राजकारणामध्ये काही नेते हे स्वनामधन्य असतात, काही नेते खरंच स्वकर्तृत्वाने चमकतात, तर काही नेते “इतर नाम धन्य” असतात!! महाराष्ट्र विशिष्ट राजकीय खेळ्या करून स्वकर्तृत्वाने चमकलेले नेते सध्या मात्र “मोदी नाम धन्य” झाले आहेत. म्हणजे ते स्वतः तसे म्हणत नाहीत पण त्यांचे अनुयायी मात्र त्यांना तसे म्हणू लागल्याची चिन्हे दिसत आहेत. Only PM Modi’s criticism of sharad pawar has remained political capital for NCP
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध हा फार मोठ्या राजकीय गूढाचा विषय नाही, पण तो तसा बनवून त्याचे राजकीय भांडवल करण्याचा उद्योगच राष्ट्रवादीचे नेते करताना दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल शिर्डीतल्या कार्यक्रमात जे भाषण केले, त्याचे व्हर्बेटम नीट ऐकले, तर एक खुलासा स्पष्ट होईल, तो म्हणजे पंतप्रधान मोदी हे शरद पवारांचा वैयक्तिक सन्मान करतात, पण त्यांच्या धोरणांवर टीका करतात. राजकारणातली सौजन्यशीलता मोदी पाळतात. पण या सौजन्यशीलतेचेच राजकीय भांडवल करण्याचे काम मात्र राष्ट्रवादीचे नेते करतात. म्हणूनच सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील या दोन नेत्यांनी मोदींच्या कालच्या टीकेवरून जी प्रतिक्रिया व्यक्त केली, त्यातून शरद पवारांचे “मोदी नाम धन्य” हे स्वरूप समोर येते.
जणू काही मोदींनी पवारांचे नाव घेतले किंवा न घेतले तर पवारांच्या एकूण राजकीय कर्तृत्वात फार मोठा फरक पडतो, असेच सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांना भासवायचे आहे.
महाराष्ट्रात येऊन मोदींना पवारांचे नाव घ्यावेच लागते याचा “आनंद” सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला, तर काय ही विसंगती??, असा व्हिडिओ जयंत पाटलांनी ट्विट केला. या व्हिडिओत लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी पवारांचे स्तुती करताना दिसत आहेत. टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमात मोदींनी पवारांची स्तुती केलीच होती, पण तो त्यांच्या सौजन्याचा भाग होता. त्यापलीकडे त्यातून फार “बिट्वीन द लाईन्स” वाचण्यासारखे काही नव्हते. पण जयंत पाटलांनी त्याचेच भांडवल करून मोदींवर कालच्या भाषणाच्या मुद्द्यावर ठळक प्रश्नचिन्ह लावले आहे.
पण त्यापलीकडे जाऊन पवारांचे राजकीय कर्तृत्व एवढेच उरले आहे का??, की पंतप्रधान मोदींनी त्यांचे नाव घेतले म्हणून किंवा न घेतले म्हणून ते उणे किंवा अधिक होते??, हाच कळीचा मुद्दा आहे.
पंतप्रधान मोदींनी बारामतीत येऊन मोदींना राजकीय गुरु म्हटले होते, तर त्याचेच राजकीय भांडवल मध्यंतरी आमदार रोहित पवारांनी केले. जणू काही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सरकारचा प्रत्येक निर्णय हा पवारांनाच विचारून घेतात, असा आभास रोहित पवारांनी निर्माण केला होता.
वास्तविक काल शिर्डीतल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी आकडेवारीनिशी शरद पवारांचे वाभाडे काढले होते. पवारांच्या 10 वर्षांच्या कृषिमंत्री पदाच्या कारकिर्दीत फक्त साडेतीन लाख कोटी रुपयांचे धान्य सरकारने खरेदी केले होते, त्या उलट मोदी सरकारने आपल्या 9 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल साडेतेरा लाख कोटी रुपयांचे धान्य शेतकऱ्यांकडून खरेदी केले. त्यांना किमान आधारभूत किंमत वाढवून ती मिळवून दिली, असे मोदींनी सांगितले.
पण या टीकेतला मुख्य गाभा सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी चलाखीने बाजूला काढला आणि पवारांचा वैयक्तिक पातळीवर आपण सन्मान करतो एवढेच मोदींचे वाक्य उचलून त्याचे राजकीय भांडवल केले.
पवारांच्या एकूण राजकीय कर्तृत्वावर त्यांच्याच अनुयायांनी एक प्रकारे हे बोळा फिरवण्यासारखे आहे. पवारांचा राजकीय कर्तृत्व महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे. पण जे काही आहे, ते त्यांचे स्वतःचे आहे. त्यांच्या इंग्रजीतल्या आत्मचरित्राचे शीर्षकच मुळी “ऑन माय टर्म्स” असे आहे. पण हे नाव त्यांचेच अनुयायी विसरलेत का??, असा प्रश्न विचारायची वेळ सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांच्या वक्तव्यातून आली आहे. त्यामुळेच पवार हे “स्वनामधन्य” असण्यापेक्षा “मोदी नाम धन्य” झाले आहेत, हे त्यांच्या अनुयायांनीच सिद्ध केले आहे!!
Only PM Modi’s criticism of sharad pawar has remained political capital for NCP
महत्वाच्या बातम्या
- मल्लिकार्जुन खरगे यांचा दावा- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका काँग्रेस जिंकणार; मध्य प्रदेशात लोकांना सीएम शिवराज यांची अडचण!
- ड्रग्स माफिया ललित पाटील ठाकरेंचा शिवसैनिक; तर सलमान फाळके, शानू पठाणचे सुप्रिया सुळे, आव्हाडांबरोबर फोटो!!
- ”इंडिया आघाडीत पंतप्रधान पदासाठी १८ उमेदवार इच्छुक, प्रत्येक पक्षाला हवंय आपल्या नेत्यासाठी पंतप्रधानपद”