विशेष प्रतिनिधी
मुंबई : ऐन दिवाळीत महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणाचे वर्णन करायचे असेल तर ते या चार शब्दांनी करावे लागेल, फोडा – फोडी, बुडवा – बुडवी, राजी – नाराजी आणि खडाखडी!!… हे ते शब्द आहेत. कारण महाराष्ट्रातले सर्व पक्षांमधल्या राजकीय नेत्यांच्या तोंडी सध्या हीच भाषा आहे आणि त्यातूनच महापालिका निवडणुकीतील निवडणुकीपूर्वीतील पूर्वीची ही खडाखडी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. Only verbal spats in maharashtra politics today, battle for municipal elections yet to begin
शिवसेनेत फूट पाडल्यानंतर भाजप आता राष्ट्रवादी फोडेल, असे वक्तव्य रोहित पवारांनी मध्यंतरी केले. त्यानंतर त्यांनी घुमजाव केले. आपण फक्त विरोधक राष्ट्रवादी फोडायच्या मागे लागले आहेत, असे म्हणालो होतो. भाजपचे नाव घेतले नव्हते, असा खुलासा रोहित पवारांनी केला, पण दोनच दिवसांपूर्वी रोहित पवारांनी परत एकदा राष्ट्रवादी फोडण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे वक्तव्य केले आहे. आर. आर. आबा पाटलांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ मधील सत्ता गमावल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी कोणी फोडू शकत नाही. तेवढी कुणाची क्षमता आणि हिंमत नाही, असे वक्तव्य केले आहे.
या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपला राष्ट्रवादी फोडण्याची गरज नाही. शिवसेनेचे आमदार जसे नेतृत्वावरच्या नाराजीमुळे फुटले तशीच गत राष्ट्रवादीची होणार आहे. शिवसेना काय किंवा राष्ट्रवादी काय दोन्ही पक्ष आपापल्या नेतृत्वाच्या कर्तृत्वानेच बुडणार आहेत. ते बुडवायची भाजपला गरज नाही. राष्ट्रवादीतल्या नेत्यांवरच्या नाराजी मुळे राष्ट्रवादी फुटणार आहे आणि आश्चर्यकारक प्रवेश भाजपमध्ये दिसणार आहेत, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
सामनातल्या आजच्या 23 ऑक्टोबर 2022 रोजीच्या अग्रलेखात, शिंदे गटातले 22 आमदार नाराज असून ते कधी भाजपमध्ये प्रवेश करतील, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कळणारही नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पद हे तात्पुरती व्यवस्था आहे. शिंदे गटाचे 22 आमदार फुटल्यानंतर त्यांची अवस्था रामदास आठवलें सारखी होणार आहे, असे म्हटले आहे. यासाठी शिंदे गटातल्याच एका आमदाराने केल्याचा हवाला सामनाने दिला आहे. शिंदे गटातले आमदार नाराज असल्याचा दावा यातून अधिक ठळक होतो आहे.
पण ही नेत्यांची सर्व वक्तव्ये लक्षात घेतली, तर महापालिका निवडणुकांपूर्वीची ही खडाखडी आहे. प्रत्यक्ष राजकारण तर अजून सुरूच व्हायचे आहे, असाच त्यातून अर्थ निघतो आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर एकत्र आले. त्यानंतरच्या शिवतीर्थावरील मनसेच्या दीपोत्सवात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे एकत्र आले.
या दोन्ही महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे दिसलेच नाहीत. याचा अर्थ उद्धव ठाकरे एकाकी पडले. पण मध्यंतरी गौतम अदानी आणि परवाच अनंता अंबानी हे उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर भेटून आले. त्यामुळे उद्धव ठाकरे एकाकी पण उद्योगपती साथीशी!!, असे चित्र महाराष्ट्राने पाहिले.
या पार्श्वभूमीवर सगळेच नेते महापालिका निवडणुकीपूर्वीची राजकीय खडाखडी खेळत आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीची राजकीय कुस्ती जोमात यायला दिवाळी उलटावी लागेल. त्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय कुस्तीच्या हलग्या, ताशे वाजू लागतील. प्रत्यक्ष राजकारण रंगेल, तेव्हा नेमके कोण? कुठे? कसे? कुणाकडे जाणार? कोण कुठून कोणाकडे येणार? हे स्पष्ट होईल. तोपर्यंत दिवाळीच्या फटाक्यांच्या आतषबाजीत राजकीय वक्तव्यांची फटाकेबाजी महाराष्ट्राला पाहायला मिळत आहे.
Only verbal spats in maharashtra politics today, battle for municipal elections yet to begin
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरे यांच्या आजच्या मराठवाडा दौऱ्यापूर्वी आणि दौऱ्यानंतर राजकारण बेरजेचं की वजाबाकीचं?
- ऐतिहासिक ताजमहाल होणार अतिक्रमण मुक्त; सीमेअंतर्गत 500 मीटर व्यवसाय बंदी करणार लागू
- गुमनामी बाबा की नेताजी? : गुमनामी बाबांचा DNA रिपोर्ट सार्वजनिक करायला केंद्रीय फॉरेन्सिक लॅबचा नकार
- फोडा – फोडी, बुडवा – बुडवी राजी – नाराजी; ही तर महापालिका निवडणुकांपूर्वीची खडाखडी