विशेष प्रतिनिधी
पुणे : “राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय संमेलनात केलेल्या भाषणाची सीडी पूर्ण ऐकली. माझ्या मनात काही मुद्दे आहेत. मी त्यांच्याशी याबाबत चर्चा करेन. मनसेसोबत युतीबाबत आम्हाला केवळ पुणे किंवा विशिष्ट क्षेत्राचा विचार करून चालत नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. पुण्यात युती केली आणि त्याचा फटका मुंबईत बसला असे होऊन चालणार नाही”, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.North Indian issues Is the main Obstacle For MNS-BJP alliance
गेल्या काही दिवसांपासून भाजप-मनसे युतीच्या चर्चा सुरु आहेत. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची नाशिकमध्ये भेट झाली होती. त्यावेळी राज ठाकरेंची उत्तर भारतीय संमेलनातील भाषणांवरुन दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी आपली भाषणाची सीडी पाठवतो ती भाषणं ऐका, असं सांगितलं होतं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
परप्रांतियांना होणारा विरोध हा अडसर
मनसेचा परप्रांतीयांना होणारा विरोध ही युतीतील अडचण आहे. ही अडचण दूर झाली तर मी ओके देईन, असं चंद्रकांत पाटलांनी यापूर्वी थेट सांगितलं होतं. त्यामुळे मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता अधिक बळावली होती.
विशेष म्हणजे ही युती पालिका निवडणुकांसाठी नसून लोकसभा आणि विधानसभेतही राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेते काय निर्णय घेतात आणि राज-चंद्रकांत पाटील यांच्या भेटीत नेमकं काय ठरतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
- भाजप-मनसे युतीच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा
- नाशिकमध्ये चंद्रकांत पाटील- राज ठाकरे यांची भेट
- पालिका, लोकसभा आणि विधानसभेसाठीही युती
- मनसे- भाजप युतीसाठी परप्रांतीय मुद्याचा अडथळा
- राज ठाकरे यांच्या भाषणाची सीडी ऐकली : पाटील
- युतीबाबत भाजपचे केंद्रीय नेते निर्णय घेणार
- राज ठाकरे यांच्याशी चंद्रकात पाटील चर्चा करणार