नाशिक : ठाकरे बंधूंच्या राजकीय ऐक्यामुळे राजकीयदृष्ट्या अस्वस्थ झालेल्या शरद पवारांना शिक्षकांच्या मागण्यांची राजकीय संधी मिळाली. त्यामुळे त्यांनी मुलगी आणि नातवासह शिक्षकांच्या आंदोलनात उडी घेतली.
महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात ठाकरे बंधूंचे ऐक्य प्रचंड गाजले. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे बंधू आले. त्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष पिछाडीवर ढकलले गेले. त्यातच ठाकरे बंधूंनी आपल्या ऐक्याच्या मेळाव्यात सगळ्या पक्षांच्या नेत्यांना बोलावले, पण स्टेजवर फक्त दोन खुर्च्या ठेवून बाकीच्यांची पंचाईत केली. त्यामुळे शरद पवार त्यांच्या मेळाव्याला गेले नाहीत. त्यांनी सुप्रिया सुळे यांना त्या मेळाव्याला पाठवून दिले. ठाकरे बंधूंनी सुप्रिया सुळे यांना स्टेजवर स्थान दिले नाही त्यांना प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत बसवले.
ठाकरे बंधूंच्या ऐक्य मेळाव्यामुळे शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस वरचा मीडियाचा फोकस पूर्णपणे हटून गेला. पवारांच्या हातात कुठला राजकीय कार्यक्रमच उरला नाही. पण याच दरम्यान विनाअनुदानित शाळांमधल्या शिक्षकांनी अनुदान मिळण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनाची संधी शरद पवारांनी साधली. सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्या सकट शरद पवारांनी त्या आंदोलनात उडी घेतली. रोहित पवार शिक्षकांबरोबर काल रात्रभर थांबले. सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाला भेट दिली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड केली, पण उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची पाठराखण केली. आपला भाऊ अर्थमंत्री असला, तरी सगळे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतात. त्यामुळे तुमच्या समस्यांना देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
शरद पवार आज शिक्षकांच्या आंदोलन स्थळी पोहोचले. तिथे त्यांनी आपण 1981 मध्ये शिक्षकांसाठी कसे भारी निर्णय घेतले याचे वर्णन करून सांगितले. मागण्यासाठी शिक्षकांना आंदोलन करावे लागणे महाराष्ट्राला शोभणारे नाही. या शिक्षकांचा प्रश्न एका दिवसात मार्गी लावा, असा इशारा फडणवीस सरकारला दिला. यावेळी पवारांबरोबर खासदार निलेश लंके आणि रोहित पवार तिथे होते.
वास्तविक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी शिक्षकांच्या आंदोलनाचा काहीही संबंध नव्हता. शिक्षकांनी आंदोलन सुरू करताना कुठल्याच राजकीय पक्षाकडे पाठिंब्याची मागणी केली नव्हती. तशा बातम्याही कुठे आल्या नव्हत्या. पण रोहित पवार सुरुवातीला ते आंदोलनात घुसले, नंतर सुप्रिया सुळे तिथे गेल्या आणि आज शरद पवार शिक्षकांना भेटून आले. त्यामुळे मराठी माध्यमांचे लक्ष शिक्षकांच्या आंदोलनाकडे गेले.
यापूर्वी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी असेच पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात लक्ष घातले होते. एमपीएससीचे विद्यार्थी शरद पवारांना त्यांच्या 1 मोतीबाग या निवासस्थानी भेटून देखील आले होते.
Pawar seizes political opportunity from teachers’ demands
महत्वाच्या बातम्या
- PM Modi जी BRICS ट्रम्प मोडायला सांगत होते, त्याच BRICS मधून मोदींनी महासत्तांना सुनावले…
- Sri Lanka : श्रीलंकेने म्हटले- कोणत्याही किंमतीत कच्चाथीवू बेट सोडणार नाही; कायदेशीररीत्या ते आमचे
- पूर आला, पण भक्तीचा ओघ नाही थांबला; भर पावसातही गोदावरी मातेची महाआरती संपन्न
- Waqf Rules : वक्फ कायदा-केंद्राने नव्या नियमांची अधिसूचना जारी केली; सर्व वक्फ मालमत्तांची नोंदणी ऑनलाइन होणार