• Download App
    Pankaja Munde vs Suresh dhas "पवार संस्कारित" राजकारणाची अखेर भाजपला झळ; पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस भांडण उघड्यावर!!

    “पवार संस्कारित” राजकारणाची अखेर भाजपला झळ; पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस भांडण उघड्यावर!!

    नाशिक : ज्याची शक्यता आणि भीती होती, तेच अखेरीस बीड मधल्या राजकारणाच्या निमित्ताने घडले. “पवार संस्कारित” राजकारणाची झळ भाजपला अखेर बसलीच. पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस हे भाजपमधले अंतर्गत भांडण उघड्यावर आले. दोन्ही नेते मुंबईत विधान भवन परिसरात एकमेकांवर तुटून पडले. काँग्रेसी आणि राष्ट्रवादी संस्कृतीतले गटातटाचे राजकारण भाजपमध्ये शिरून त्याने पक्षांतर्गत शिस्तीचा बोजवारा उडवल्याचे उघडपणे दिसले. Pankaja Munde vs Suresh dhas

    पंकजा मुंडे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजपच्या श्रेष्ठींनी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांना समज द्यावी. मी भाजपची एक राष्ट्रीय नेता आहे. भाजपचे एक आमदार माझ्याविरुद्ध जाहीरपणे आरोप करतायेत हे योग्य नाही असे म्हटले होते. विधान भवन परिसरात पत्रकारांची बोलताना पंकजा मुंडे यांनी त्या विधानाचे समर्थन केले. मी जर सुरेश धस यांचे आष्टी मतदारसंघात काम केले नसते तर त्यांना 70 हजाराचे लीड मिळाले असते का??, असा सवाल त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत आष्टी मतदारसंघात मला मिळालेले लीड निम्म्यापेक्षा कमी होते मग ते कुणामुळे होते??, असा सवालही त्यांनी केला.

    सुरेश धस यांनी विधान भवन परिसरातच पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर दिले. पंकजा मुंडे यांनी जाहीर भाषणांमध्ये बीड जिल्ह्यात माझा एकच उमेदवार आहे, तो म्हणजे नमिता मुंदडा असे म्हणत होत्या. मी आष्टी मध्ये भाजपचा उमेदवार असताना त्या मला पक्षाचा उमेदवार मानत नव्हत्या. पंकजा मुंडे यांनी शिट्टीचा प्रचार केला म्हणजेच अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आष्टी मतदार संघात त्यांच्या विचाराचा उमेदवार निवडून आला नाही. मी भाजपचा आमदार म्हणून निवडून आलो, असे सुरेश धस म्हणाले. संतोष देशमुख हा पंकजा मुंडे यांच्या बूथ प्रमुख होता त्यामुळे ते प्रकरण मी लावून धरले यात मी काही चूक केली नाही, असे सुरेश धस म्हणाले.

    बीड जिल्ह्यातल्या या सगळ्या राजकारणाची धग अखेरीस भाजपला लागलीच. कारण काही झाले तरी सुरेश धस आज जरी भाजपचे आमदार असले तरी ते मूळातले “पवार संस्कारित” नेते आहेत. ते पवारांच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. ते अजितदादांचेही कट्टर समर्थक होते. परंतु, ज्यावेळी आष्टी मतदारसंघात त्यांची पूर्ण कोंडी झाली, त्यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुरेश धस यांची राजकारण शैली पूर्णपणे “राष्ट्रवादी पवार संस्कारित” आहे. भाजप आणि संघ परिवाराची शिस्त याचा सुरेश धस यांच्याशी दुरान्वये संबंध नाही. त्यामुळे सुरेश धस यांनी पक्षीय शिस्तीची चौकट मोडून गेले काही दिवस स्वतःचे जातीय अँगल्स राजकारण चालवले आहे.

    पंकजा मुंडे या आज जरी राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि राष्ट्रीय सचिव असल्या, तरी त्यांनी बीड जिल्ह्यातले राजकारण देखील भाजपच्या शिस्तीबाहेर जाऊन काही प्रमाणात केले याचा दाखला त्यांच्या पराभवानंतर झालेल्या राजकारणातून दिसला. पंकजा मुंडे यांना 2019 मध्ये झालेला पराभव पचला नव्हता. त्यानंतरच्या ५ वर्षांमध्ये त्या कायम अस्वस्थ राहिल्या. त्याच्या बातम्या माध्यमांनी फुलवून जरी दिल्या असल्या, तरी त्यामागे पंकजा मुंडेंची अस्वस्थता लपून राहिली नव्हती. त्यांनी अनेकदा जाहीर बोलूनही दाखवली होती, जी भाजपच्या शिस्तीत बिलकुल बसत नव्हती. उलट त्यांची राजकारण शैली “राष्ट्रवादी संस्कारांशी” जास्त जवळीक साधणारी होती. भाजपने 2024 मध्ये त्यांना मंत्री केल्यानंतर पंकजा मुंडे यांची राजकारण शैली मूळ रुळावर आली.

    पण दरम्यानच्या काळात बीड मधले राजकारण जातीय टोकावर गेले असताना त्याची झळ पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस अशा रूपाने भाजपला बसली आहे. यात भाजपची पक्षीय शिस्त पूर्णपणे बिघडून गेली आहे. सुरेश धस यांच्या रूपाने “पवार संस्कारित” नेत्याचे त्यात मोठे योगदान आहे. आता आपल्याच नेत्यांना वेळीच वेसण घालायची वेळ या “पवार संस्कारित” राजकारणामुळे भाजप श्रेष्ठींवर आली आहे.

    Pankaja Munde vs Suresh infighting irked BJP leadership

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस