुख प्रकरणात कुठला राजकीय दबाव नाही. त्या प्रकरणाचा तपास पोलीस + सीआयडी आणि अन्य यंत्रणा व्यवस्थित करत आहेत. न्यायालयीन प्रक्रिया देखील कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाविना सुरू आहे. संतोष देशमुख प्रकरणातला कुठलाही गुन्हेगार कोणत्याही कारणासाठी सुटता कामा नये, अशी भाषा देखील राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकात वापरली आहे.
Pawar’s NCP twins verbal games over Dhananjay Munde’s resignation issue
महत्वाच्या बातम्या
- Dolphin भारतात पहिल्यांदाच करण्यात आले ‘रिव्हर डॉल्फिन’ सर्वेक्षण
- Hardeep Puri : भारत जगातील तिसरा सर्वात मोठा जैवइंधन उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे – हरदीप पुरी
- पापी औरंग्याला उत्तम प्रशासक ठरवणाऱ्या अबू आझमींवर एकनाथ शिंदेंचा प्रचंड संताप; आझमींवर देशद्रोहाचा खटला चालवायची तयारी!!
- Delhi Assembly : भारत जगातील तिसरा सर्वात मोठा जैवइंधन उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे – हरदीप पुरी