• Download App
    पवारांचे सोडा, महाराष्ट्रात कोणीही स्वबळावर सत्ता मिळवू शकले नाही, कारण महाराष्ट्राचे राजकीय स्वरूप राष्ट्रीयच, प्रादेशिक नव्हे!! Nobody could muster maharashtra power on his own because maharashtra politics is necessarily national not regional

    पवारांचे सोडा, महाराष्ट्रात कोणीही स्वबळावर सत्ता मिळवू शकले नाही, कारण महाराष्ट्राचे राजकीय स्वरूप राष्ट्रीयच, प्रादेशिक नव्हे!!

    महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीसांच्या सरकारमधील मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर मध्ये खंत व्यक्त करताना शरद पवारांना महाराष्ट्राने कधीच संपूर्ण बहुमताची सत्ता दिली नसल्याची खंत व्यक्त केली. पण त्यावरून महाराष्ट्रात मोठे वादळ उठले. राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी वळसे पाटलांच्या अंगावर शाई फेकण्याची भाषा केली. पण वळसे पाटील ज्या गटात आहेत, त्या अजितनिष्ठ राष्ट्रवादीने वळसे पाटलांच्या वक्तव्यावरचे समर्थन केले.  Nobody could muster maharashtra power on his own because maharashtra politics is necessarily national not regional

    पण या वादळा पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा बारकाईने आढावा घेतला तर, महाराष्ट्रात पवार सोडा, पण स्वबळाची सत्ता मिळवणे किंवा न मिळवणे हे कोणा एका नेत्याच्या हातात तरी होते का??, याचा विचार केल्यावर त्याचे उत्तर “नकारार्थी” मिळते!!

    कधीच नाही

    महाराष्ट्रात कोणाही एका नेत्याने स्वबळावर सत्ता मिळवण्याचे उदाहरण सापडत नाही. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होईपर्यंत महाराष्ट्रात कोणा एका व्यक्तीची नव्हे, तर काँग्रेस पक्षाची सत्ता होती आणि त्यामध्ये बाळासाहेब खेर, मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री म्हणून सर्वात प्रभावी नेते होते, तरी देखील या दोन नेत्यांच्या बळावर मुंबई प्रांतात सत्ता आली हे म्हणणे राजकीयदृष्ट्या चूक ठरेल!!

    कारण महाराष्ट्रात कायम पक्ष हा व्यक्ती पेक्षा मोठा राहिला आहे. विशेषतः काँग्रेसच्या बाबतीत हे ठळक राजकीय सत्य आहे. महात्मा गांधींच्या काँग्रेस पासून इंदिरा, राजीव गांधींच्या काँग्रेस पर्यंत, अगदी सोनिया गांधी यांच्या काँग्रेस पर्यंत महाराष्ट्रा जे मुख्यमंत्री झाले, ते स्वबळावर झाले नव्हते, तर काँग्रेस पक्षाचे प्रभावी नेते म्हणून त्यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी काँग्रेस हायकमांडने लावली होती.

    म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, सोनिया गांधी या पक्षश्रेष्ठींच्या मर्जीतलाच नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे.

     प्रभावी मराठी नेते

    याचा अर्थ असा नव्हे, की महाराष्ट्रात कोणी काँग्रेसचे प्रभावी नेते नव्हते. उलट महाराष्ट्र स. का. पाटील, भाऊसाहेब हिरे, शंकरराव देव, मामासाहेब देवगिरीकर, यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे प्रचंड प्रभाव असणारे नेते होते. या मांदियाळीत शरद पवारांचे नाव निश्चितच वरचे आहे, पण बाकीच्या नेत्यांच्या शरद पवारांचे वैशिष्ट्य असे की ते काँग्रेस आणि काँग्रेस विरोधक असे नेते गणले जातात. कारण ते आपल्या राजकीय कारकीर्दीत निम्म्यापेक्षा जास्त वर्ष काँग्रेस बाहेर राहिले.

    बाकीच्या नेत्यांच्या बाबतीत तसे म्हणता येत नाही. यापैकी स. का. पाटील, शंकरराव देव, मामासाहेब देवगिरीकर, बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते हे कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते. पण महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे अत्यंत प्रभावी आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ स्पर्धक होते. पण यापैकी एकाही नेत्याला त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसची स्वबळावर सत्ता आणली किंवा स्वतःच्या नावावर सत्ता आणली, असे म्हणता येणार नाही. कारण या सर्व नेत्यांपेक्षा त्यावेळी काँग्रेस हायकमांड म्हणजे पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे प्रभावी नेते होते आणि त्यांच्या प्रभावाखाली बाकी सर्व नेत्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणली होती.

    या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांड आणि महाराष्ट्रातले प्रभावी नेते यांच्यातला सुप्त संघर्ष हा स्वतंत्र लेखच नव्हे, तर स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. पण याचा निष्कर्ष हाच की महाराष्ट्रातले अत्यंत प्रभावी असणारे नेते देखील स्वबळावर सत्ता आणू शकणारे नेते नव्हते, ही वस्तुस्थिती अधोरेखित करावी लागेल.

     कमकुवत विरोधक

    मूळात 1990 च्या दशकापर्यंत महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष संघटनात्मक पातळीवर एवढा प्रभावी आणि बळकट होता, की कोणताही विरोधी पक्ष अथवा कोणताही नेता महाराष्ट्रात आपली स्वबळावर सत्ता आणण्याची स्वप्न देखील पाहू शकत नव्हता. वास्तविक 1990 पर्यंत काँग्रेस अनेकदा फुटली. त्या फुटीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम देखील झाला. पण त्या परिणामातून देखील यशवंतराव चव्हाण अथवा अन्य कोणाही नेत्याला एवढा प्रभाव निर्माण करता आला नाही, की तो नेता महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणू शकेल. अगदी 1980 च्या दशकात देखील चव्हाण – रेड्डी यांच्या काँग्रेसला स्वबळावर सत्ता आणता आली नव्हती. त्यांना महाराष्ट्रात नाशिकराव तिरपुडे यांच्या नेतृत्वाखालच्या इंदिरा काँग्रेसशी आघाडी करून सत्ता मिळवावी लागली होती.

    1990 नंतर तर काँग्रेसला कधीच पक्ष म्हणून देखील स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही. विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे चारही मुख्यमंत्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या आधारे मुख्यमंत्री राहू शकले.

     

     

    शिवाय सोनिया गांधी, प्रणव मुखर्जी या नेत्यांच्या मुत्सद्देगिरीमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेस नेत्यांकडून मुख्यमंत्री पद हिसकावून घेऊन आले नव्हते. हा नजीकचा इतिहास आहे.

     बाळासाहेब करिष्माई नेते, पण…

    अर्थात वर उल्लेख केलेले सर्व नेते हे काँग्रेस राजकीय संस्कृतीतले प्रमुख नेते होते. पण याला अपवाद होता, तो काँग्रेस बाह्य राजकीय संस्कृतीतील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांच्या मांदियाळीतले एकमेव नेते होते, की ज्यांनी स्वतःच्या करिष्म्यावर शिवसेना नावाची संघटना उभी केली आणि सत्तेची दारे या संघटनेला उघडी करून दिली.

    शिवसेनेने महाराष्ट्राला मनोहर जोशी, नारायण राणे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे 4 मुख्यमंत्री दिले.

    पण बाळासाहेबांना देखील भाजप सारख्या प्रभावी संघटनात्मक पक्षाशी युती करावी लागली. एकाच वेळी शिवसेना-भाजप युती, हिंदुत्वाचा मुद्दा आणि त्याच वेळी काँग्रेस सारखे संघटना कमकुवत होणे ही राजकीय प्रक्रिया घडल्याने महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्याने शिवसेनेची स्वबळावर सत्ता आली नाही, पण शिवसेना-भाजपची सत्ता येऊ शकली ही वस्तुस्थिती आहे. त्यादरम्यान म्हणजे 1990 ते 2010 या 30 वर्षांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे आक्रमक हिंदुत्ववादी नेतृत्व करिष्माई होते. पण ते देखील शिवसेनेची स्वबळावर सत्ता आणू शकले नव्हते ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

    महाराष्ट्राचे राजकीय स्वरूप राष्ट्रीयच, प्रादेशिक नव्हे

    पण या सर्वांचा राजकीय अर्थ असा की, मूळात महाराष्ट्रात कोणत्याही एका नेत्याची स्वबळावर सत्ता न येण्याचे मूलभूत कारण महाराष्ट्राचे राजकारण हे दक्षिणेतील राजकारणासारखे नेता केंद्रित आणि प्रादेशिक राजकारणच नव्हे, हे होय.

    महाराष्ट्राचे राजकारण कायम राष्ट्रीयतेशी संलग्न राहिले. त्याचा हवाला लोकमान्य टिळकांपासून देता येतो. लोकमान्य महाराष्ट्रातले सर्वात प्रभावी नेते खरे, पण त्यापलीकडे लोकमान्यांचे नेतृत्व अखिल भारतीय नेतृत्व होते ही वस्तुस्थिती आहे. लोकमान्यांनंतर संपूर्ण अखिल भारताला नेतृत्वाची गवसणी घालू शकणारा मराठी नेता महाराष्ट्राच्या राजकारणात निपजला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

    एकट्या पवारांवर ठपका अयोग्य

    त्यामुळे महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही, हा ठपका केवळ काँग्रेस राजकीय संस्कृतीतील शरद पवार या एकट्या नेत्यावर ठेवता येणार नाही, तर तो त्यांच्या राजकीय गुरूंवर किंबहुना सर्व पूर्वसरींवर देखील ठेवावा लागेल. पण खरेतर हा ठपका ठेवण्याचा देखील विषय नाही. कारण हा महाराष्ट्राच्या मूलभूत राजकीय स्वरूपाचा विषय आहे, जो खऱ्या अर्थाने प्रादेशिक नाही, तर राष्ट्रीय राजकारणाशी संलग्न आहे. म्हणूनच महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोणालाही स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

     जे काँग्रेसचे, तेच भाजपचे!!

    2014 नंतर देखील याचेच प्रत्यंतर येते. मोदी – शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजप देशात प्रबळ पक्ष होताना महाराष्ट्रातही तो प्रबळ झाला. पण महाराष्ट्रात भाजपचे पूर्णपणे प्रभावी असे नेतृत्व अद्याप तरी उभे राहू शकलेले नाही. महाजन – मुंडेंपाठोपाठ गडकरी – फडणवीस यांचे नेतृत्व पुढे आले हे खरे, पण हे नेते देखील दक्षिणेतील प्रादेशिक नेत्यांसारखे संपूर्णपणे महाराष्ट्रावर प्रभाव टाकणारे नेते नसून ते मोदी – शाह यांच्या भाजपचे महाराष्ट्रातले सर्वात प्रभावी नेते म्हणूनच गणले जातात. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपचे नेतृत्व करण्यासाठी केंद्रातल्या भाजपच्या नेतृत्वाचा आशीर्वाद लागतो ही वस्तुस्थिती आहे.

    काँग्रेस बळकट असताना हायकमांडचा आशीर्वाद लागायचा. आता भाजप बळकट होताना भाजपश्रेष्ठींचा आशीर्वाद लागतो, हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा चक्रव्यूह आहे. येथे प्रादेशिकांना मर्यादेपलिकडे स्थान नाही.

    Nobody could muster maharashtra power on his own because maharashtra politics is necessarily national not regional

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!