नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसवर पवार कुटुंबीयांचा संपूर्ण कब्जाचा डाव बारगळला; कारण सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत त्याच्या खुणा दिसल्या!!, असेच आज नवी दिल्लीत घडले.
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले काही दिवस मोठे राजकीय घमसान सुरू होते. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर दोनच महिन्यांमध्ये आपल्या दोन्ही मुलांचे राजकीय बस्तान बसवायचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाला धक्का द्यायचा “डाव” खेळला. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद मिळवताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचीच मदत घेतली होती. या दोघांनीच भाजपच्या नेतृत्वाशी जवळीक साधून सुनेत्रा पवारांचा सत्तेचा मार्ग प्रशस्त केला होता.
पटेल, तटकरे यांचे पंख कापायचा “डाव”
पण सुनेत्रा पवारांना आपल्याबरोबरच आपल्या दोन्ही मुलांचे राजकीय बस्तान बसवायची घाई झाली. त्यामुळे त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे पंख कापायचा “डाव” खेळला, पण त्यात त्या यशस्वी झाल्याचे दिसले नाही. पार्थ पवार यांना आपल्या मित्राची विधान परिषदेची इच्छा पूर्ण करता आली नाही.
सुनेत्रा पवारांचा “डाव” अर्धाच यशस्वी
मात्र त्या पलीकडे जाऊन सुनेत्रा पवारांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळायचे “धाडस” केले. ती “क्लेरिकल मिस्टेक” होती, असे सांगून त्यावर सारवासारव करायचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी त्यांनी पार्थ पवारच्या समर्थकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठ्या प्रमाणावर स्थान दिले होते. पण त्यांचा तो “डाव” सुद्धा अर्धवटच यशस्वी ठरला.
दिल्लीतल्या पत्रकार परिषदेतून तटकरेंचे खुलासे
कारण सुनील तटकरे यांनी आज नवी दिल्लीत जाऊन पत्रकार परिषद घेऊन बऱ्याच गोष्टींचे खुलासे केले. राष्ट्रीय कार्यकारणीच्या पत्रातील क्लेरिकल मिस्टेक लवकरच दूर करून निवडणूक आयोगाला नवे पत्र पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस मधले समाज गैरसमज दूर झाल्याचा दावा त्यांनी केला. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या समवेत सगळ्यात ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्याबरोबरच सुनील तटकरे सुद्धा सामील झाले होते. या बैठकीत सगळ्यात वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा होऊन तोडगा निघाल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद आजही आपल्याकडे आहे आणि त्या पदावर राहूनच आपण आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित करत आहोत, असे सुनील तटकरे म्हणाले.
विलीनीकरण बारगळले
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा विषय आता समोरूनच म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून थांबविल्याचा खुलासा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांनी केला. त्यामुळे त्यावर आता आमच्या बाजूने सुद्धा चर्चा करायचे काही कारण नाही, असे सुनील तटकरे म्हणाले. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबरच पुढचे राजकीय वाटचाल करेल, अशी ग्वाही दिली.
तटकरेंच्या पत्रकार परिषदेचा खरा अर्थ
त्यामुळे सुनील तटकरे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेचा अर्थ स्पष्ट झाला, तो म्हणजे, जोपर्यंत भाजपचे केंद्रीय नेते परवानगी देत नाहीत, तोपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण शक्य नाही. पवार कुटुंबीयांची कितीही इच्छा असली तरी, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल किंवा अन्य ज्येष्ठ नेत्यांना सहजासहजी बाजूला करता येणे शक्य नाही. त्यामुळे अर्थातच पवारांच्या इच्छेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसवर संपूर्णपणे पवार कुटुंबीयांच्या कब्जा करण्याचा विषय देखील पुढे नेता येणे शक्य नाही. कारण राष्ट्रीय कार्यकारिणीत जरी पार्थ पवारांच्या समर्थकांचा भरणा झाला असला, तरी त्यातून ज्येष्ठ नेत्यांना वगळणे देखील शक्य नाही, असाच अर्थ या पत्रकार परिषदेतून निघाला.
Pawar family grip over NCP is losing gradually
महत्वाच्या बातम्या
- Taiwan : तैवानच्या रस्त्यांवर भारतविरोधी पोस्टर्स लागली; निवडणूक लढवणारा उमेदवार म्हणाला- भारतीय मजुरांना हाकलून द्या
- राष्ट्रवादीत संघर्ष, फडणवीस यांची भेट; त्यानंतर कोळी टोपी घालून सुनील तटकरे नितेश राणेंबरोबर एकाच रथात मिरवणुकीत!!
- West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द
- CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही